रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (13:16 IST)

उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्सची आज बैठक, निर्बंध कठोर होणार?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर आज (30 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड कृती दल यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे.
 
दुपारी 3.30 वाजता राज्यातील कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक मात्र आज (30 डिसेंबर) रद्द करण्यात आली आहे.
 
नवीन निर्बंधांबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी (29 डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 3900 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी 2510 नवे रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
 
दिल्लीनंतर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे.
 
आरोग्य तज्ज्ञांनी ही तिसरी लाट असू शकते असाही इशारा दिला आहे. तसंच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही तिसरी लाट असू शकते असं म्हटलं आहे.
 
मुंबईत जमावबंदी
मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहताना पोलिसांनी 30 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
 
नववर्षाचे सेलिब्रेशन, पार्ट्या, सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशनसाठी एकत्र जमण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे.
 
30 डिसेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7 डिसेंबर रात्री 12 पर्यंत मुंबईत हे आदेश लागू असतील असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
 
या नियमांचं उल्लंघन झाल्यास महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
 
मंत्र्यांच्या बैठकीत काय झालं?
लसीकरणाबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले, "साडेपाच कोटी लोकांना दुसरा डोस मिळालाय. लहान मुलांसाठी कोव्हॅक्सीन मिळणार असून शालेत जाऊन लस देता येईल का याबाबत विचार सुरू आहे. बूस्टर कोणता द्यायचा याबाबत अद्याप निर्णय केंद्राने ठरवलेला नाही. त्याच लशीचा बूस्टर द्य़ायचा की दुसऱ्या लशीचा याबाबत निर्णयाची वाट पहात आहोत. लाट असली तरी महाराष्ट्र सज्ज आहे. आपली तयारी आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही."
 
बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजीशिअन डॉ. गौतम भन्साळी बीबीसीशी बोलताना सांगतात, "मुंबईतील वाढती रुग्णसंख्या ही कोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेची सुरूवात आहे."
 
महाराष्ट्रात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट जानेवारी महिन्यात येऊ शकते, अशी भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली होती.
 
येणारी संभाव्य तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरियंटची असेल असं तज्ज्ञ म्हणतात.
 
या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबईचे (उपनगर) पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (29 डिसेंबर) एक आढावा बैठक घेतली.
 
त्यानंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी देखील महानगरपालिका प्रशासनाची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेवून विविध निर्देश दिले आहेत. त्या सूचना खालीलप्रमाणे -
 
नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी आयोजित न करण्याची सूचना
सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स्, उपहारगृहं यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्याचे योग्यरीतीने पालन होते आहे, यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांनी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करावी. स्थानिक पोलीस उपायुक्तांशी समन्वय साधून या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱयांचा देखील समावेश करावा.
नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱया हॉटेल्स्, उपहारगृहांवर सक्त कारवाई करावी.
सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील हॉटेल्स्, उपहारगृहं यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थितीचे नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी.
मालाड येथील कोविड उपचार केंद्र हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. या केंद्रासह कांजूरमार्ग येथे उभारलेले कोविड उपचार केंद्र देखील लवकरात लवकर कार्यान्वित करावे.
दुबईमधून येणाऱया आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना सक्तीने सात दिवस गृह विलगीकरण करण्याचे निर्देश व त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी आदेश दिले आहेत. या आदेशांमध्ये आता फक्त दुबईऐवजी संपूर्ण संयुक्त अरब अमिराती देशांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच संयुक्त अरब अमिराती (यूएई) देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर आगमनप्रसंगी आरटीपीसीआर (ऑन अरायव्हल टेस्टींग) चाचणी करावी लागेल. या चाचणीच्या अहवालासापेक्ष व प्रचलित नियमानुसार संबंधित प्रवाशांचे विलगीकरण ठरविण्यात येईल.
हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधून, ज्या बाधितांना लक्षणे नाहीत (एसिम्प्टोमॅटिक) आणि औषधोपचाराची देखील गरज भासत नाही, अशा रुग्णांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल व गोरेगावातील नेस्को या दोन्ही कोविड उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी 500 रूग्णशय्यांची स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था कार्यान्वित करावी.
विमानतळावर, रॅपिड टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रचलित नियमानुसार विलगीकरणाची कार्यवाही करावी. जर चाचणी पॉजिटिव्ह आली तर त्या रुग्णास प्रचलित नियमानुसार विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच नियमित आरटीपीसीआर चाचणीचेच नमुने जनुकीय सूत्रनिर्धारण तपासणी (जिनोम सिक्वेसिंग) साठी पाठवावे.
प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये, कोविड बाधितांच्या विलगीकरणासाठी किमान 500 व्यक्ती क्षमतेचे कोविड काळजी केंद्र (सीसीसी 2) लवकरात लवकर कार्यान्वित करावेत.
सर्व विभाग कार्यालयांमधील विभाग नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) मध्ये येत्या दोन महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त संख्येने नेमण्यात येणार आहेत. गृह विलगीकरणात राहत असलेल्या रुग्ण व व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासह इतर वैद्यकीय सेवांसाठी या प्रशिक्षणार्थींच्या सेवा उपयोगात येतील.
सर्व रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रामधील मनुष्यबळ, संयंत्रे व इतर यंत्रणा, औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचा आढावा घेवून त्यामध्ये कमतरता राहणार नाही, याची खात्री करावी.