शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (13:03 IST)

‘माझ्या कॉस्मेटिक सर्जरीचा खर्च केला, तर सहा महिन्यांसाठी माझं शरीर तुझं’

लिंडा प्रेसली
 
मेक्सिकोमध्ये पश्चिमेला असणारं सिनालोआ राज्य देशातल्या सर्वात शक्तिशाली आणि रक्तरंजित ड्रग कार्टेल म्हणजेच अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांसाठी ओळखलं जातं.
 
तील सिनालोआ हे पश्चिमेकडील राज्य अमली पदार्थांचं सर्वांत शक्तिशाली व रक्तरंजित आगर आहे. यातून येणाऱ्या पैशांचा परिणाम या अंमली पदार्थांचे व्यापारी आणि तरुणींच्या संबंधावर झालाय आणि परिणामी प्लास्टिक सर्जरी करून घेण्याचं प्रमाण स्थानिकांमध्ये वाढलंय.
 
कूलिअकान शहरात डॉ. राफेला मार्टिनेझ टेराझस यांच्या दवाखान्यामध्ये शस्त्रक्रिया करून घ्यायला इच्छुक स्त्रियांच्या अर्जांची थप्पी लागलेली आहे. त्यातील बहुतेकींना स्वतःच्या शरीरावर विशिष्ट तऱ्हेची प्रक्रिया करवून घ्यायची आहे, या प्रक्रियेला आता 'नार्को-अॅस्थेटिक' असं म्हटलं जाऊ लागलंय.
 
"बारीक, कमनीय कंबर... नितंबांचा भाग रुंदावलेला... आणि स्तन सर्वसाधारणतः अधिकाधिक मोठे," असं या प्रक्रियेचं वर्णन मार्टिनेझ करतात.
 
अशाप्रकारचा अतिरेकी व अतिशयोक्त बांधा राखणाऱ्या महिलेचा उल्लेख मॅक्सिकोमध्ये ला बुचुना (la buchona) असा केला होता. विशेषतः तिला भडक, खास डिझाइन केलेल्या वस्तूंची आवड असेल आणि अंमली पदार्थांचा विक्रेता (Narco) तिचा प्रियकर असेल, तर हे संबोधन ठळकपणे वापरलं जातं.
 
 
'ला बुचुना' म्हणजे काय?
या शब्दप्रयोगाचा उगम नेमका कुठून झाला याबद्दल वाद आहे, पण शस्त्रक्रियेद्वारे कमनीय केलेला बांधा असणाऱ्या, भडक कपडे आणि महागडे दागदागिने वगैरे परिधान करणाऱ्या व्यक्तीसाठी हा शब्दप्रयोग केला जातो.
 
अंमली पदार्थांचे विक्रेते अशा 'ला बुचुना' शरीरयष्टीच्या मुली पसंत करतात. पण फक्त फॅशन आहे म्हणून शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्याही अनेक महिला आहेत. प्रत्येकीचा अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध असतोच असं नाही.
 
"माझ्या रुग्णांचं सरासरी वय 30 ते 40 या दरम्यान आहे. पण अनेकदा खूप कमी वयाच्या- अगदी 18 वर्षांपेक्षाही खालच्या अल्पवयीन मुलीही येतात," असं डॉक्टर मार्टिनेझ सांगतात.
 
"त्यांची एकमेकींशी स्पर्धा असते. कोणाचे नितंब सर्वांत उत्तम आहे किंवा कोणाची कंबर सर्वांत बारीक आहे असं."
 
महिला किंवा कुमारवयीन मुली त्यांच्या आईसोबत किंवा मैत्रिणींसोबत सल्ला घ्यायला येतात. इतर काहीजणी एखाद्या पुरुषासोबत किंवा एकट्याने येतात.
 
"अनेकदा त्या बॉयफ्रेंडला सोबत घेऊन येतात आणि सर्जरीचा खर्च त्यांचा हा मित्रच करतो. अनेक असे पुरुषही आहेत जे मला फोन करतात नि सांगतात- डॉक्टर, मी तुमच्याकडे ऑपरेशनसाठी एक मुलगी पाठवतोय."
 
"एकदा एकाने मला फोन केला आणि म्हणाला, की 'माझ्याकडची एक मुलगी तुम्हाला भेटायला येते. तर, डॉक्टर मला काय आवडतं ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं ती काय म्हणतेय त्याकडे लक्ष देऊ नका. त्याचेच मी तुम्हाला पैसे देणार आहे," मार्टिनेझ सांगतात.
 
"मी यासंबंधी त्या माणसाला सांगितलं की, आधी मुलीशी बोलून सगळं ठरवून घ्यावं, कारण एकदा का रुग्ण माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये आली की याबाबत ती घेईल तोच निर्णय मी मान्य करते."
 
या माणसाने राफेला मार्टिनेझ यांच्याकडे शस्त्रक्रियेसाठी जवळपास तीस बायकांना तरी पाठवलं असेल.
 
लायपोस्कल्प्चर
पद्धतीच्या या एका शस्त्रक्रियेला सुमारे 6500 डॉलर इतका खर्च होतो, म्हणजे ही काही स्वस्तातली प्रक्रिया नाही. अनेकदा हे पैसे रोख दिले जातात.
 
"यातला पैसा अर्थातच अंमली पदार्थ तस्करीमधून आलेला असतो," असं मार्टिनेझ सांगतात. "हे अर्थातच चांगलं नाहीये, असं मी म्हणायचे. आता माझा विचार बदललाय असं नाही, पण मी ऑपरेशन करण्यापूर्वी याचा फारसा विचार आता करत नाही. इथली- सिनालोआमधली अर्थव्यवस्था- रेस्टॉरंट, बार, हॉस्पिटलं सगळंच अंमली पदार्थांच्या तस्करीवर अवलंबून आहे."
 
एखाद्या प्रियकराच्या पैशातून ऑपरेशन करवून घेणाऱ्या महिलांशी मार्टिनेझ संवाद साधतात.
 
"प्रियकराला हवी आहे तशी शस्त्रक्रिया करवून घेणं तुम्हाला चालणार आहे का, असं मी संबंधित स्त्रीला विचारते. काही वेळा त्या म्हणतात की, त्याला हवं असेल तसं करा. मग मी त्यांना समजावून सांगते की, काही काळाने तो त्यांचा मित्र असणार नाही, पण त्यांचं शरीर मात्र उर्वरित आयुष्यभर त्यांचंच असणार आहे. म्हणूनच त्यांना स्वतःला काय हवंय आणि त्यांच्या प्रियकराला काय हवंय, यात त्यांना निवड करायची असते."
 
मार्टिनेझ यांच्या कन्सल्टिंग रूममध्ये येणाऱ्या अनेक रुग्णांच्या निमित्ताने त्यांना अनेकदा तात्पुरत्या नातेसंबंधांसाठी जवळ आलेल्या स्त्री-पुरुषांचे दाखले सामोरे येत असतात. सिनालोआतील वैयक्तिक नातेसंबंधांवरही अंमली पदार्थ तस्करीचा प्रभाव पडलेला आहे.
 
"कोणत्याही अंमली पदार्थ विक्रेत्याला सोबत एखादी सुंदर स्त्री असणं अतिशय महत्त्वाचं वाटतं...नार्को म्हणजे अंमली पदार्थ विकणाऱ्या पुरुषाची संकल्पना त्याशिवाय जणू पूर्णच होत नाही," असं पेद्रो म्हणतो (नाव बदललं आहे).
तिशीतला पेद्रो दणकट बांध्याचा आहे. त्याला त्याची ओळख उघड करायची नसल्यामुळे इथे नाव बदललं आहे.
 
तो पर्सनल ट्रेनर अशी स्वतःची ओळख सांगतो. सिनालोआतील अमली पदार्थ तस्करीच्या वर्तुळांमध्ये त्याचा वावर आहे.
 
"पुरुष स्त्रियांसाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. तुमची पत्नी घरात बसून तुमच्या मुलांची देखभाल करते. तुमच्याकडच्या इतर स्त्रिया ट्रॉफीसारख्या मिरवण्यासाठी असतात."
 
नार्कोची पत्नी
सिनालोआतील ड्रग कार्टेलचा कुख्यात माजी म्होरक्या क्वाकीन 'अल चापो' गुझमन याची पत्नी एमा कोरोनेल एस्पुरो हिला जून महिन्यात वॉशिंग्टन डीसीमधील न्यायालयाने दोषी ठरवलं.
 
अंमली पदार्थांचं वितरण करण्यासंबंधी कारस्थान करणं आणि इतर अनेक आरोप तिच्यावर लावण्यात आले होते. मॅक्सिकोतील दुरान्गो इथे 2007 साली एका सौंदर्यस्पर्धेमधील कुमारवयीन स्पर्धक असलेली एमा गुझमानला भेटली, असं सांगितलं जातं. त्याच दिवशी तिने त्याच्याशी लग्न करायला संमती दिली.
 
यात आणखीही काही गोष्टींचा विचार केला जातो.
 
"पुरुषांना स्त्रियांचे मोठे नितंब आणि स्तन यांबद्दल वासना वाटते. त्यामुळे इतर कशाहीपेक्षा वासनेचाच भाग यात जास्त आहे," असं पेद्रो सांगतो.
 
स्वतः पेद्रोने दोन स्त्रियांच्या प्लास्टिक सर्जरीसाठी खर्च केलेला आहे. "कसं होतं की, कधीतरी कोणीतरी आपल्याला सांगतं, 'माझ्या मैत्रिणीला तिची छाती, किंवा नितंब वाढवून घ्यायचेत किंवा नाक दुरुस्त करायचंय. ती स्पॉन्सर शोधतेय.' तर, मग या पुरुषाला तिच्याविषयी आकर्षण वाटलं, तर तो तिचा स्पॉन्सरर होतो किंवा गॉडफादर बनतो," असं तो सांगतो.
 
मग सौदा केला जातो.
 
"मग ती बाई म्हणेल की, 'ठीक आहे, तू माझ्या ऑपरेशनचा खर्च करत असशील तर माझं शरीर सहा महिन्यांसाठी तुझं होईल'," असं पेद्रो सांगतो.
 
हे अनौपचारिक करार प्रत्येक वेळी शस्त्रक्रियेसाठीच असतील असं नाही.
 
"एखाद्या मुलीचा बाप पैसेवाला नसेल, तर अशी मुलगी तिला जगायला आधार देणाऱ्या बॉयफ्रेंडचा शोध घेते," पेद्रो सांगतो. "अशा वेळी कार, घर, रोख रक्कम किंवा लक्झरी वस्तू अशा गोष्टींच्या आधारे सहमतीने व्यवहार होतो."
 
सिनालोआमध्ये दारिद्र्य बोकाळलेलं आहे आणि अनेक सशस्त्र गटांच्या वावरामुळे जीव सुरक्षित ठेवणं कठीण झालेलं आहे. अशा वेळी 'गॉडफादर' असणं संबंधित स्त्रीला केवळ आराम नव्हे, तर संरक्षणही पुरवत असतो.
 
कार्मेन (नाव बदललं आहे) या मुलीने एका नार्कोशी याच आधारावर संबंध ठेवले. ती कूलीअकान या सिनालोआतील सर्वांत मोठ्या शहरामध्ये राहते. एका गरीब, ग्रामीण भागात जन्मलेल्या कार्मेनची लहानपणी कायम उपासमार होत असे.
 
"गरिबीमुळे मला घरात सुखसोयींचं जगणं मिळालं नव्हतं. त्यामुळे सोळा वर्षांची झाल्यावर मी माझ्या आईला सांगितलं की, आता माझं मी बघेन. त्यावेळी माझी आजी म्हणालेली, 'पण तू अगदीच लहान आहेस, पोरी, काय करशील एवढ्यात?' त्यावर मी म्हटलं, 'माझे हात आहेत, पाय आहेत आणि मला डोकं आहे. मी काम करू शकते'," असं कार्मेन सांगते.
 
असं ठरवून कार्मेन कुलिअकानला आली आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित एका कुटुंबासोबत राहिली. पण या घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. कार्मेनने थोडा धोका पत्करत तिला भेटलेल्या एका पुरुषाकडे मन मोकळं केलं.
 
"मी खूप घाबरलेय हे त्याला कळलं. तो म्हणाला, 'माझा नंबर घे.' मग मी धाडस करून त्या घरातून बाहेर पडले आणि त्या माणसाशी संपर्क कायम ठेवला."
 
हे संबंध नंतर शारीरिक स्वरुपाचे झाले.
 
"तो मला म्हणाला, 'तू मुलगी आहेस, एकटी आहेस आणि कुलिअकानसारख्या धोकादायक शहरात तुझं रक्षण करायला कोणीच नाहीये. तर, मी तुझा गॉडफादर होतो.' मग त्याची इच्छा असेल तेव्हा मी त्याला भेटायला लागले आणि मी कोण आहे ते त्याच्या सगळ्या माणसांना माहीत होतं. मी कुलिअकानमध्ये कुठेही फिरू शकते. आता मला सुरक्षित वाटतं, कोणीच मला काही करू शकणार नाही."
 
याच पुरुषाशी अशाच प्रकारचे संबंध असणाऱ्या किती बायका असतील, याबद्दल कार्मेनला काहीही माहिती नाही.
 
कार्मेन धाडसी आणि निश्चयी आहे. विद्यापीठात जाऊव शिकायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, असं तिचं स्वप्न आहे. सिनालोआमध्ये राहून स्वतःचं ध्येय गाठायचं, तर तिलाही धोकादायक वाटणाऱ्या या पुरुषाच्या लहरीपणाला शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही, असं एक गणित तिने केलेलं आहे.
 
"मला अजूनही त्याची भीती वाटते. मी त्याला भेटते तेव्हा माफियांबद्दल, त्यांच्या धंद्याबद्दल बोलणं होतंच. त्याची मला भीती वाटते," असं ती सांगते.
 
"मला जे काही ऐकायला नि पाहायला मिळतं, ते विसरायचा मी प्रयत्न करत असते, कारण अशातून आपण अडचणीत येऊ शकतो... कदाचित मला आश्रय देणारा हा पुरुष वाईट नसेलही, पण त्याने वाईट गोष्टी केलेल्या आहेत. मला इजा पोचवायची त्याची इच्छा नसेलही, पण तो वाईट असला किंवा नसला तरी मला गायब करू शकतो."
 
कार्मेन लहान चणीची आहे, त्यामुळे तिने प्लास्टिक सर्जरी करून घ्यावी, असा दबाव तिच्या या नार्को प्रियकराने आणायला सुरुवात केली आहे. अजून तरी ती डॉक्टरकडे जाण्याला टाळाटाळ करतेय.
 
"सर्जरी करून घेतात त्यांना स्वतःबद्दलच खात्री वाटत नसते, असं मला वाटते. त्यांना ल बुचुना होण्यात माझ्यापेक्षा जास्त रस असेल बहुतेक," असं ती म्हणते.
 
नार्को-संस्कृतीतून आलेलं हे प्लास्टिक सर्जरीविषयीचं पछाडलेपण आता सिनालोआतील उर्वरित समाजातही पसरू लागलंय. सर्जन आणि त्यांच्या शस्त्रक्रियांची जाहिरात करणारी होर्डिंग्स कुलिअकानमध्ये सर्वत्र दिसतात. रोख रक्कम उपलब्ध नसेल, तर ग्राहक उधारीवर शस्त्रक्रिया करून घेऊ शकतात, असं आश्वस्त करणाऱ्या जाहिरातीही असतात.
 
वाढदिवासाला किंवा ख्रिसमसला भेट म्हणून कोणा मुलीला ब्रेस्ट इम्पांट करून मिळणं किंवा नाकात बदल करणं, असंही इथे अनेकदा घडताना दिसतं. पुरुषही अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करवून घेतात.
 
जेनेट क्विन्तेरोंचं एक मोठं ब्युटी सलॉन आहे. त्यांनी आतापर्यंत 20 पेक्षा अधिक सर्जरी करून घेतल्या आहेत.
 
"मला आवडतं ते. कोणत्याही स्त्रीसाठी तिच्या शरीरातील नावडत्या गोष्टी बदलून घेणं ही जगातली सर्वांत सुंदर गोष्ट असते," असं जेनेट सांगतात.
 
"मी विशीत होते तेव्हा सिनालोआमधल्या कोणाचंही लक्ष वेधून घेईल असा माझा पार्श्वभाग होता! मला इतरांसारखं व्हायचं होतं."
 
आता फॅशन बदलतेय, असं त्या सांगतात. काही स्त्रियांना त्यांच्या छातीचा व पार्श्वभागाचा आकार कमी करून घ्यायचा असतो. पण गॅब्रिएला (नाव बदललं आहे) ही स्वतःचा व्यवसाय करणारी 38 वर्षीय एकल माता अशा स्त्रियांमध्ये मोडत नाही. तिचे एका पुरुषासोबत संबंध होते, तेव्हा तिने स्वतःच्या शरीराचा बांधा बदलून घेतला, पण आता ती त्या नात्यात नसतानाही स्वतःच्या शरीराबद्दल सुखी आहे.
 
शरीराचा आकार बदलण्याच्या त्या प्रक्रियेमुळे तिचा आत्मविश्वास वाढला, असं ती सांगते. यातून तिला नवीन जोडीदाराला आकर्षित करणं शक्य झालं नसलं तरी आत्मविश्वास वाढण्याचा फायदा मात्र झाला, असं तिचं म्हणणं आहे.
 
सिनालोआतील अनेक स्त्रियांना एका टप्प्यावर कोणातरी नार्कोची गर्लफ्रेंड व्हायचं असतं, पण आपल्याला आता
 
वेगळ्या प्रकारचा पुरुष हवा आहे, असं गॅब्रिएला सांगते- "बुद्धिमान, काम करणारा आणि एकनिष्ठ राहणारा कोणीतरी" जोडीदार हवा, असं तिला वाटतं.
 
पण सिनालोआमध्ये हे गुण दुर्मिळ आहेत. "पुरुषाच्या आयुष्यात तीन किंवा चार बायका असणं, आणि इतरही मैत्रिणी असणं अगदीच साहजिक आहेत. तो संस्कृतीचाच भाग आहे," असं गॅब्रिएला तात्त्विक सुरात सांगते.
 
"सरत्या काळागणिक पुरुष अधिकच निर्लज्ज झालेत, असं मला वाटतं. बायकांना आर्थिक आधार मिळत असतो, त्यामुळे त्याही हे सहन करतात. त्यांच्या डोळ्यांना हे काही दिसत नाही आणि त्यांच्या काळजाला हे काही जाणवत नाही."
 
स्त्रिया म्हणजे पुरुषांची 'मालकी' असलेली मालमत्ता आहेत, अशी कल्पना नार्को-संस्कृतीमुळे जोपासली गेली, असं मारिया टेरेसा गवेरा म्हणतात. गेली काही दशकं त्या सिनालोआतील स्त्रियांची बाजू वकील म्हणून लढवत आहेत.
 
यातून स्त्रियांविरोधातील हिंसाचाराचा धोका वाढतो, ही हिंसा नार्को प्रियकराकडून होऊ शकते किंवा त्याच्या शत्रूंकडून होऊ शकते, असं त्या सांगतात.
"एखाद्या तस्कराची जोडीदार असल्याच्या कारणावरून किंवा एखाद्या पुरुषाला त्याचा विश्वासघात झालाय असं वाटल्यामुळेही इथे स्त्रियांचे खून पडलेले आहेत. बायका आपली मालमत्ता आहेत, असा संदेश नार्को पुरुष देत असतात," असं गवेरा म्हणतात.
 
मॅक्सिकोतल्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा सिनालोआमध्ये बंदुकांनी गोळ्या झाडून स्त्रियांची हत्या होण्याचं प्रमाण दुप्पट आहे.
 
"किलिअकानमध्ये स्त्रियांविरोधातील हिंसाचार व क्रौर्याचं प्रमाण जास्त आढळतं- त्यांच्या शरीरांचा छळ केला जातो आणि त्यांना जाळलं जातं," असं गवेरा म्हणतात.
 
"एका तरुण मुलीचं प्रकरण सांगण्यासारखं आहे- तिचा प्रियकर नार्को होता. त्याने तिच्या कॉस्मेटिक सर्जरीसाठी पैसे खर्च केले. तिचा खून झाला, तेव्हा तिच्या स्तनांवर आणि पार्श्वभागावर नेम धरून गोळ्या मारण्यात आल्या. त्या नार्को माणसाने तिच्या शरीराच्या या भागांमध्ये गुंतवणूक केलेली होती!"
 
कोणी महिला नार्को पुरुषाला नकार देऊ शकते का?
 
"अंमली पदार्थ तस्करांशी असणारे संबंध तोडायची इच्छा असणाऱ्या स्त्रिया माझ्या ओळखीत आहेत, पण ते खूप गुंतागुंतीचं होऊन जातं," असं गवेरा सांगतात.
 
"प्रशासनाला अजूनही नार्को-संस्कृतीशी निगडीत या प्रश्नाबाबत कारवाई करायची नाहीये. संघटित गुन्हेगारीविरोधात कोणताही गंभीर लढा होत नाही. सर्वांचं संगनमत असतं. यात स्त्रियांना संरक्षण मिळत नाही, नार्कोंना मिळतं."
 
अशाच एका बड्या नार्को पुरुषाशी धोकादायक संबंध राखणाऱ्या कार्मेनला हे सगळं कदाचित कळलं नसेलही. किंवा ती हा विचार टाळत असेल.
 
डॉक्टरकडे जाऊन स्तन किंवा पार्श्वभाग वाढवून घ्यायचा दबाव तिच्यावर येतोय, पण किती काळ ती या दबावाचा प्रतिकार करू शकेल, हे तिलाही माहीत नाही.
 
"सध्या तरी तो मला एखाद्या देवीसारखं वागवतो," असं ती म्हणते.
 
कदाचित असं असेलही. पण तरीही सिनालोआतल्या बंदुकधारी पुरुषांच्या वाटेला न गेलेलंच बरं.