मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (18:45 IST)

Aryan Khan: संजय दत्त ते राहुल महाजन- वलयांकित कलाकार, राजकारण्यांच्या मुलांचं ड्रग्ज कनेक्शन

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने मुंबईहून गोव्याला रवाना होणार असलेल्या एका क्रूझवर छापा टाकला. यावेळी काही लोकांना अटक करण्यात आली आहे. तिथे एक रेव्ह पार्टी सुरू असल्याचं समजतं. यात अनेक लोक सामील होते. बॉलीवूड सुपरस्टार शाहरूखन खानचा मुलगा आर्यन खानही तिथे उपस्थित होता. एनसीबीने आर्यनला अटक केली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.
 
अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आर्यनची एनसीबी अधिकारी कसून चौकशी करत आहे अशी चर्चा आहे. अधिकाऱ्यांनी आर्यनचा फोनही चेक केल्याचं वृत्त आहे. आर्यनचा याप्रकरणात थेट समावेश होता की नाही, त्याने ड्रग्स खरेदी केले होते का यासंदर्भात तपास सुरू आहे. याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. मोठ्या वलयांकित कलाकारांचे मुलंमुली ड्रग्ज केसमध्ये अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही.
 
संजय दत्त
बॉलीवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये ड्रग्जसंदर्भात शंकास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकवेळा अशी प्रकरणं समोरही आली आहेत, मात्र या तपासाचा कोणताही गंभीर परिणाम जाणवलेला नाही. चित्रपटसृष्टीतल्या काही मंडळींना ड्रग्ज सेवनासाठी तुरुंगात जावं लागलं आहे तर काहींना ड्रग्जच्या विळख्यातून सुटण्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटरचा आधार घ्यावा लागला आहे. मोठ्या कलाकारांच्या मुलांचा विषय निघतो तेव्हा सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्तचा उल्लेख येतो.
 
तरुण असताना संजय दत्त ड्रग्ज घेत असे. संजयच्या जीवनावर असलेल्या संजू चित्रपटात संजयच्या यासंदर्भात स्पष्टपणे दाखवलं आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आई नर्गिस दत्त यांचं निधन झाल्यानंतर संजय यांचं ड्रग्जसेवनाचं प्रमाण वाढलं होतं. ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी यासाठी सुनील दत्त यांनी संजयला अमेरिकेतील रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलं होतं. तिथून ठीक होऊन परतल्यानंतर संजयने चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं.
 
फरदीन खान
अभिनेत फिरोझ खान यांचा मुलगा फरदीन खानला 2001 मध्ये मुंबई पोलिसांनी ड्रग्जसह पकडलं होतं. चित्रपटात चांगलं यश मिळत असताना फरदीनला ड्रग्सची सवय लागली होती. फरदीनला कोकेनसह जुहू इथून पकडण्यात आलं होतं. यातून सुटका होण्यासाठी फरदीनला प्रदीर्घ अशी कायदेशीर लढाई लढावी लागली.
 
प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर रिहॅब सेंटरच्या माध्यमातून उपचार घेतल्यानंतर त्याने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली होती. त्यामुळे त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही.
प्रतीक बब्बर
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने ड्रग्जच्या सवयीबद्दल सांगितलं होतं. बीबीसीशी बोलताना प्रतीक म्हणाला होता, "मी लहान वयात ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. चित्रपटातलं कारकीर्द सुरू झाली. काम मिळालं. नंतर काम मिळेना. मात्र ड्रग्जची सवय राहिली. ड्रग्जविना माझी अवस्था बेकार होती. रोज सकाळी मला अस्वस्थ वाटत असे. शरीर अनेक ठिकाणी दुखत असे.
 
"कधी मला गरम वाटत असे तर कधी थंडी जाणवत असे. जेव्हा मला आवडणारं ड्रग्ज मिळत नसत, तेव्हा मी मिळेल ते ड्रग्जचं सेवन करत असे. माझ्यासाठी हे खूपच घातक होतं."
 
त्याची बिघडणारी अवस्था पाहून त्याला रिहॅब सेंटरमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याच्या सवयीवर उपचार करण्यात आले, त्यानंतरची ड्रग्जची सवय सुटली. प्रतीक आता सुरळीत आयुष्य जगत आहे आणि चित्रपटांमध्येही त्याने पुनरागमन केलं आहे.
 
राहुल महाजन
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आणि बिग बॉस स्पर्धेतील सहभागामुळे चर्चेत राहुल महाजन ड्रग्जप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याच्यावर ड्रग्जसेवनाचा आरोप होता आणि त्यासाठी त्याला तुरुंगातही जावं लागलं.
 
ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती ढासळली आणि गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राहुलने सर्व आरोप फेटाळले होते.
सारा खान आणि श्रद्धा कपूर
अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्धी शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर यांची नावं ड्रग्जप्रकरणी समोर आली होती.
 
सुशांत राजपूतच्या ड्रग्जसंदर्भातील प्रकरणाची एनसीबीकडून चौकशी सुरू असताना सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासह रकुलप्रीतसिंह आणि दीपिका पदुकोणचं नाव समोर आलं होतं.
 
सप्टेंबर 2020मध्ये एनसीबीने या सगळ्यांची अनेक तास चौकशी केली. इलेक्ट्रॉनिक गॅझेटही ताब्यात घेण्यात आले जेणेकरून अधिक माहिती मिळावी. ड्रग्जप्रकरणी या अभिनेत्रींची नावं येताच प्रकरण तापलं होतं. अद्याप याप्रकरणी कोणताही निकाल लागलेला नाही.