मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (22:31 IST)

Tsunami : टोंगा बेटाला धडकल्या त्सुनामीच्या लाटा, ज्वालामुखीच्या उद्रेकाचा 'या' देशांनाही इशारा

पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटा टोंगा या देशाला धडकल्या आहेत.
टोंगा येथून सोशल मीडियावर जे फोटो शेयर केले जात आहेत, त्यात घरं आणि चर्चच्या वरून पाणी वाहताना दिसत आहे. टोंगाची राजधानी नुकुअलोफावर ज्वालामुखीतून निघालेली राख सगळीकडे दिसत आहे, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
तिथल्या रहिवाशांना उंच जागेवर जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हुंगा टोंगा-हुंगा हापाई या ज्वालामुखीमध्ये होत असलेल्या हालचालीनंतरचा हा ताजा स्फोट आहे.
न्यूझीलंड, फिजी आणि टोंगासहित जगभरातल्या अनेक देशांमध्ये ज्वालामुखीच्या स्फोटानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. पाण्याच्या आत या ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे.
फिजीची राजधानी सुवा येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 8 मनिटांपर्यंत चाललेल्या ज्वालामुखीचा आवाज इतका मोठा होता की तो 500 मैलावरच्या फिजीमध्येही ऐकू आला.
टोंगाच्या भूगर्भ विभागानं सांगितलं की, ज्वालामुखीतून निघणारा गॅस, धूर आणि ढग आकाशात 20 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. टोंगाची राजधानी हुंगा टोंगा-हुंगा हापाई ज्वालामुखीपासून केवळ 65 किलोमीटर अंतरावर आहे.
1.2 मीटर उंचीची त्सुनामी दाखल झाल्याचं ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं म्हटलं आहे.
हुंगा टोंगा-हुंगा हापाई ज्वालामुखीपासून 2300 किलोमीटर अंतरावरील न्यूझीलंडलाही वादळाचा इशारा देण्याता आला आहे.