शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जुलै 2020 (19:53 IST)

'श्यामची आई'वरील मीम्सचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत का गेला?

प्रतिभावंत लेखक आणि समाजसुधारक साने गुरुजी यांच्यावरील मीम्समुळे सध्या वादाला तोंड फुटलं आहे.
 
सोशल मीडियावरील काहीजणांकडून मास्क आणि दारू यांबाबतच्या मीम्ससाठी 1953 साली प्रदर्शित झालेल्या 'श्यामची आई' सिनेमातील दृश्यांचा आधार घेतला जात आहे.
 
'श्यामची आई' सिनेमा पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींच्या पुस्तकावर आधारित असून आचार्य अत्रेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. 1954 साली हा सिनेमा भारत सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला होता.
 
'श्यामची आई'वरील मीम्सवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे याबाबत ईमेलद्वारे तक्रारही नोंदवली आहे.
 
त्या 'मीम्स'मध्ये नेमकं आक्षेपार्ह काय आहे?
बीबीसी मराठीशी बोलताना हेरंब कुलकर्णी म्हणाले, "श्यामची आई पुस्तकाने 85 वर्षं महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना संस्कारी बनवले आहे. नैतिक प्रेरणा रुजवल्या आहेत. श्याम आणि त्याची आई हे प्रेम, विवेक, संस्कार सामाजिक भान याचे प्रतीक बनले आहेत. समाज अशा प्रतिकांनी प्रेरणा घेत असतो. तेव्हा इतर सगळे विषय सोडून केवळ 'श्याम' आणि 'श्यामची आई' यावर अनेक प्रतिमाभंजन करणारी चित्रे येऊ लागतात, दहा वर्षाच्या मुलाला तोंडी दारू पिण्याची भाषा टाकली जाते, तेव्हा ते अस्वस्थ करणारे आणि संतापजनक असते."
 
हेरंब कुलकर्णी यांनी आक्षेप नोंदवलेल्या मीम्समध्ये श्यामची आईच्या तोंडी 'श्याम, बायकोला दारुचा वास येऊ नये आणि कोरोना होऊ नये यासाठी काय वापरशील?' हे प्रश्नार्थक वाक्य, तर श्यामच्या तोंडी 'मास्क' असं उत्तर दाखवण्यात आलंय.
 
हेरंब कुलकर्णी यांनी या मिमवर आक्षेप घेतला. मात्र, त्यांच्या म्हणण्यांनुसार, माझ्या आक्षेपानंतर सोशल मीडियावरील अनेकांनी आणखी अशाच पद्धतीचे बदनामीकारक मीम्स तयार केले आहेत.
 
मात्र, श्यामची आई किंवा श्याम हे कादंबरीतील पात्र आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नाही का करता येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र,त्यावर उत्तर देताना हेरंब कुलकर्णी प्रश्न विचारतात, "राम आणि कृष्ण या काल्पनिक व्यक्तिरेखा होत्या, असेही मानणारे लोक आहेत. पण त्यांच्यावरील चित्रपटातील प्रतिमांची ही अशा प्रकारच्या मीम्स लोक करतील का?"
 
ते पुढे म्हणतात, "पुतळ्याची विटंबना करताना तो दगडाचा असतो असा युक्तिवाद आपण करतो का? मानबिंदू लक्षात घेतले पाहिजेत आणि मानबिंदू म्हणजे त्यांचे विचार त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विकृती यात फरक करायला हवा."
 
पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद
हेरंब कुलकर्णी यांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार केलीये. शिवाय, अशाप्रकारे मीम्स व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी हेरंब कुलकर्णींनी केलीय.
 
दुसरीकडे, साने गुरुजी ज्या संघटनेचे संस्थापक होते, त्या राष्ट्र सेवा दलानंही 'श्यामची आई'संदर्भातील मीम्सची गंभीर दखल घेत, पोलीस ठाण्यात धाव घेतलीये.
 
"श्यामची आईबद्दल मीम्स तयार करून फेसबुकवर विकृत लिखाण फिरत आहे. अशा अज्ञात विकृत माणसाचा आपण शोध घ्यावा. कारण या गोष्टीमुळे समाजात तीव्र असंतोष आहे. त्यामुळे याची योग्य दखल घेऊन सायबर गुन्हा दाखल करावा," अशी तक्रार विनंती राष्ट्र सेवा दलाच्या पुणे जिल्हा विभागानं पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात केलीय.
 
समाजातील वंदनीय व्यक्तींचा अवमान होणं योग्य नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अवमानाला आळा घालण्यासाठीच्या संबंधित कायद्याद्वारे पोलिसांनी कारवाई करावी, असं राष्ट्र सेवा दलाच्या पुणे जिल्ह्याच्या सदस्या अॅड. शारदा वाडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
शिवाय, राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्रातील सर्वच शाखा जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारपत्र देतील, अशीही माहिती अॅड. वाडेकर यांनी बीबीसी मराठीला दिली.
 
मात्र, सोशल मीडियावरील मीम्सवर कुठली कारवाई होऊ शकते का, याबाबत बीबीसी मराठीनं कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्याकडून जाणून घेतलं.
 
अॅड. असीम सरोदे म्हणतात, "अशाप्रकारचे मीम्स तयार करणं चुकीचंच आहे. मात्र, कायद्याच्या दृष्टीने हा अदखलपात्र गुन्हा आहे."
 
"कुणाविरोधात कारवाई करायची झाल्यास त्याचं नाव, गाव, पत्ता इत्यादी माहिती लागते. अज्ञाताविरोधात तक्रार करू शकतो, मात्र तिथेही आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी स्रोत किंवा काहीतरी धागेदोरे द्यावे लागतात. एवढं असूनही पोलिसांनी आरोपीला पकडल्यास त्याला समज देऊन सोडलं जाईल."
 
"कायदेशीर आणि नैतिक असे दोन प्रकारचे गुन्हे असतात. हा नैतिक गुन्हा आहे आणि नैतिक गुन्हे हे बऱ्याचदा अदखलपात्र असतात," असं अॅड. असीम सरोदे सांगतात.
 
पोलिसात जाण्यावरून सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये दुमत
सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यावर आक्षेप घेतलाय.
 
सुरेश सावंत म्हणतात, "ज्यांनी हे मिम केलं ती तरुण मुले असून ती त्यांच्या पिढीच्या नव्या फॉर्ममध्ये व्यक्त होत आहेत. या मीम्समागे त्यांचा गैर हेतू नव्हता असे काही मित्रांचं म्हणणॆ आहे. काहीही असो. एकूणच अशा प्रकरणात कारवाईची मागणी करू नये, त्याबद्दल आपले वेगळं म्हणणं, निषेध जरुर नोंदवावा आणि ते प्रकरण सोडून द्यावं असं माझं मत आहे."
 
"हे औचित्याला धरून आहे का, नैतिकतेला धरून आहे का, हा आपल्या चर्चेचा भाग आहे. मुळातच किमान समज असलेली कुणीही व्यक्ती असे मीम्स तयार करणार नाही. त्यामुळे हे प्रकरण कायद्याच्या चौकटीत सुटण्यापेक्षा आपण तरुणांच्या वैचारिक प्रबोधनावर भर दिल्यास सुटेल," असंही सावंत यांचं म्हणणं आहे.
 
मात्र, हेरंब कुलकर्णी म्हणतात, "महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याबाबतच्या विनोदांकडेही आपण असंच दुर्लक्ष केलं. परिणामी आज गांधी आणि नेहरूंबाबत नव्या पिढीला त्या विकृती सत्य वाटाव्यात इतक्या पद्धतीने पसरल्या आहेत. त्यामुळे समाजाचे मानबिंदू असणाऱ्या व्यक्ती यांच्या विकृत चेष्टाकडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा श्याम आणि त्याची आई हे जणू विनोदासाठी आहेत असा समज होईल."
 
सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांनी सुरेश सावंत आणि हेरंब कुलकर्णी यांच्या मतांमधील सुवर्णमध्य साधणारी भूमिका मांडली आहे.
 
'मीम्स'कारांना विश्वभंर चौधरींचं आवाहन
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणतात, "मीम्सच्या माध्यमातून होणारी अभिव्यक्ती मान्यच आहे. तरूण पिढीची ती भाषा आहे. आमच्या पिढीला ही भाषा कळवूनही घेतली पाहिजे आणि त्या भाषेचं कौतुकही केलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेच्या 19 व्या कलमानुसार आहेच. ते येतं वाजवी बंधनांसह. विथ रिझनेबल रिस्ट्रिक्शनन्स. ती बंधनं कायदेशीर देखील आहेत आणि नैतिक देखील असावीत असं कोणत्याही मानवी मूल्य सांभाळणाऱ्या समाजात अभिप्रेत आहेच."
 
"तरूण मित्रांनो, तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहरत राहो, ते टिकावं म्हणून मी लढेन तुमच्या सोबत. पण फक्त त्या अभिव्यक्तीला रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असू द्या. तेच समाजाच्या हिताचं आहे," अशी विनंती चौधरींनी केली.
 
तसंच, मीम्सच्या अनुषंगाने सुरू झालेला वाद थांबवण्याचं आवाहनही विश्वंभर चौधरी यांनी केलंय.
 
"पोलीस केस वगैरे गोष्टी होऊ नयेत. तरूण मुलं आहेत, कधीतरी चुकीचं व्यक्त होऊ शकतात. समजावून सांगून सामोपचारानं पुढे जाऊ," असं चौधरी म्हणाले.