झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी आता जगभरात अनेक देशांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप्लिकेशन्सची मदत घेत आहेत.
भारतातही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येतेय. भारत सरकारने 2 एप्रिलला 'आरोग्य सेतु' अॅप लाँच केलं. एकूण 11 भारतीय भाषांमध्ये हे अॅप उपलब्ध आहे.
या अॅपच्या माध्यामातून लोकांना आपल्या किती जवळपास कोव्हिड 19 चा रुग्ण आहे, याचीही माहिती मिळू शकेल. अॅप वापरणाऱ्या लोकांची प्रायव्हसी जपण्याकडे लक्ष देत हे अॅप तयार करण्यात आल्याचं सरकारने म्हटलंय.
याशिवाय पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक आणि गोवा सरकारांनीही काही मोबाईल अॅप्स तयार केली आहेत. या अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून कोरोना व्हायरस, कोव्हिड-19 संबंधीची माहिती युजर्स मिळवू शकतात.
यासोबतच कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांवर आणि घरीच क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांवर या अॅप्सच्या मदतीने लक्ष ठेवलं जातंय.
पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे काय? ते नेमकं काम कसं करतं? तुम्ही या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवं का? सहभागी झालात तर मग तुमच्याविषयीच्या माहितीचं काय?
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे काय?
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वापर झपाट्याने पसरणाऱ्या साथीच्या आजारांचा संक्रमणाचा वेग कमी करण्यासाठी केला जातो.
सहसा याचा वापर सेक्शुअल हेल्थ क्लिनिक्समध्ये जास्त होतो. इथले डॉक्टर्स संसर्गजन्य रोज झालेल्या रुग्णांना त्यांच्या थेट सान्निध्यात आलेल्या व्यक्तींना शोधून त्यांच्याशी संपर्क करायला सांगतात.
पण कोव्हिड-19 संदर्भात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वापर अशा लोकांना शोधून काढण्यासाठी केला जातो जे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात आलेले असतात. अशा लोकांना शोधून काढून त्यांना स्वतः अलगीकरणात राहण्यास सांगण्यात येतं.
कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांची कुटुंब आणि मित्रमंडळींना फोनद्वारे हे सांगण्यात येतंय, पण यासाठी ऑटोमेटेड लोकेशन ट्रॅकिंग मोबाईल अॅपचीही मदत घेण्यात येतेय.
हाँगकाँग, सिंगापूर आणि जर्मनीसह कोरोना व्हायरसने प्रभावित अनेक देशांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वापर सुरुवातीपासून करण्यात येतोय.
आरोग्य सेतू अॅप कसं काम करतं?
ब्लुटूथ आणि लोकेशन ट्रेसिंगवर हे अॅप आधारित आहे. शिवाय या अॅपचा वापर प्रभावी ठरण्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे - लोकांनी यामध्ये योग्य आणि खरी माहिती भरणं.
तुम्ही जर हे अॅप वापरत असाल आणि तुम्ही जर एखाद्या कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर हे अॅप तुम्हाला अलर्ट करू शकतं, शिवाय लोकेशन ट्रेसिंगमुळे ते हे सुद्धा सांगू शकतं की तुम्ही किती वेळ त्या व्यक्तीच्या संपर्कात होतात.
ज्या लोकांनी अॅप इन्स्टॉल करून त्यावर रजिस्टर केलंय त्याच लोकांना या अॅपद्वारे ट्रेस करता येऊ शकतं. ज्या लोकांनी हे अँप इन्स्टॉल केलं नाहीये किंवा त्यावर रजिस्टर केलं नाहीये, पण त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आहेत किंवा ते संभाव्य रुग्ण आहेत, त्यांची गणना यात होणार नाही. म्हणूनच जर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचा उद्देश असेल तर मग लोकांनी मोठ्या प्रमाणावर हे अॅप वापरलं तरच त्याची मदत होऊ शकते.
भारतासारख्या देशात जरी इंटरनेटचा वापर वाढत असला तरी 1.3 अब्ज लोकसंख्येच्या देशात हे कितपत यशस्वी ठरेल हा प्रश्न उरतोच.
डेटा किती सुरक्षित?
या अॅपबद्दल प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी जरी हे अॅप माहिती गोळा करतंय, असं सांगितलं जात असलं तरी हे अॅप फोनमध्ये असलेल्यांवर सरकार 24 तास लक्ष ठेवू शकतं. ते कुठे जातात, कुणाला भेटतात, किती वेळ एकाच ठिकाणी थांबतात या सगळ्या गोष्टींवर सरकार नजर ठेवू शकतं.
पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आरोग्य संकट टळल्यानंतर हा डेटा नष्ट केला जाणार आहे का, आणि जर हो, तर मग कधी याबद्दल कुठलीही स्पष्टता सरकारने दिलेली नाही.
सायबर एक्सपर्ट पवन दुग्गल म्हणतात "एकीकडे हे अॅप तुमचं कोव्हिड-19 स्टेटस अपडेट करतं तर दुसरीकडे तुमच्या लोकेशनवरही चोवीस तास लक्ष ठेवून असतं. दुसरं म्हणजे हा सर्व डेटा कोणत्या कंपनीकडे जातोय, हे अजूनतरी स्पष्ट नाही. तिसरं म्हणजे या अॅपच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याची माहिती एकत्रितपणे कुठेतरी पाठवण्यात येत आहे. मात्र, कुठल्या कायद्यांतर्गत ही माहिती गोळा करण्यात येत आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही."
आरोग्य सेतू अॅपमध्ये काय म्हटलंय?
आरोग्यसेतू अॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये आपल्या डेटासंदर्भात काही माहिती दिली गेलीये - 'तुम्ही दिलेल्या माहितीचा वापर हा कोरोना आरोग्य संकटासंदर्भातल्या प्रयत्नांव्यतिरिक्त इतर कशासाठीही केला जाणार नाही. आणि तुम्ही जर अॅप डिलीट केलंत तर त्यानंतर 30 दिवसांत तुमचा डेटा क्लाऊडवरून डिलीट केला जाईल,' असं यात म्हटलं गेलंय.
यामुळे लॉकडाऊन संपायला मदत होईल का?
लॉकडाऊन संपुष्टात आणण्यासाठी किंवा यामध्ये सवलत देण्यासाठी अनेक देशांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मदतीचं ठरलं. पण यासोबतच इतरही अनेक गोष्टी करण्यात आल्या.
दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसच्या साथीदरम्यान कधीही लॉकडाऊन लावण्यात आला नाही. सुरुवातीपासूनच तिथे मोठ्या प्रमाणावर 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' करण्यात आलं. आणि याला जोड देण्यात आली मोठ्या प्रमाणावर लोकांची तपासणी करण्याची, म्हणजेच टेस्टिंगची.
आपण कुठे जाऊन, काय-काय केलं हे तिथे लोकांना आठवायला सांगितलं. क्रेडिट कार्डने करण्यात आलेले व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल ट्रॅकिंगचा वापर यासाठी करण्यात आला.
संसर्गाच्या एका टप्प्यावर इथे रोज 900 रुग्ण आढळत होते. आता मात्र हे प्रमाण अगदी कमी झालेलं आहे.
टेक कंपन्यांचं पर्यायी अॅप
गुगल आणि अॅपलने या अॅपसाठीचा एक वेगळा पर्याय सुचवलेला आहे. लोक आपल्या मोबाईल हँडसेटवर जेव्हा बोलतील तेव्हा याचा वापर केला जाऊ शकतो.
आपल्या या अॅपमधला डेटा हॅकर्स हॅक करू शकणार नाहीत, असं या दिग्गज टेक कंपन्यांचं म्हणणं आहे.