बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (16:11 IST)

परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात याचिका, अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांसंदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, अशी परमबीर सिंह यांची मागणी आहे. पुरावे नष्ट होण्याआधी या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करण्यात यावी असं परमबीर यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्र्यांनी सचिन वाझे आणि सोशल सर्व्हिस ब्रांचचे एसीपी संजय पाटील यांना महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं. याआधी 24-25 ऑगस्टला गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाबद्दल पोलीस महासंचालकांना माहिती दिली होती असं परमबीर यांनी म्हटलं आहे.
पोलीस महासंचालकांनी ही माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिली. टेलिफोनिक इंटरसेप्शनच्या आधारे ही माहिती पुढे आली होती.
रश्मी शुक्ला यांच्या माहितीवर कारवाई न करता त्यांची बदली करण्यात आली. अनिल देशमुख अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करत होते. तपास त्यांच्या सांगण्याप्रमाणे होण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना सूचना देत होते.
 
'अनिल देशमुखांनी पदाचा गैरवापर केला'
अनिल देशमुख यांच वागणं त्यांच्या पदाचा गैरवापर आहे. अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाची सीबीआय चौकशी करावी असं परमबीर यांचं म्हणणं आहे.
परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर 17 मार्चला परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आल्याचं त्यांनी याचिकेत नमूद केलंय.
परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांकडून अक्षम्य चुका झाल्याने सिंह यांची बदली केल्याचं वक्तव्य केलं होतं. परमबीर सिंह यांनी याचिकेत, माझी बदली द्वेषपूर्वक झाल्याचं म्हटलं आहे. "माझ्याविरोधात एकही पुरावा नसताना. चौकशीसाठी कोणाची नोटीस नसताना," माझी बदली करण्यात आल्याचं परमबीर सिंह याचिकेत पुढे म्हणतात.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, 'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट हेत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे', अशी अनिल देशमुख यांनी आपली बाजू ट्वीटरवर मांडली आहे.
सचिन वाझेप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
जवळपास आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली होती.
 
पत्रातील मुद्दे
1. अनिल देशमुख यांनी सचिव वाझेला गेल्या काही महिन्यात आपल्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर अनेकवेळा बोलावलं होतं. पैसे गोळा करण्यासाठी मदत करा असं अनेकवेळा सांगितलं होतं.
 
2. परमबीर सिंह यांनी लिहिलं आहे की, "गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं".
 
3. फेब्रुवारी महिन्यात देशमुख यांनी वाझे यांना घरी बोलावलं आणि महिन्यातच 100 रोजी रुपये टार्गेट असल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं मुंबईत 1750 बार, रेस्टोरंट आणि इतर आस्थापना आहेत. प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा झाले कर 40-50 कोटी होतात असं परमबीर यांनी पत्रात म्हटलं आहे.
 
4. बाकी पैसे इतर source मधून जमवता येतील. वाझे यांनी मला त्यादिवशी ऑफिस मध्ये भेटून याबाबत माहिती दिली ज्यामुळे मला धक्का बसला होता असं परमबीर सिंह यांनी लिहिलं आहे.
 
5. त्यानंतर सोशल सर्व्हिस ब्रांचचे ACP संजय पाटील यांना हुक्का पार्लरबाबत चर्चेसाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर ACP पाटील आणि DCP भुजबळ यांना बोलावण्यात आलं
 
6. गृहमंत्र्यांचे पीए पालांडे यांनी पाटील आणि भुजबळ यांना गृहमंत्री 40-50 कोटी रुपये टार्गेट करत असल्याचं सांगितलं असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. गृहमंत्री माझ्या अधिकार्यांना मला आणि इतर वरिष्ठांना बायपास करून बोलावत होते असं परमबीर यांनी म्हटलं आहे.
 
7. परमबीर यांनी पुढे लिहिलं आहे की, "देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. त्या टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते".
डीजी दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेले हे आरोप गंभीर आहेत त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला नाही. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं पवार म्हणाले.