मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (13:46 IST)

पोलिसांना मारणाऱ्या आरोपींना सोडा, राम कदमांचा पोलिसांनाच फोन

भाजप नेते राम कदम हे वादग्रस्त विधानांवरून नेहमीच चर्चेत असतात. पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी थेट पोलिसांनाच फोन केला आणि प्रकरण मिटवण्याची विनंती केल्यानं ते पुन्हा एकदा वादात सापडलेत. 
 
पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नितीन खैरमोडे असं मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.
 
पवईच्या हिरानंदानीच्या गॅलरिया मॉलजवळ एका जेष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला हे कार्यकर्ते धडकले. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते.
 
यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर यांना ताब्यात घेऊन रिक्षाने नेत असताना नितीन खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी रिक्षातच मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर हातात घातलेल्या कड्याने वार केले.
 
काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी युवकांसमोर बोलताना, 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि ती तुम्हाला नकार देत असेल, तर ती मुलगी पळवून आणून तिचे त्या तरुणाशी लग्न लावून देईन', असं बेताल वक्तव्य केलं होतं.
 
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना त्यांनी मारहाणही केली होती. टाईम्स स्क्वेअरच्या इमारतीवर प्रभू रामचंद्राचा फोटो एडिट करून टाकल्याप्रकरणी ते ट्रोलही झाले होते.
 
त्यांच्याविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात त्यांनी उपोषणही केलं होतं. सुशांत सिंगची आत्महत्या नव्हे तर हत्या आहे असा दावाही त्यांनी केला होता.