रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला, अशी आहेत कारणं

टोमॅटो 300 रुपये किलो. दूध 180 रुपये. काहीतरीच काय असं वाटतंय ना? पण हे आकडे खरे आहेत. शेजारच्या पाकिस्तानात महागाईने टोक गाठलंय. वीज, पाणी, भाज्या, गॅस सगळ्याचे दर गगनाला जाऊन भिडलेत.
 
14 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी पाकिस्तानची निर्मिती झाली. 881 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या पाकिस्तानची लोकसंख्या आहे 21 कोटी, 27 लाख, 42 हजार 631. पाकिस्तानचं दरडोई उत्पन्न आहे 1,340 डॉलर्स.
 
महागाई दर शिगेला
पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात महागाई दर 9.4 टक्क्यांवर गेला होता. याच काळात जगभरात खनिज तेलाच्या किमती वाढल्याने महागाई वाढली. ताज्या भाज्या, फळं, पेट्रोल-डिझेल, मांसाच्या किमती यात सातत्याने वाढ होते आहे. जुलै 2018 ते मार्च 2019 या कालावधीत महागाई दरात 6.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
दुधाचं उदाहरण घा ना. जनावरांना द्यावा लागणारा चारा आणि इंधनांच्या वाढत्या किमती यामुळे दुधाच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. टोमॅटोसारख्या सर्वसामान्यांच्या आयुष्यातील खाण्यापिण्याच्या वस्तूची किंमत तीनशे रुपरे किलोपर्यंत गेली आहे.
 
पाकिस्तानी रुपयाची महाघसरण
डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचं 148 एवढं प्रचंड अवमूल्यन झालं आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर एका अमेरिकन डॉलरसाठी 148 पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या रुपयाचं 20 टक्क्यांनी अवमूल्यन झाल्याने आशिया खंडातील सगळ्यांत कमकुवत चलनांमध्ये पाकिस्तानच्या रुपयाची गणना होऊ लागली आहे. सुरू असलेल्या मे महिन्यातच पाकिस्तानी रुपया 29 टक्क्यांनी घसरला आहे. पाकिस्तानच्या तुलनेत अफगाणिस्तान, बांगलादेश तसंच नेपाळचं चलन स्थिर आहे.
 
कर्जाचा बोजा
पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था यांच्यात कर्जाविषयी करार झाला आहे. त्यानुसार आयएमएफने पाकिस्तानला तब्बल 6 अब्ज डॉलरचं कर्ज दिलं आहे.
 
येत्या तीन वर्षांत कर्जाची रक्कम पाकिस्तानला पुरवण्यात येणार आहे. नाणेनिधीच्या बरोबरीने जागतिक बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडूनही पाकिस्तानला कर्ज मिळणार आहे.
 
मात्र हे अर्ज घेताना पाकिस्तानला कठोर अटींची पूर्तता करावी लागेल. अमेरिकेशी संबंध दुरावल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या निधीपुरवठ्यात घट झाली आहे. सीपीईसी अर्थात चीन पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडॉरअंतर्गत पाकिस्तानला चीनकडून सातत्याने आर्थिक मदत होत आहे.
 
अर्थसंकट का?
पाकिस्तानचं धोरण निर्यात करण्यापेक्षा आयातीचं जास्त राहिलं आहे. यामुळे आर्थिक संकटात भर पडली आहे. व्यापारी तूट सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होतो. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ न बसणं हे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला येण्यामागचं कारण आहे. आर्थिक प्रगती संथ असल्यामुळे रोजगार निर्मिती जवळपास ठप्प झाली आहे.
 
वर्ल्डकपमधून प्रेरणा?
पाकिस्तानमध्ये माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचं सरकार आहे. इम्रान यांनी 1992 साली युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या पाकिस्तानला विश्वविजेतेपद मिळवून दिलं होतं.
 
देशापुढे सत्तर वर्षातलं सगळ्यांत मोठं संकट घोंघावतं आहे. मात्र वर्ल्डकप विजयावेळी ज्या पद्धतीने एकीचं बळ सिद्ध करत काम केलं होतं, तसं या संकटाला तोंड देऊ असं इम्रान यांनी म्हटलं आहे.