1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (18:50 IST)

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून येण्याची 5 कारणं

uddhav thackeray
महाराष्ट्रात झालेल्या पक्षफुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यात आलेले निकालही पुरेसे बोलके आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठी लाभार्थी ठरलीय ती काँग्रेस. पण सर्वांच्या नजरा या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांकडे होत्या.
 
शरद पवारांसाठीसुद्धा ही निवडणूक तशी चांगली ठरलीय कारण त्यांची खासदार संख्या वाढलीये. उद्धव ठाकरे यांच्या साठीसुद्धा या निवडणूक निकालांकडे सकारात्मक म्हणून पाहिलं जातंय.
त्याचं मुख्य कारण आहे पक्षात फूट पडल्यानंतर 18 पैकी 12 खासदार त्यांना सोडून गेले होते. त्यांच्याकडे फक्त 6 खासदार उरले होते. पक्ष खिळखिळा झाला होता. नेत्यांची वानवा होती.
 
मग अशाही स्थितीत उद्धव ठाकरे यांना 9 खासदार कसे निवडून आणता आले याची चर्चा करण क्रमप्राप्त ठरतं. त्याची मुख्य 5 कारणं आहेत.
 
1. पक्ष फुटीमुळे मिळालेली सहानुभूती
21 जून 2022 ला उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका बसला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांचा पक्ष फुटला. एकनाथ शिंदे यांनी आमदार फोडून गुवाहाटीला नेले आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं.
 
या सर्व नाट्यात भाजपची भूमिका अजिबात लपून राहिलेली नव्हती. पुढे भाजपच्या नेत्यांनी या फोडाफोडीच्या नाट्यातली त्यांची भूमिका मान्य केली.
अनेक दिवस टीव्हीवर रंगलेल्या या नाट्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाजूने सहानुभूती तयार झाली.
 
महत्त्वाचं म्हणजे ती सहानुभूती लोकसभा निवडणुकांपर्यंत टिकवण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं.
 
2. भाजपच्याविरोधात गेलेलं वातावरण
उद्धव ठाकरेंना त्यांच्या बाजूने तयार झालेल्या सहानुभूतीचा वापर भाजपच्या विरोधात वातावरण तयार करण्यात करता आला.
 
हे दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेलं आक्रमण असल्याचं भासवण्यात त्यांना यश आलं. त्यात भर पडली ती भाजपनं अजित पवारांना हाताशी धरून पाडलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीची.
 
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मग भाजपच्या विरोधात वातावरण तयार केलं. त्यात त्यांना संजय राऊत, सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांची साथ मिळाली.
3. दलित, मुस्लिम मतदारांची एकजुट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला आणि त्यापाठोपाठ भाजपच्या नेत्यांची वेगवेगळी विधानं यायला लागली. भाजप नेते अनंत हेगडेंनी संविधान बदलण्यासाठी 400 खासदार पाहिजे असल्याचं म्हणून एक प्रकारे विरोधकांच्या हातात आयतं कोलित दिलं.
 
काँग्रेससह सर्व विरोधकांनी हेगडेंच्या वक्तव्याचा आधार घेत भाजप सत्तेत आली तर संविधान बदललं जाऊ शकतं याचा प्रचार केला. राहुल गांधी तर त्यांच्या प्रत्येत रॅलीत संविधानाची प्रत घेऊन जायला लागले. त्याचा थेट परिणाम मुंबईत उद्धव ठाकरे यांनी जिंकलेल्या जागांमध्ये दिसून येतोय.
 
सीएएनंतर मुस्लीम मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात एक प्रकारे हवा तयार झाली होती. त्यात मोदींच्या हिंदू-मुस्लीम वक्तव्यांची भर पडली आणि महाराष्ट्रातली मुस्लीम आणि दलित मतं महाविकास आघाडीकडे गेली. त्याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंना झालेला दिसून येतो.
 
4. काँग्रेस आणि शरद पवार गटाची मिळालेली साथ
अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना ही निवडणूक शक्य नव्हती.
त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतदारसंघांवर नजर टाकली तर लक्षात येईल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं थेट त्यांना ट्रान्सफर झाल्याचं दिसून आलं आहे.
 
शिवाय जागावाटपासारख्या कळीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांनी बऱ्याच अंशी सामजस्याची भूमिका घेतली. सांगलीच्या जागेवरून थोडी ताणाताण झाली, पण विशाल पाटील यांनी बंडखोरी करून काँग्रेसच्या बाजूने ती भरून काढली.
भाजपबरोबच्या युतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या जागा वाटपाची आणि फॉर्म्युलाच्या जेवढी चर्चा आतापर्यंत माध्यमांमध्ये झाली होती. तेवढी मात्र यावेळी झाली नाही.
 
5. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांनी केलेली कामगिरी
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळालेला कार्यकाळ अत्यंत नाजूक होता. त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातला साधारण दीड वर्षांचा कार्यकाळ कोव्हिड सारख्या महासाथीत गेला. त्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामांची अनेकांनी स्तुती केली.
 
कोव्हिडच्या काळात राबवलेला 'धारावी पॅटर्न' हा जगासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो असं उद्धव ठाकरेंनी या मॉडेलबद्दल म्हटले होते.
 
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी थेट लोकांशी कौंटुंबिक पातळीवर जाऊन संवाद साधला. या मुळे त्यांना प्रतिमा निर्मितीत चांगली मदत झाली.
 
त्यांची हीच कोव्हिड काळात तयार झालेली प्रतिमा, त्यात त्यांना आलेलं आजारपण, ऐन आजारपणात पक्षात पडलेली फूट, आजारपणात भाजपानं दगाबाजी केल्याचा त्यांचा प्रचार आणि लोकांची त्यांना मिळेली साथ ही त्यांच्या या यशाची खरी क्रोनोलॉजी म्हणता येईल.
 
Published By- Priya Dixit