रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

पाकिस्तानी मुलींशी लग्न करुन चिनी लोक त्यांना वेश्याव्यवसायात ढकलताहेत?

संयुक्त राष्ट्र आणि ह्युमन राईट्स वॉच या स्वयंसेवी संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर तरुणींना चीनमध्ये नेण्यात येत असल्याचं सांगत काळजी व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालानुसार पाकिस्तानप्रमाणेच आशियातल्या इतर पाच राष्ट्रांमध्येदेखील असे प्रकार समोर आले आहेत.
 
या अहवालाचा दाखला देत पाकिस्तानात मानवाधिकारासंबंधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात चिनी नागरिक लग्न करण्यासाठी येत आहेत आणि इथल्या मुलींशी लग्न करून त्यांना चीनला नेत आहेत. मात्र, यामागचा उद्देश संसार करणं हा नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या देहविक्रेयाचा हा एक भाग असल्याचं म्हटलं जातं आहे. याविषयावर बीबीसीने फैसलाबादमधल्या एका तरुणीशी बातचीत केली. या मुलीचंही एका चिनी मुलाशी लग्न लावून देण्यात आलं होतं. तिने आम्हाला काय सांगितलं, वाचा तिच्याच शब्दात...
 
मी 19 वर्षांची आहे आणि फैसलाबादला राहाते. ही नोव्हेंबर 2018 ची गोष्ट आहे. आम्ही माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला गेलो होतो. तिचं लग्नही एका चिनी मुलाशी झालं होतं आणि आता ती चीनमध्ये आहे. या लग्नातच मलाही पसंत केलं आणि आमच्या नातेवाईकांकडून त्यांनी आमचा नंबर घेतला. फोन करून ते लोक आमच्या घरी आले. मला तीन मुलं बघायला आली होती.
 
माझ्या घरच्यांचा पहिला प्रश्न होता की मुलगा ख्रिश्चन आहे का? तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की हो, मुलगा ख्रिश्चन आहे. पण, हा काही फ्रॉड नाही. पण, आम्हाला विचार करायला फार वेळच मिळाला नाही. दुसऱ्याच दिवशी मेडिकल टेस्टसाठी मला लाहोरला पाठवण्यात आलं. मेडिकल टेस्ट झाल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी आम्हाला लग्न करायचं आहे, असं कळवलं. माझ्या घरच्यांनी सांगितलं की आम्हाला इतक्या लवकर लग्न करायचं नाही.
 
पण, त्या चिनी लोकांसोबत जो पाकिस्तानी प्रतिनिधी होता तो म्हणाला की जे होईल याच महिन्यात होईल. कारण पुढच्या महिन्यात त्यांना चीनला परत जायचं आहे आणि त्यानंतर ते येणार नाही. त्यामुळे (लग्न) करायचं असेल तर याच महिन्यात करा. आमचा सगळा खर्च ते करतील, असंही त्यांनी सांगितलं.
 
माझ्या कुटुंबीयांनी आम्हाला काही नको म्हणत नकार दिला. तर ते म्हणाले तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका. पाकिस्तानात मुलाकडचे लोक जसे मुलीला कपड्यांसाठी पैसे देतात तसंच आम्ही करू. माझ्या घरच्यांनी चुलत बहिणीचा अनुभव बघता लग्नासाठी होकार दिला आणि माझं लग्न झालं.
 
चीनला जाण्याची माझी कागदपत्रं तयार होत होती तोवर त्यांनी मला सात मुलींसोबत एकाच घरात ठेवलं.
लाहोरच्या डिव्हाईन रोडवर त्यांनी एक घर घेतलं होतं. एकूण तीन घरं होती. त्यातली दोन घरं एकाच गल्लीत तर एक घर दोन गल्ल्या सोडून होतं. तिथे सगळे चिनी होते. शेवटचं लग्न माझं होतं. माझ्या आधी त्या सातही मुलींची लग्न झाली होती. सगळ्या मुली ख्रिश्चन होत्या.
 
मी माझ्या नवऱ्याशी गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून बोलायचे. कधीकधी भाषांतर बरोबर असायचं तर कधी चूक. एक शिक्षकही होता. आम्हा सर्व मुलींची सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चिनी भाषेची शिकवणी असायची.
 
चिनी लोकांसोबत जो पाकिस्तानी प्रतिनिधी होता तो फार चलाख होता. (मुलींची जबाबदारी त्याच्यावर होती.) तो मुलींशी वाईट भाषेत बोलायचा. शिवीगाळ करायचा. एखाद्या मुलीने घरी जायचं आहे, म्हटल्यावर तो नको ते आरोप करायचा आणि ब्लॅकमेल करायचा.
 
ज्या मुलाशी माझं लग्न झालं होतं त्याला मी फक्त तीन वेळा भेटले होते. पहिल्यांदा तो मला बघायला आला तेव्हा, दुसऱ्यांदा मेहंदीच्या कार्यक्रमात बघितलं आणि त्यानंतर लग्नात भेटलो. मुलगा 21 वर्षांचा होता. लग्नानंतर मला कळलं की त्याचा हात अधू होता आणि तो ख्रिश्चनही नव्हता.
 
मी त्या पाकिस्तानी प्रतिनिधीला सांगितलं तर तो मला ब्लॅकमेल करू लागला. म्हणाला, त्याने (लग्नाच्या) हॉलसाठी जे पैसे खर्च केले आहेत ते तो परत घेईन. तुमच्या विरोधात पोलिसात जाईल. तुम्ही चिनी लोकांचा विश्वासघात केला आहे. त्यानंतर त्याने माझा मोबाईल हिसकावून घेतला. आम्हा सगळ्या मुलींचे मोबाईल फोन तपासले जायचे.
 
तिथे असताना चीनला गेलेल्या माझ्या इतर मैत्रिणींशीही माझं बोलणं व्हायचं. एकीने मला सांगितलं होतं की तिथे जेवणात फक्त साधा भात देतात आणि एका खोलीत बंद करून ठेवतात. संध्याकाळी नवरा आपल्या मित्रांना घरी आणतो. फक्त एवढंच सांगितलं होतं. तिच्याबरोबर काय होत असणार, हे मला कळून चुकलं होतं. ती खूप रडत होती.
 
माझी कागदपत्रं तयार झाली होती. फक्त व्हिसा यायचा होता.
 
ते मला घरी जाऊ देत नव्हते. मी म्हटलं माझा मामा आजारी आहे. तर म्हणाला त्यांनाच इथे बोलवू. इथेच त्यांच्यावर उपचार करू. तू कुठेच जायचं नाही. खूप प्रयत्नानंतर माझ्या घरच्यांशी माझा संपर्क झाला. ते मला घ्यायला आले. मी घरी परत आले. माझ्या कुटुंबियांनी मला म्हटलं तुझ्या मनाला जे पटत असेल तेच तू कर. मला ब्युटी पार्लरचं काम येतं तर तेच करावं, असा माझा विचार आहे.
 
आता मला भीती वाटत नाही. फक्त इतर मुलींची सुटका झाली असती तर बरं झालं असतं. ज्यांना (याविषयी) माहिती नाही त्यांनी लग्न करू नये.
चीनी मुलांच्या लग्नामागचं सत्य
लाहोरमधल्या डिव्हाईन रोड आणि ईडन गार्डन भागात एका ओळीत घरं आहेत. तिथे चीनमधली माणसं राहतात. इथल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामासाठी म्हणून ते आले आहेत. यातले काही व्हिसाच्या शिथील नियमांमुळे इथे आरामात राहात आहेत. ही लोकं काय काम करतात, हे देखील अनेकांना माहिती नाही.
 
मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मते पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात चीनमधली माणसं लग्नासाठी येऊन मुलींशी लग्न करून त्यांना चीनमध्ये नेत आहेत. लाहोरमधले सामाजिक कार्यकर्ते सलीम इकबाल यांचं म्हणणं आहे की हे लग्न नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या देहव्यापाराचा हा एक मार्ग आहे.
 
ते सांगतात, "मी आतापर्यंत पोलीस, फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सी (FIA) आणि इतर सुरक्षा संस्थांना कळवलं आहे. वर्षभरानंतर जेव्हा मुस्लीम तरुणींसोबत या घटना घडू लागल्या तेव्हा कारवाई सुरू झाली."
 
 सलीम यांनी सांगितलं की सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये गुजरांवाला आणि नवाही या भागांमध्ये पत्रकं आणि बॅनरच्या माध्यमातून चिनी मुलांविषयी सूचना देण्यात आली.
 
"काही प्रकरणांमध्ये तर कुटुंबियांना हकीगत कळली आणि त्यांनी आपल्या मुलींना परत बोलावलं. मात्र, इतर अनेक प्रकरणांमध्ये गरिबांना तीन ते चार लाख देऊन त्यांच्या मुलींची लग्नं लावण्यात आली."
 
सलीम यांच्या मते एका वर्षात लाहोर, गुजरांवाला, फैसलाबाद आणि मुल्तान या भागातून 700 लग्नं झाली आहेत. यातल्या बहुतांश मुली या ख्रिश्चन आहेत.
 
ही बाब मीडियासमोर आली जेव्हा पंजाबमधल्या एका मुस्लीम मुलीचं प्रकरण समोर आलं. एका धार्मिक संघटनेने हे प्रकरण लावून धरलं होतं.
 
'संस्थांना याविषयाची माहिती आहे'
इरफान मुस्तफा शिक्षक आहेत आणि गेल्या चार महिन्यात पंजाब भागात त्यांनी जवळपास दहा लग्नं लावून दिली आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "आम्ही प्रत्येक लग्न खूप काळजीपूर्वक लावून दिलं आहे. शिवाय, ही लग्नं कोर्टाच्या माध्यमातून झाली आहेत. जिथे मुलगा आणि मुलगी दोघांनाही हजर केलं जातं."
 
इरफानने चिनी मुलांशी लग्न लावून दिल्यानंतर चीनमध्ये मुलींकडून देहव्यापार केला जात असल्याचा इनकार करत म्हटलं की "या गोष्टी मीडियाने पसरवल्या आहेत आणि त्यात काहीच तथ्य नाही."
 
त्यांचं म्हणणं आहे की असं प्रत्येकच लग्नात होतं. ते म्हणतात, "अनेकदा लग्न झाल्यानंतर दोघांचे विचार जुळत नाही. यामुळे नवरा-बायकोमध्ये वाद होतात. याचा अर्थ लग्न बळजबरीने लावण्यात आलं, असा होत नाही."
 
याबरोबर ते विचारतात की, "एका देशातून दुसऱ्या देशात मुलींची तस्करी होत असेल आणि संबंधित संस्थांना याची कल्पनाच नाही, असं होऊ शकतं का? काय होतंय, हे संस्थाना माहिती आहे."
 
दरम्यान, FIA ने एका महिलेसह आठ चिनी नागरिकांना अटक केली आहे. महिलांची तस्करी आणि फसवणूक या कलमाखाली ही अटक झाली आहे. गेल्याच आठवड्यात दोन चिनी नागिरकांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी महिलांचा लैंगिक छळ आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करीचा त्यांच्यावर संशय आहे. यातल्या बहुतांश मुली या गरीब ख्रिश्चन समाजातल्या आहेत. या टोळीच्या चार पाकिस्तानी हस्तकांनाही अटक करण्यात आलीय.
 
'मुलगा CPEC मध्ये काम करतो'
 
लाहोरमधल्या नादिराबाद, बट चौक, डिव्हाईन रोड यासारख्या वेगवेगळ्या भागातून आठ मुलींनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फराह जफर नावाच्या मुलीनेही एक तक्रार केली आहे. तिची आई आणि लग्न लावून देणाऱ्या संघटनेच्या एका व्यक्तीने पैशांच्या बदल्यात बळजबरीने लग्न लावून दिल्याचा तिचा आरोप आहे..
 
या तक्रारींमध्ये लाहोरमधल्या कोर्ट भागातून दाखल एका अहवालात एका मुलीने आपल्या चीनी नवऱ्यावर हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली आहे.
 
काही मुलींनी आपल्या तक्रारींत म्हटलं आहे की मुलगा CPECमध्ये (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर) असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, तसं नाही, हे चीनमध्ये गेल्यावर कळलं. यातल्या बहुतांश प्रकरणांमध्ये मुलगी एकदा चीनला गेली की तिच्याशी संपर्क करणं, जवळपास अशक्य होऊन जातं.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की या सर्व प्रकरणांमध्ये एकसारखी पद्धत अवलंबण्यात आली आहे. यात एक महिला, तीन पुरूष एखाद्या कुटुंबाच्या घरी जातात आणि लग्नाच्या खर्चापासून चीनला जाईपर्यंतचा सर्व खर्च स्वतः करतात.
 
"काही प्रकरणांमध्ये लग्न यशस्वी ठरल्याचं सांगितलं जातंय. मात्र, ही ती अशी लग्नं असू शकतात ज्यात मुलींना समोर येऊन बोलण्याची संधीच मिळाली नाही."
 
चीन-पाकिस्तान मैत्री आणि मोठी किंमत
पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीला CPEC शी जोडल्या गेलेल्या फायद्याच्या दृष्टीकोनातून बघितलं जातं. त्यामुळेच नुकत्याच घडणाऱ्या घटना आणि त्यानंतर दाखल होणाऱ्या तक्रारी यांच्याकडे कानाडोळा करण्यात येतोय.
 
याविषयी बोलताना पंजाब असेंब्लीचे सदस्य तसंच मानवाधिकार आणि अल्पसंख्याक विषयाचे मंत्री एजाज आलम ऑगस्टेन यांनी बीबीसीला सांगितलं की "दोन महिन्यांपूर्वी एका चिनी व्यक्तीला इस्लामाबाद विमानतळावरून अटक करण्यात आली. पाकिस्तानी तरुणीला बळजबरीने घेऊन जात असल्याचा त्याच्यावर आरोप होता."
 
त्यांनी सांगितलं की पंजाबमध्ये पादरी आणि चर्च लग्न लावून देत आहेत.
 
"याच कारणामुळे आम्ही लायसन्सिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे चर्चला लायसन्स घेणं बंधनकारक असेल आणि तिथल्या पादऱ्यांनाही. जो प्रार्थना करतोय तोच लग्नही लावून देईल, हे होणार नाही. हे करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बळजबरीनं होणारी लग्नं थांबवणं हा आहे."
 
यावेळी चीनमध्ये लैंगिक असमतोल आहे. तिथे महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या खूप मोठी आहे. चीनमध्ये 1979 ते 2015 या काळात 'एकच अपत्य' हे धोरण काटेकोरपणे बजावण्यात आलं. तेही यामागचं एक मोठं कारण आहे.
 
संशोधकांच्या मते या धोरणामुळे चीनमधल्या अनेक कुटुंबांनी मुलाला प्राधान्य दिलं. यामुळेच हा असमतोल वाढतोय. परिणामी चिनी पुरुषांना इतर देशांमध्ये जावं लागतंय. यामुळे या सर्व घटनाक्रमातून लाभ उचलणाऱ्या टोळ्यांचाही जन्म झाला. या टोळ्या चीनमध्ये मुलींची तस्करी करत आहेत.