शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय मैत्री आणि किस्से

संकेत सबनीस
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या साथीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आकार घेतंय. गेल्या महिनाभरात घडलेल्या अनेक उलट-सुलट राजकीय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यामागे खरी मेहनत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्याचं एव्हाना उघड झालं आहे.
 
मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये 26 नोव्हेंबरला संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करताना शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
 
बाळासाहेब आणि शरद पवार यांचे राजकीय मार्ग निराळे असले तरी त्या दोघांनी आपली मैत्री कठीण काळातही टिकवल्याचे काही किस्सेही शरद पवार यांनी यावेळी कथन केले. ही सभा आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद यानिमित्ताने पवार आणि ठाकरे कुटुंबातील सलोख्याच्या संबंधांची पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली आहे.
 
'शरद बाबू ते मैद्याचं पोतं'
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारा वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे या दोघांमध्ये एकमेकांच्या पक्षाविरोधात प्रचार करण्याचे अनेक प्रसंग आले. तसेच, राजकारणापलिकडे जाऊन मैत्री टिकवण्याचे आणि ती जागण्याचे प्रसंगही चिकार येऊन गेले. या प्रत्येक प्रसंगात बाळासाहेब शरद पवारांना वेगवेगळ्या विशेषणांनी संबोधत असंत.
 
या दोन्ही नेत्यांच्या संबंधांबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "बाळासाहेब बऱ्याचदा खासगीत आणि जाहीर सभांमध्ये शरद पवारांना शरदबाबू अशी हाक मारत. मात्र, राजकीय विरोधाच्यावेळी त्यांनी शरद पवारांवर ते मैद्याचं पोतं असल्याची टीकाही वारंवार केली होती. पवारांनीही बाळासाहेबांवर टीका केली असली तरी त्यांनी कधी त्यांच्याविरुद्ध विखारी शब्द वापरले नव्हते."
 
पवार-ठाकरे यांचा राजकारणातला उगमही सारख्याच काळात झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. तर, शरद पवार हे 1967 साली बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
 
मासिकाचे भागीदार: ठाकरे आणि पवार
याच काळातला एक किस्सा 'द कझिन्स ठाकरे: उद्धव, राज अँड द शॅडो ऑफ देअर सेनाज' या पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितला.
 
ते सांगतात की, "शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 1966ला त्यांची पहिली सभा शिवाजी पार्क इथे झाली. ही सभा शरद पवार यांनी तिथे कठड्यावर बसून ऐकली होती. हा किस्सा पवार यांनीच एक मुलाखतीत सांगितला होता. त्यानंतरच्या काळात अनेक राजकीय आंदोलनांच्या व्यासपीठावर पवार-ठाकरे द्वयी एकत्र आली होती."
1960 साली बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून 'फ्री प्रेस जर्नल' वृत्तपत्रात नोकरी करायचे. त्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली व परत कधी नोकरी केली. नंतरच्या काळात शरद पवार यांच्याशी मैत्री झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्यासोबत भागीदारी करत एक आंतरराष्ट्रीय मासिक काढण्याचा निर्णय घेतला होता.
 
याबद्दल अधिक माहिती देताना पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "सुप्रसिद्ध टाइम मॅगझिनच्या धर्तीवर 'राजनीती' नावाचं एक मासिक बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी काढायचं ठरवलं होतं. या मासिकाचं सगळं काम पूर्ण झाल्यावर हे मासिक चालेल की नाही हे जाणून घेण्यासाठी हे दोघे बाळासाहेबांच्या एका भगिनींकडे गेले होते. त्यांच्यात अंगात येत असे. त्या सांगतील ते खरं ठरतं असं मानलं जायचं. त्यांनी या दोघांना या मासिकाची एकही प्रत बाजारात राहणार नाही असं सांगितलं होतं. पण, प्रत्यक्षात मासिक निघाल्यावर ते चाललंच नाही आणि यांना तो प्रकल्प गुंडाळून ठेवावा लागला."
 
'कलेमुळे पवार-ठाकरे एकत्र आले'
1982मध्ये गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईतलं वातावरण तापलं होतं. गिरणी कामगारांच्या समर्थनासाठी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस हे तिन्ही नेते एकत्र आले होते. दसरा मेळाव्याचा तो कार्यक्रम होता. या तिघांचा एक पुष्पहार घालून छगन भुजबळ यांनी सत्कार केला होता.
 
याबद्दल देसाई सांगतात, "या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडिस तर त्यावेळी एकमेकांना नावाने हाक मारत असत. तर, पवार यांचे जॉर्ज यांच्याशीही चांगले नाते होते."शरद पवारही पुलोदचे मुख्यमंत्री झाले ते समाजवाद्यांच्या पाठिंब्यामुळे."
 
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीबद्दल अधिक बोलताना देसाई पुढे सांगतात की, "शरद पवार यांनी त्यांचे राजकीय गुरू यशवंतरराव चव्हाण यांचा साहित्य-संस्कृती जपण्याचा वारसा पुढे चालवला. पवारांना नाटक, साहित्य, संगीत, कला या सगळ्यात विशेष रूची आहे. त्यांच्याएवढेच कलेवर बाळासाहेबांचं प्रेम होतं.
 
हे दोन्ही नेते अनेकदा खासगीमध्ये कला आणि संस्कृती या विषयांमध्ये रमून जायचे. तसंच, क्रिकेट हा सुद्धा या दोघांचा आवडीचा विषय. सचिन तेंडुलकरवर या दोन्ही नेत्यांचं प्रेमही सारखंच होतं. कलेवरच्या सारख्या प्रेमामुळेच दोन्ही नेते खूप वेळा एकत्र आले."
 
सुप्रिया सुळे आणि मातोश्री
2006च्या सप्टेंबर महिन्यात राज्यसभेची महाराष्ट्राची एक जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. यावेळी शरद पवार यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
 
याबद्दल पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात की, "पवारांनी सुप्रिया यांच्याविरोधात युतीचा उमेदवार कोण हे विचारण्यासाठी बाळासाहेबांना फोन केला होता. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, शरदबाबू सुप्रिया लहान असल्यापासून मी तिला ओळखतोय. आज तिला संधी आल्यावर तिच्या विरोधात मी उमेदवार कसा देईन? त्यामुळे सुप्रिया सुळे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती."
 
याच किश्शाची आठवण उद्धव ठाकरे यांनी 26 नोव्हेंबरच्या ट्रायडंट हॉटेल इथे झालेल्या महाविकास आघाडीच्या नेता निवडीच्या बैठकीत आठवण काढली होती. माझी मुख्यमंत्रिपदाची निवड ही त्याची परतफेड नाही असा मिश्किल टोमणाही त्यांनी मारला.
 
कुलकर्णी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना सांगतात की, "सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे ठाकरे कुटुंबीयांच्या नातेवाईकांपैकीच एक असल्याचं बोललं जातं. त्यामुळे मातोश्रीवर सुप्रिया यांचं नियमित येणं जाणं व्हायचं. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या वर्षा निवासस्थानी आलेल्या बाळासाहेब यांना सोडायला मातोश्रीपर्यंत जात असत."