1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2024 (09:00 IST)

दबावतंत्र, सहानुभूतीचं राजकारण की नवी रणनीती? देवेंद्र फडणवीस काय साध्य करू पाहत आहेत?

eknath shinde devendra fadnavis
"मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे मला मंत्रिमंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करणार आहे."
 
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली.
 
खरं तर ही पहिलीच वेळ नाही ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत सामील न होता केवळ पक्ष संघटनेत काम करायचं आहे ही इच्छा बोलून दाखवली. परंतु यावेळची राजकीय परिस्थिती मात्र निश्चितच वेगळी आहे.
 
गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली. यात भाजपला 28 पैकी 19 जागांवर पराभव स्वीकारावा लागला. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश भाजपमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली ही भूमिका महत्त्वाची आहे.
राज्यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत फडणवीस यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.
 
पण भाजप पक्षश्रेष्ठींच्या कोणत्याही निर्णयापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ केल्याने नेमकं ते काय साध्य करू पाहतायत? यामागे नेमकी कारणं काय आहेत? फडणवीस पायउतार झाल्यास युती सरकारच्या स्थिरतेवर त्याचा काय परिणाम होईल? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
 
देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सरकारमधून मोकळं करून संघटनेत जबाबदारी देण्याची विनंती ते पक्ष श्रेष्ठींना करणार असल्याचं जाहीर करून आता 24 तासांहून अधिक अवधी उलटला आहे.
 
या दरम्यानच्या काळात राज्यातील भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. 'सागर' या त्यांच्या सरकारी निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रवीण दरेकर अशा अनेक नेत्यांनी धाव घेतली.
 
तसंच देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा झाल्याचं वृत्त आहे. परंतु मंत्रिपदावरून राजीनामा देत विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनेत काम करण्याच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याचं सांगितलं जात आहे.
 
यासंदर्भातील निर्णय अर्थात भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून घेतला जाईल आणि तोपर्यंत फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जातील.
 
महाराष्ट्र भाजपचा चेहरा बदलणार का? नेतृत्त्व बदलणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मला असं वाटत नाही. आम्ही संयुक्त येवून प्रयत्न करत असतो. भविष्यात सुद्धा सामूहिक प्रयत्न करून विधानसभा निवडणुकीला सामोरं जाऊ."
 
देवेंद्र फडणवीस यांचं हे दबावतंत्र आहे का? यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, "भाजपमध्ये कोणीही असं दबावतंत्र वापरत नाही. कोणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत नाही. या पक्षात एक शिस्तीचं पालन केलं जातं. मला असं वाटत नाही की देवेंद्रजींना असं करण्याची कधी आवश्यकता भासेल."
 
नम्रतेने पराभव स्वीकारून अशी भूमिका घेणं हे कार्यकर्ता असण्याचं लक्षण आहे. यापेक्षा वेगळं काही मला वाटत नाही असंही मुनगंटीवार म्हणाले.
 
'महाराष्ट्राच्या राजकारणाचे खलनायक'
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात दोन बड्या प्रादेशिक पक्षांमध्ये उभी फूट पडली.
 
मोठ्या संख्येने आमदार सत्ताधारी पक्षासोबत सत्तेत सामील झाले. हे राजकारण इथवरच थांबलं नाही. तर या बंडानंतर दोन्ही फुटलेल्या गटांच्या नेतृत्त्वाने मूळ पक्षावरच दावा केला आणि निवडणूक आयोगाची सुनावणीही जिंकली.
 
एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही पक्षाचं मूळ नाव आणि निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आलं. परंतु या सगळ्यामागे भाजपचा हात आहे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकला जातोय असा आरोप विरोधकांनी सातत्याने केला.
 
देवेंद्र फडणवीस हे स्वतः दोन महिन्यांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते की, "मी पुन्हा येईन या माझ्या वक्तव्यावर खिल्ली उडवण्यात आली. त्याला अडीच वर्षे लागली. परंतु मी सत्तेत परतल्यावर दोन राजकीय पक्ष फोडले."
या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष भाजपने फोडले हे एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं.
 
आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर विरोधकांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की, "महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला नाकारलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे खलनायक जर कोणी असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत."
 
या मुद्यांव्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनादरम्यानही अनेक आरोप झाले. जालना इथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच लाठीचार्ज झाला असा आरोप सुरुवातीपासून त्यांच्यावर करण्यात आला.
 
मनोज जरांगे पाटील यांनीही फडणवीस यांच्यावर इतर गंभीर आरोप केले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेले आरक्षणाचे मुद्दे हाताळण्यात सरकार कमी पडलं असं विश्लेषण तर केलंच जातं पण त्याहून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मराठा-ओबीसी मतांचं राजकारण महागात पडलं असंही बोललं जात आहे.
 
दबावतंत्र की सहानुभूतीचं राजकारण?
देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडल्यास राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवर सरकारमध्ये भाजपचं नेतृत्त्व कोण करणार आणि फडणवीस यांच्या जागी प्रदेश भाजपलाही नवीन चेहरा मिळणार का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
 
तर दुसरीकडे फडणवीसांची ही भूमिका त्यांचं दबावतंत्र आहे की सहानुभूतीचं राजकारण असाही प्रश्न विचारला जात आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्द जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी सांगतात, "देवेंद्र फडणवीस हे राज्यात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांना असं वाटतंय की मंत्री राहून ते विरोधकांना थेट आव्हान किंवा उत्तर देऊ शकणार नाहीत. कारण मंत्री असल्याने त्यांना काही मर्यादा येतील. मंत्रिपदावर राहून त्यांना संपूर्ण ताकदीने राजकीय प्रत्युत्तर देताना मर्यादा येतील आणि यामुळे आपण सत्तेबाहेर पाहून विरोधकांना उत्तर देऊ असं त्यांना वाटत असावं."
 
दुसरं कारण ते सांगतात,"आताच्या सरकारमध्ये राहून 8-10 मंत्रिपदातून पक्षाला न्याय देता येत नाहीय. तसंच त्यांनाही स्वतःला त्यांची पूर्ण क्षमता वापरून काम करता येत नाहीय कारण त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद दोन्ही नाहीय. यापेक्षा सरकार बाहेर राहून आपली पूर्ण क्षमता पक्षासाठी वापरता येईल."
 
हा सुद्धा त्यांच्या राजीनाम्यामागे विचार असावा असं ते सांगतात.
यामागील तिसरं संभाव्य कारण म्हणजे,"फडणवीस उपमुख्यमंत्री असल्याने, सरकारमध्ये नेतृत्त्वाच्या एका पदावर असल्याने त्यांच्यावर जी टीका आणि आरोप केले जातात यामुळे सरकारवरही टीका होते. ते सरकारमधून बाहेर पडले तर सरकारवर टीका होणार नाही टीकेचा फोकस बदलेल. आणि त्यांना सरकारबाहेर राहून त्याला प्रत्युत्तरही देता येईल."
 
एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष सोबत घेऊनही भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे सरकारमध्येही भाजपला सर्वाधिक आमदार असून एकानाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद आणि यानंतर अजित पवार यांच्यासह बड्या मातब्बर नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागलं. यामुळे आधीच भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे. यामुळे विधानसभेसाठी पक्षाला वेगळा विचार करावा लागेल असंही काही भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
 
याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक निखिल वागळे सांगतात, "आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तर हे विधानसभेला पराभूत होतील. भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे की आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. हवे तर निवडणुकीनंतर ठरवूया की कोणाला सोबत घ्यायचं परंतु शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभा नको अशी भाजपच्या गोटात चर्चा आहे."
 
ते पुढे सांगतात," भाजपच्या 23 वरून 9 जागा आल्या. सत्तेचा माज दिल्ली आणि महाराष्ट्रात होता. जनता पाहत असते. भारतीय जनतेला 77 सालीही कळलं की इंदिरा गांधींनी चूक केलीय त्यांना धडा दिला. आताही लोकांना कळलं की मोदी 10 वर्षांनी चूक केली. महागाई वाढलीय तरी हे हिंदू - मुस्लीम करतात. देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध गटाचे लोक आहेत. फडणवीस यांचं हे अश्रू नाट्य होतं. शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवायची नाही असं भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे."
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे त्यांच्याकडून झालेल्या राजकीय चुकांचंही विश्लेषण केलं जात आहे. फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षांत पक्षातील जुन्या नेत्यांपेक्षा बाहेरून आलेल्या अधिक जवळ केलं असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केलं.
 
त्या सांगतात, "फडणवीसांनी अनेक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू केले. केंद्र म्हणेल त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रात राजकारण केलं. तरीही अपयश आलेलं आहे. या अपयशामुळे ते व्यथित झालेले असावेत."
 
"पक्ष जेव्हा तुम्हाला सत्तेत पद देतो तेव्हा त्याच्या जीवावर तुम्ही त्या त्या राज्यात पक्षाचा विस्तार करायचा असतो. वेगवेगळ्या समिकरणांवर काम करायचं असतं. महाराष्ट्रातला 'माधव' फाॅर्म्युला असेल किंवा असं एखादं समीकरण. हे फडणवीसांना महाराष्ट्रात करायला मिळालं का याबाबत शंका आहे,
 
"देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या चुकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा बाहेरून आलेल्यांना अधिक जवळ केलं. त्यांना सोयीच्या असलेल्या आमदारांना जास्त बळ दिलं. त्यांना आता विधानसभेसाठी काम करायची इच्छा दिसतेय."
 
त्या पुढे सांगतात, "देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांभाळून घेतलं. पण त्यांना
 
सांभाळून घेणं हे पक्षासाठी डोईजड वाटत असेल आणि त्यासाठीही त्यांनी असा विचार केला असेल अशीही शक्यता नाकारता येत नाही."
 
पर्यायी चेहरा कोण?
देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर तसंच ते या भूमिकेवर ठाम राहिल्यास महाराष्ट्रात भाजपला पर्यायी चेहरा कोण अशीही चर्चा सुरू झाली आहे.
 
यात दिल्लीत भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस पदावर कार्यरत असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन नावांची प्रमुख्याने चर्चा होताना दिसत आहे.
 
तसंच एकनाथ खडसे यांनीही 'टायगर अभी जिंदा है' असं म्हणत एक्स या (पूर्वीचं ट्विटर) समाज माध्यमावर ट्वीट केलं आहे. तसंच प्रदेश भाजपच्या पहिल्या फळीतील नावांचीही चर्चा सुरू आहे.
 
यासंदर्भात आम्ही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं. ते म्हणाले, "मला जी माहिती आहे त्यानुसार नितीन गडकरी राज्याच्या राजकारणात कदापि येणार नाहीत. माझं नाव घेवून माझ्या अडचणी तुम्ही वाढवू नका. तर विनोद तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत ते सोडून त्यांना राज्यात पाठवतील असं मला तरी व्यक्तिशः वाटत नाही."
 
देवेंद्र फडणवीस यांची जागा घेण्यासाठी भाजपकडे पर्यायी चेहरा आहे का? तसंच फडणवीस यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलणं भाजपला परवडणारं आहे का? असेही प्रश्न आहेतच.
परंतु ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक निखिल वागळे यांना मात्र राज्यात विनोद तावडे यांचं कमबॅक होऊ शकतं तसंच नितीन गडकरी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचाअनुभव दांडगा आहे यामुळे त्यांनाही ही जबाबदारी दिली जाऊ शकते असं वाटतं.
 
ते सांगतात," देवेंद्र फडणवीसांना जाऊ देणं भाजपला परवडेल का? तर हो. कारण भाजप कधीही ज्यापद्धतीने व्यक्तीचा विचार करत नाही. भाजप विनोद तावडे, नितीन गडकरी यांना पाठवेल. ही पक्षाची निष्ठा आहे. संघाचा विचार आहे. सर्वतोपरी व्यक्ती नाही. सर्वतोपरी संघटना आहे. यामुळे गरज पडल्यास ते उद्या मोदींनाही बदलतील एवढी संघाची ताकद आहे."
 
"मला असं वाटतं की फडणवीस दिल्लीत जातील. तावडे राज्यात येतील. काहीही होऊ शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं,"
 
आता प्रत्यक्षात या पर्यायी नावांची केवळ चर्चाच आहे की भाजपचे पक्षश्रेष्ठी आगामी दिवसांत महाराष्ट्र भाजपात मोठा बदल करतात हे पहावं लागेल.
 
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे.
 
4 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भाजपचे 9 खासदार निवडणून आले आहेत, तर राज्यात काँग्रेसने दमदार पुनरागमन केलं आहे.
 
स्थानिक उमेदवारांवरील नाराजीचा फटका बसल्याचं फडणवीस यांनी बुधवारी (5 जून) पत्रकार परिषदेत सांगितलं.
 
बुधवारचे लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यावर आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चा आणि मंथनाचे वारे वाहू लागले आहेत.
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
येत्या निवडणुकीसाठी नेतृत्वाने मला सरकारमधून मोकळं करावं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी असं देवेंद्र म्हणाले आहेत.
 
ते म्हणाले, "मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे मला मंत्रिमंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करणार आहे."
 
ते म्हणाले, "ज्याप्रकारे महाराष्ट्रात जागा मिळतील असं वाटलं होतं ते झालं. नाही त्यामागे काही कारणं आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला स्वीकारलं आणि आम्हाला नाकारलं हे नॅरेटिव्ह चुकीचं आहे. लोकांना समान मतं दिली आहेत. कुठेही आम्हाला नाकारलं असं झालेलं नाही."
 
Published By- Priya Dixit