शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (15:51 IST)

आरे : मुंबई मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड सुरू, परिसरात जमावबंदी लागू; शिवसेनेचा ट्विटरवरून विरोध

मुंबई हायकोर्टाने मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड करण्याची परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी रात्रीच तिथे वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली. यानंतर वृक्षप्रेमींनी मोठ्या प्रमाणात आरे कॉलनीमध्ये एकत्र येऊन या वृक्षतोडीचा विरोध करायला सुरुवात केली.
 
मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे येथील2,700 हून अधिक झाडं तोडण्याची परवानगी देऊ नये, अशी याचिका पर्यावरणवाद्यांनी बाँबे हायकोर्टात दाखल केली होती.
 
त्यावर सुनावणी करताना बाँब हायकोर्टाने मेट्रो कारशेड विरोधातल्या याचिका शुक्रवारी फेटाळली. यामुळे मेट्रो कारशेडचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
एका बाजूला पोलीस आणि प्रशासन तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणवादी कार्यकर्ते यांच्यात खटके असे उभे ठाकल्याने, पोलिसांनी या परिसरात तणाव पाहता बंदोबस्त वाढवला आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी अहंकार बाजूला ठेवून समोर येणं अपेक्षित होतं- सुप्रिया सुळे
 
"आरे कॉलनीतील वृक्षतोडीबाबत सरकार अहंकारी भूमिका घेत आहे.एकीकडे वातावरण बदलाच्या गप्पा मारायच्या व दुसरीकडे रात्रीच्या अंधारात गुपचूप वृक्षतोड करायची हे योग्य नाही. अहंकार बाजूला ठेवून मुंबईचं हे फुफ्फुस वाचविण्यासाठी तुम्ही पुढे येणं अपेक्षित होतं," असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
 
दुपारी 1 वाजता - आरेवर वेगळी पत्रकार परिषद घेणार: उद्धव ठाकरे
निवडणुकीच्या तोंडवर शिवसेना पक्षप्रमुख यांनी आपण वेगवेगळ्या जाती-समुदायांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचं सांगितलं. यावेळी आरेविषयावर विचारलं असता, उद्धव ठाकरे म्हणाले, "आरे हा विषय महत्त्वाचा आहे, त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेणार. जे काही घडत आहे, ते घडवणारे कोण आहेत, ते मी पाहून त्यावर ठणठणीत आणि रोखठोकपणे बोलणार आहेच. तो विषय मी काही सोडणार नाही.
 
"उद्याचं सरकार आमचं असणार आहे, त्यामुळे त्या झाडांचे जे कुणी खुनी असतील, त्यांचं काय करायचं हे आम्ही नंतर ठरवू," असं ते पुढे म्हणाले.
 
'आम्ही निसर्गाची पूजा करतो आणि निसर्गच आमचा देव आहे'
"इथला निसर्ग टिकून आहे, कारण आदिवासींनी तो टिकवून ठेवला आहे. सरकार म्हणतं ही जागा सरकारच्या मालकीची आहे, पण सरकार इथल्या झाडांची काळजी घेत नाही. ते काम आदिवासींनी केलं आहे," असं मनिषा धिंडे सांगतात.
 
आरेचा मुख्य रस्ता सोडून आतल्या वाटांवर आदिवासी पाडे वसले आहेत. आरे कॉलनीत एकूण 27 आदिवासी पाडे आहेत. त्यांच्यापैकी एक आहेत मनिषा.
 
"मुलगा आईशिवाय राहू शकत नाही, तसं आम्ही जंगलाशिवाय राहू शकत नाही. आम्ही निसर्गाची पूजा करतो आणि निसर्गच आमचा देव आहे," असं इथे राहणारे श्याम भोईर सांगतात.