शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (15:23 IST)

शिवसेना : शिवाजी पार्कचं नाव 'शिवतीर्थ' कसं झालं?

शिवसेना म्हटलं की जुन्या मुंबईकराच्या डोळ्यांसमोर दोन गोष्टी नक्की येतात... शिवसेना भवनाची जुनी दगडी इमारत...आणि दसऱ्याला शिवसैनिकांनी खचाखच भरलेल्या शिवतीर्थावर - शिवाजी पार्कात भाषणासाठी कमरेवर हात ठेऊन उभे असलेले बाळासाहेब.
 
शिवसेनेच्या स्थापनेपासून ते पक्षासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या प्रत्येक घटनेला शिवाजी पार्क साक्षीदार आहे.
 
आज संध्याकाळी ठाकरे कुटुंबातली पहिली व्यक्ती याच 'शिवतीर्थावर' महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल.
 
या शिवाजी पार्कचं पहिलं नाव होतं - माहीम पार्क. दादरच्या पश्चिमेला असणारं हे 28 एकरांचं खुलं मैदान तेव्हा चहूबाजूंनी मराठी वस्तीने वेढलेलं होतं. 'पार्कातलं' उद्यान गणेशाचं मंदीर आणि मैदानात रंगणारे क्रिकेटचे डाव, आणि समर्थ व्यायाम मंदिरातला मल्लखांब यासगळ्यासोबतच शिवसेनेचा दसरा मेळावा ही या शिवाजी पार्कची खास ओळख.
 
'प्रबोधनकार' केशव ठाकरे,बाळासाहेब ठाकरे, उद्धव आणि आदित्य अशा ठाकरे कुटुंबातल्या 4 पिढ्यांसाठी दादर पश्चिमेतलं हे शिवाजी पार्क मैदान महत्त्वाचं ठरलंय.
 
प्रबोधनकार ठाकरे दादर परिसरामध्ये रहात. दादरमध्येच त्यांनी पहिल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाला खांडके बिल्डिंगमधून सुरुवात केली होती.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान त्यांनी याच शिवाजी पार्कात झालेल्या सभांमध्ये प्रबोधनकारांचा सहभाग होता.
 
आता याच शिवाजी पार्कपासून अगदी हाकेच्या अंतरावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेलं दालन आहे.
 
शिवसेनेचा जन्मही शिवाजी पार्क परिसरातला. '77 ए रानडे रोड' या ठाकरेंच्या जुन्या घरातला. 'मार्मिक'चा जन्मही इथलाच. 13 ऑगस्ट 1960ला मार्मिकला सुरुवात झाली.
 
19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 1966ला पहिला दसरा मेळावा याच शिवाजी पार्कात पार पडला होता. तेव्हापासून शिवसेनेची ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे.
 
'जय महाराष्ट्र - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात, "शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर बराच काळ जाहीर सभा झालेली नव्हती. कार्यकर्ते घरी येऊन भेटत होते. शेवटी जाहीर सभा घेण्याचं ठरलं आणि ती शिवाजी पार्कवर घ्यायचं ठरलं.
 
तेव्हा शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरेल की नाही अशी भीती खुद्द बाळासाहेब ठाकरेंना वाटत होती. म्हणून नेहमी जिथे एका कडेच्या टोकाला स्टेज उभारलं जातं, त्याऐवजी मधोमध स्टेज उभारण्यात आलं. म्हणजे समोरचा छोटा भाग भरला तरी चालेल. पण प्रत्यक्षात प्रचंड गर्दी झाली. अजूनही दसरा मेळावा तिथेच होतो. एखाद्या पक्षाने, दरवर्षी एका ठराविक दिवशी, एकाच जागी वर्षानुवर्षं सलगसभा घेणं हा रेकॉर्ड असावा."
 
या शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं भाषण करतानाच बाळासाहेबांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. इंदिरा गांधींनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला त्यांनी 1975मध्ये पाठिंबा जाहीर केला तो याच मैदानातून. नंतर 1985मध्ये शिवसेनेची हिंदुत्वाविषयीची भूमिकाही त्यांनी याच मैदानातून जाहीर केली होती.
 
प्रकाश अकोलकर म्हणतात, "1978च्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा पराभव सोसावा लागला. त्यावेळी शिवसेना जिंकेल असं वाटत होतं. त्यानंतर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत, 'तुमचा (मुंबईकरांचा) माझ्यावर विश्वास नाही, तर मी शिवसेना सोडून जातो,' असं म्हटलं होतं. त्यानंतर 1985च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेची पालिकेत स्वबळावर सत्ता आली. त्या नंतरच्या सभेला मी हजर होतो. त्यावेळी कांगा नावाचे कमिशनर होते. कांगांनी जर ऐकलं नाही, तर शिवसैनिकांनी त्यांच्या कानाखाली आवाज काढावा' असं बाळासाहेब त्या सभेत बोलले होते.
 
1991च्या मेळाव्यात त्यांनी घोषणा केली होती, की कोणत्याही परिस्थिती वानखेडे स्टेडियमवर मुंबईत पाकिस्तानचा सामना होऊन देणार नाही. त्याचं पुढे काय झालं, ते आपल्याला माहितच आहे. नंतर शिशिर शिंदे, प्रभाकर शिंदे आणि शिवसैनिकांनी वानखेडेवर जाऊन पिच खोदलं आणि त्यावर डांबर टाकलं. परिणामी तिथे मॅच होऊ शकली नाही."
 
2010मध्ये मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कचा समावेश 'सायलेंट झोनमध्ये' केला. शिवसेनेचं मुखपत्रं असणाऱ्या सामनातून बाळासाहेबांनी या निर्णयावर टीका केली होती. अखेर पक्षाला इथे वार्षिक मेळावे घेण्याची परवानगी मिळाली.
 
Skip Facebook post by BBC News MarathiEnd of Facebook post by BBC News Marathi
1995 सेना - भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा मोठा भाऊ असणाऱ्या शिवसेनेला 73 तर भाजपला 65 जागा मिळाल्या होत्या. साहजिकच मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे गेलं आणि मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली मनोहर जोशींची. सामान्य शिवसैनिकालाही या सोहळ्यात सहभागी होता यावं म्हणून शपथविधी राजभवनावर न करता तेव्हाही शिवाजी पार्कात करण्यात आला होता. लाखो शिवसैनिकांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
 
आदित्य ठाकरेंकडे भारतीय युवा सेनेची सूत्रंही याच शिवाजी पार्कातल्या मेळाव्यात देण्यात आली होती.
 
2012मध्ये बाळासाहेब दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येणार, अशी चर्चा होती. त्यांची प्रकृती तेव्हा खालावलेली होती, आजारपणं सुरू होती. कदाचित ही बाळासाहेबांची शेवटची सभा असेल या ओढीने लाखो शिवसैनिक दाखल झालेले होते. पण बाळासाहेब प्रत्यक्ष सभेसाठी येऊ शकले नाहीत. पण रेकॉर्डेड भाषणातून त्यांनी थरथरत्या आवाजात याच शिवाजी पार्कात शिवसैनिकाला आवाहन केलं, "एवढंच म्हणेन...आपण मला सांभाळलंत, मी तुम्हाला सांभाळलं. मला सांभाळलंत तसंच उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या"
 
बाळासाहेबांच्या निधनानंतर लाखो शिवसैनिकांनी साश्रूनयनांची याच मैदानात त्यांना निरोप दिला. बाळासाहेबांवर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या शिवाजी पार्कच्या एका भागामध्ये आज त्यांचं स्मृतीस्थळ आहे.
 
शिवाजी पार्कपासून अगदी जवळ असणाऱ्या महापौर बंगल्यामध्ये आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होणार आहे.
 
बाळासाहेबांच्या पत्नी - मीनाताई ठाकरे, ज्यांना 'मां' म्हटलं जायचं त्यांचाही पुतळा या शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारापाशी आहे.
 
शिवसेनेत एकेकाळी युवानेते म्हणून सक्रीय असणाऱ्या राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची स्थापनाही याच शिवाजी पार्कात केली आणि त्यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'च्या सभाही याच शिवाजी पार्कात पार पडतात.
 
ठाकरे कुटुंब आणि शिवाजी पार्क
'द कझिन्स ठाकरे : उद्धव, राज अॅण्ड द शॅडो ऑफ देअर सेनाज' पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात, "प्रबोधनकार ठाकरे दादर परिसरातच रहायचे. नंतर बाळासाहेबांचं कुटुंब दादरहून कलानगरला मातोश्रीवर रहायला गेलं. पण श्रीकांत ठाकरे शिवाजी पार्कला रहायचे. आणि बऱ्याचदा उद्धव ठाकरे काका श्रीकांत यांच्यासोबत असायचे. राज आणि बाळासाहेब जसे जवळ होते, तसेच उद्धव आणि श्रीकांत ठाकरे अतिशय जवळ होते.
 
उद्धव ठाकरेंना असलेला फोटोग्राफीचा छंद हा काका श्रीकांत ठाकरे यांच्याकडून आलेली आहे. बाळासाहेबांचं लग्नही शिवाजी पार्कजवळच्या महाले - जोशी बिल्डिंगमधल्या घरात झालं होतं. आणि सगळ्याच ठाकरे भावंडाचं, उद्धव ठाकरेंचंही शिक्षण शिवाजी पार्क परिसरातल्या बालमोहन शाळेत झालेलं आहे. हा परिसर आणि ठाकरे यांचं इतकं जवळचं नातं आहे."
 
शिवाजी पार्कचं शिवतीर्थ कधी झालं?
1925 मध्ये या मैदानाला म्हटलं जायचं 'माहिम पार्क'. त्यानंतर याचं नामकरण शिवाजी पार्क असं करण्यात आलं. लोकवर्गणीतून नंतर इथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. पण या 'शिवाजी पार्क'ला शिवतीर्थ म्हणायला सुरुवात केली आचार्य अत्रेंनी.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी या मैदानाचा शिवतीर्थ असा उल्लेख करायला सुरुवात केल्याचं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात. '
 
आज शिवतीर्थावर आचार्य अत्रेंची जाहीर सभा' असे बॅनर्स असायचे. शिवसेना सातत्याने या मैदानाचा उल्लेख 'शिवतीर्थ' असा करत आली असली तरी इतर राजकीय पक्षांनी मात्र य़ाचा उल्लेख नेहमीच 'शिवाजी पार्क' असाच केला. यावरूनच परवा संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना कोपरखळीही मारली. यापूर्वी कधीही शिवतीर्थ न म्हणणाऱ्या पवारांनी, "काय उद्धवजी शिवतीर्थावर ना, बरोबर आहे ना?" असं म्हणत ठाकरेंना कोपरखळी मारली.