सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (15:27 IST)

तालिबान कमांडरला जेव्हा बीबीसी रिपोर्टरने विचारलं की तुम्ही लोकांना का मारत आहात...

- सिकंदर किरमाणी
आम्हाला भेटलेले तालिबानी बंडखोर मझर-इ-शरीफ या अफगाणिस्तानातील एका सर्वांत मोठ्या शहरापासून केवळ अर्धा तास अंतरावर आहेत.
 
त्यांनी दाखवलेल्या युद्धाच्या मिळकतीमध्ये किंवा 'घनिमत'मध्ये एक हमवी, दोन पिक-अप व्हॅन आणि बऱ्याच शक्तिशाली मशिनगनांचा समावेश आहे. पूर्वी मदरशातला विद्यार्थी राहिलेला ऐनुद्दीन आता स्थानिक सेनाधिकारी आहे- तो शस्त्रसज्ज जमावाच्या मधोमध उभा असतो.
 
आंतरराष्ट्रीय दलं जवळपास माघारी गेली आहेत, आणि तालिबानी बंडखोर जवळपास रोजच एक नवीन प्रदेश काबीज करत पुढे जात आहेत. भयभीत जनता या सगळ्यात अडकलेली आहे.
 
गेल्या काही आठवड्यांमध्ये हजारो सर्वसामान्य अफगाणी लोकांना त्यांचं घरदार सोडून पळून जावं लागलं असून शेकडो लोक मरण पावले आहेत किंवा जखमी झाले आहेत.
 
आपण ज्यांच्या वतीने लढतो असा दावा तालिबान करते त्याच लोकांना वेदना देणाऱ्या हिंसाचाराचं समर्थन कसं करता येईल, असं मी ऐनुद्दीनला विचारलं.
 
"ही लढाई आहे, त्यामुळे लोक मरतायंत," असं तो थंडपणे म्हणाला. "नागरिकांना इजा होऊ नये" यासाठी आपली संघटना सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही त्याने सांगितलं.
 
ही लढाई तालिबान्यांनीच सुरू केली याकडे मी निर्देश करतो.
 
"नाही," तो तीक्ष्णपणे उत्तरतो. "आमचं सरकार होतं, ते उलथवून टाकण्यात आलं. त्यांनी (अमेरिकींनी) लढाई सुरू केली."
 
ऐनुद्दीन आणि उर्वरित तालिबान्यांना सध्याच्या घटनांची गतिमानता त्यांच्या बाजूने आहे असं वाटतं. 2001 साली अमेरिकेच्या स्वारीमुळे सत्ता गमावलेली तालिबान पुन्हा प्रभुत्वशाली स्थानावर पोचण्याच्या बेतात आहे, असा त्यांना विश्वास आहे.
 
"ते पाश्चात्य संस्कृती सोडत नाहीत... त्यामुळे आम्हाला त्यांना मारावं लागतं," ऐनुद्दीन काबूलमधल्या 'कठपुतळी सरकार'बद्दल बोलताना म्हणतो.
 
आमचं बोलणं संपल्यावर लगेचच आमच्या डोक्यावरून हेलिकॉप्टरांचा आवाज ऐकू येतो. हमवी आणि तालिबानी बंडखोर तत्काळ पांगतात. अफगाणी हवाई दलाकडून बंडखोरांना सततचा धोका आहे आणि अजून लढाई संपलेली नाही, याची आठवण करून देणारी ही खूण होती.
 
आम्ही बाल्खमध्ये आहोत. या शहराची मुळं प्राचीन काळात रुजलेली आहे. इस्लाममधील सर्वांत प्रसिद्ध गूढ कवी जलालुद्दीन रुमी यांचं हे जन्मस्थान आहे असं मानलं जातं.
 
या वर्षारंभी आम्ही इथून प्रवास केला होता. तेव्हा हा भाग सरकारच्या नियंत्रणाखाली होता. पण आसपासची गावं तालिबान्यांच्या ताब्यात होती. आता अभूतपूर्व आक्रमक चढाई करत बंडखोरांनी सुमारे 200 जिल्ह्याची ठिकाणी काबीज केली आहेत.
 
उत्तरेकडील भागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय हेतूतः घेण्यात आल्याचं एका वरिष्ठ तालिबानी अधिकाऱ्याने सांगितलं. हा प्रदेश पारंपरिकरित्या सक्षम तालिबानविरोधी प्रतिकारासाठी ओळखला जातो, एवढंच यामागचं कारण नाही. तर, हा अधिक वैविध्यपूर्ण प्रदेश असल्यामुळेही त्यावर तालिबान्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केलं.
 
तालिबानच्या मध्यवर्ती नेतृत्वामध्ये पश्तून बहुसंख्याक समुदायातील सदस्यांचं वर्चस्व असलं, तरी आपण इतर वंशपरंपरांनाही सामील करून घेतलं आहे हे अधोरेखित करण्याची तालिबानची इच्छा आहे, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
 
स्थानिक तालिबानी नेते व बाल्खमधील आमचे यजमान हाजी हेकमन यांना या ठिकाणाचं दैनंदिन जीवन कसं नियमितपणे सुरू आहे हे आम्हाला दाखवण्याची उत्सुकता होती.
 
लहान शाळकरी मुली मोठ्या संख्येने रस्त्यांवर आहेत (इतर काही ठिकाणी मुलींना शाळांमध्ये हजर राहण्यापासून बंदी घालण्यात आल्याच्या बातम्या आहेत). बाजारात पुरुष व स्त्रिया असा दोन्ही गिऱ्हाईकांची गर्दी आहे.
 
स्त्रियांना केवळ पुरुष जोडीदारासोबतच बाजारात हजर राहायची परवानगी आहे, असं स्थानिक सूत्रांनी आम्हाला सांगितलं, पण आम्ही बाजारात गेलो तेव्हा परिस्थिती अशी दिसत नव्हती. इतर ठिकाणी तालिबानी कमांडर अधिक कठोरपणे नियम राबवत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
 
परंतु, आम्हाला दिसलेल्या सर्व महिलांनी त्यांच्या केसांसह व चेहऱ्यासह संपूर्ण अंग झाकणारा बुरखा घातला आहे.
कोणावरही "सक्ती" झालेली नाही, आणि स्त्रियांनी कसा पोशाख करावा याबद्दल तालिबान केवळ "प्रचार" करतो आहे, असं हाजी हिकमत सांगतात.
 
परंतु, कोणत्याही स्त्रीने पूर्ण बुरखा घातलेला नसेल तर तिला गावात घेऊन जाऊ नये, अशा सूचना टॅक्सीचालकांना देण्यात आल्याचं मला कळलं.
 
आम्ही तिथून निघाल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका तरुण स्त्रीचा तिच्या कपड्यांवरून खून झाल्याच्या बातम्या आल्या. याला तालिबानचे सदस्य जबाबदार असल्याचे मात्र हाजी हिकमत नाकारतात.
 
तालिबानने सुरक्षा सुधारल्याबद्दल बाजारातील अनेक जण या संघटनेचं समर्थन करतात व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. पण तालिबानी लढाऊ सदस्य सतत आमच्या सोबत असताना रहिवाशांना खरोखर काय वाटतंय हे जाणून घेणं अवघड आहे.
 
या संघटनेची कट्टर मतं काही वेळा अधिक रूढीवादी अफगाणी लोकांशी जुळणारी असतात, पण तालिबानी आता काही मोठ्या शहरांवरील नियंत्रणासाठी जोरकस प्रयत्न करत आहेत.
 
मजार-ए-शरीफमधील फरश्यांनी नटलेल्या निळ्या मशिदीच्या छायेत गेल्या आठवड्यामध्ये स्त्री-पुरुष निवांत हिंडत होते. अधिक मोकळ्या सामाजिक वातावरणाचं प्रत्यंतर देणारी ती दृश् होती.
 
या शहरावर अजूनही सरकारचं नियंत्रण आहे. मी ज्यांच्याशी बोललो त्या सर्वांनीच तालिबानच्या उदयाचा अर्थ काय असेल याबद्दल चिंता व्यक्त केली. विशेषतः तरुण पिढ्या 'स्वातंत्र्यां'चा अनुभव घेत वाढलेल्या आहेत, त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.
 
पण बाल्ख जिल्ह्यात तालिबानी त्यांच्या स्वतःच्या प्रतिसरकारला अधिकृत रूप देत आहेत. त्यांनी शहरातील सर्व सरकारी इमारतींवर ताबा मिळवला आहे.
 
केवळ पोलीस कम्पाउंडचा भाग त्यांनी घेतलेला नाही, पण आता तो आता पोलिसांनीही सोडून दिलेला आहे. तालिबानचे कडवे शत्रू असलेल्या स्थानिक पोलीसप्रमुखांचं ते मुख्यालय होतं, आणि या प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी लढणाऱ्या बंडखोरांनी केलेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात या इमारतीचं अंशतः नुकसान झालं.
 
या मोहिमेबद्दल बोलताना तालिबानचे जिल्हा गव्हर्नर अब्दुल्ला मन्झूर यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटतं, तर त्यांचे साथीदार मोकळं हसतात.
 
अफगाणिस्तानातील इतर अनेक ठिकाणांप्रमाणे इथेही लढाई विचारसरणीय पातळीबरोबरच वैयक्तिक पातळीवरचीही होत.
 
तालिबानने ताबा घेतल्यापासून काही गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत. रस्ते साफ करणारे नारंगी गणवेशधारी सफाई कर्मचारी अजूनही कामावर येत आहेत.
 
काही नोकरशहांचं कामही सुरू आहे. आता त्यांच्यावर नवनियुक्त तालिबानी महापौर देखरेख ठेवत आहेत. एका मोठ्या लाकडी टेबलावर एका कोपऱ्यात 'इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान' असं नोंदवलेला पांढरा झेंडा लावलेला आहे, त्या टेबलापाशी महापौर बसतात.
 
ते आधी शस्त्रास्त्रं पुरवठा विभागाचे प्रमुख होते, आता ते करविषयक कामकाज बघतात- सरकारपेक्षा तालिबान व्यापाऱ्यांकडून कमी कर घेतं, असं ते अभिमानाने मला सांगतात.
 
सैनिकी धामधुमीकडून नागरी जीवनाकडून होणारं स्थित्यंतर अजून सुरूच आहे. आमच्या मुलाखतीदरम्यान महापौरांच्या मागे एक तालिबानी बंडखोर अजूनही बंदूक घेऊन उभा आहे. काही ज्येष्ठ व्यक्ती त्याला बाजूला बसवतात.
 
परंतु, इतर ठिकाणी इस्लामी धर्मग्रंथांच्या तालिबान्यांनी लावलेल्या अधिक कट्टर अर्थाची अंमलबजावणी स्पष्टपणे दिसते. स्थानिक रेडिओ केंद्रावर आधी इस्लामी संगीतासोबतच सर्वसाधारण लोकप्रिय गीतंही लागत होती.
 
आता केवळ धार्मिक प्रार्थना लागतात. 'अश्लीलते'ला चालना देणारं संगीत सार्वजनिक ठिकाणी वाजवण्यावर संघटनेने बंदी घातल्याचं हाजी हिकमत म्हणाते, पण व्यक्तींना अजूनही त्यांना हवं ते ऐकायची परवानगी आहे.
 
परंतु, बाजारात एका स्थानिक माणसाला संगीत ऐकताना पकडल्याचं माझ्या कानावर आलं. त्याला शिक्षा देण्यासाठी तालिबानी बंडखोरांनी रणरणत्या उन्हात बेशुद्ध होईपर्यंत अनवाणी चालायला लावलं.
 
परंतु, अशी काही गोष्ट झालेली नसल्याचं हाजी हिकमत आग्रहाने सांगतात. आम्ही तिथून बाहेर पडतो तेव्हा ते जवळच काम करणाऱ्या काही तरुणांकडे बोट दाखवतात आणि त्या तरुणांनी दाढ्या न राखल्याचं निदर्शनास आणून देतात.
 
"हे पाहा! आम्ही कोणावर सक्ती केलेली नाही," असं ते स्मित करत सांगतात.
 
तालिबानला जगासमोर स्वतःची सौम्य प्रतिमा रंगवायची असल्याचं उघड आहे. परंतु, देशाच्या इतर भागांमध्ये तालिबान अधिक कठोरपणे वागत असल्याच्या बातम्या आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीनुसारही हे फरक दिसू शकतात.
 
तालिबान्यांनी काबीज केलेल्या काही भागांमधून कायदाबाह्य खून व इतर मानवाधिकार उल्लंघनाच्या बातम्या येत आहेत. देश सक्तीने बळकावण्याचा प्रयत्न केला तर अफगाणिस्तानला सगळीकडून नाकारलं जाण्याचा धोका आहे, असा इशारा पाश्चात्त्य अधिकाऱ्यांनी तालिबानला दिला आहे.
 
तालिबान आधी सत्तेत असताना शरिया कायद्याच्या त्यांनी लावलेल्या अर्थानुसार निर्घृण शिक्षा दिल्या जात, याची आठवण अनेकांना ठळकपणे आहे.
 
गेल्या महिन्यात दक्षिणेकडील हेल्मन्ट प्रांतात बाल अपहरणाचा आरोप असलेल्या दोन माणसांना तालिबानने एका पुलावरून फाशी दिली. या माणसांवरील आरोप सिद्ध झाला होता, असं सांगून या कृतीचं समर्थन करण्यात आलं.
 
बाल्खमध्ये आम्ही गेलो त्या दिवशी एका तालिबानी न्यायालयात सुनावणी सुरू होती. सर्व खटले जमिनीशी संबंधित वादांचे होते. अनेकांना तालिबानच्या न्यायदानाबद्दल भीती वाटत असली, तरी काहींच्या मते सरकारच्या भ्रष्ट व्यवस्थेपेक्षा इथे वेगाने निवाडा होण्याची शक्यता तरी असते.
 
"मला बऱ्याच ठिकाणी लाच द्यावी लागत होती," आपला खटला सोडवण्यासाठी आधी काय प्रयत्न केले हे सांगताना एक याचिकाकर्ता तक्रारीच्या सुरात म्हणतो.
 
गेल्या चार महिन्यांमध्ये आपण एकही देहदंडाची शिक्षा दिलेली नाही, असं तालिबानी न्यायाधीश हाजी बद्रुद्दीन सांगतात. गंभीर निवाड्यांच्या पुनर्विचारासाठी याचिका न्यायालयं असल्याचं तालिबानकडून सांगितलं जातं.
 
पण कठोर शिक्षांचं बद्रुद्दीन समर्थन करतात. "अविवाहितांनी लैंगिक संबंध ठेवले, तर ती मुलगी असो वा मुलगा असो, सगळ्यांसमोर त्यांना 100 चाबकाचे फटके मारायचे, ही शिक्षा आमच्या शरियामध्ये स्पष्टपणे दिलेली आहे."
"पण विवाहितांचा दगड मारून जीव घ्यायचा असतो. चोरी करणाऱ्यांचा गुन्हा सिद्ध झाला, तर त्याचा हात कापायचा असतो."
 
या शिक्षा आधुनिक काळाशी सुसंगत नसल्याची टीका ते नाकारतात.
 
"लोकांच्या मुलांचं अपहरण होतंय. हे चांगलं आहे का मग? की, एका माणसाचा हात कापल्यामुळे समुदायात स्थैर्य आलं तर ते चांगलं आहे?"
 
सध्या तालिबान वेगाने चाई करत असताना सरकारकडे अफगाणिस्तानातील मोठ्या शहरांचा ताबा आहे. येत्या काही महिन्यांमध्ये दोन्ही बाजूंच्या संघर्षात प्रदीर्घ व वाढता हिंसाचार दिसण्याची शक्यता आहे.
 
तालिबान सैनिकी पातळीवर विजयी होईल याची आपल्याला खात्री आहे का, असं मी हाजी हिकमत यांना विचारलं. "होय," ते म्हणाले. "शांतता चर्चा यशस्वी झाल्या नाहीत, तर आम्ही जिंकू, इन्शाल्लाह."
 
शांतता चर्चा सध्या ठप्प आहेत आणि तालिबानने 'इस्लामी शासन' निर्माण करण्याची वारंवार मागणी केली असून त्यात विरोधकांना शरणागतचा इशाराच गर्भित आहे.
 
"आम्ही दोन्ही परदेशी फौजांना हरवलं आहे, आणि आता आमच्या अंतर्गत शत्रूंची वेळ आहे," असं हाजी हिकमत सांगतात.
 
अफगाणिस्तानातील संघर्षाची 20 वर्षं : कधी काय झालं?
9/11 हल्ल्यापासून ते प्रत्यक्षातील तीव्र लढाईपर्यंत आणि आता अमेरिकेच्या नेतृत्वाखालील फौजांनी पूर्ण माघार घेईपर्यंत झालं ते असं..
 
9/11 हल्ला - 11 सप्टेंबर 2001
ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानातील अल-कायदा या संघटनेने अमेरिकेच्या भूमीवरील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला केला.
 
चार विमानांचं अपहरण करण्यात आलं. दोन विमानं न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे नेण्यात आली आणि ट्रेड सेंटरची इमारत कोसळवण्यात आली. एक विमान वॉशिंग्टनमध्ये पेन्टागॉनच्या इमारतीवर आपटलं, आणि एक पेनसिल्वानियातील एका शेतात कोसळलं. या हल्ल्यात सुमारे तीन हजार लोक मृत्युमुखी पडले.
 
पहिले हवाई हल्ले - 7 ऑक्टोबर 2001
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो फौजांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या व अल-कायदाच्या आस्थापनांवर बॉम्बवर्षाव केला. काबूल, कंदहार व जलालाबाद यांचा यात समावेश होता.
 
एक दशकभर सोव्हिएतचं नियंत्रण अफगाणिस्तानवर होतं, त्यानंतर झालेल्या यादवी युद्धादरम्यान तालिबान्यांनी सत्ता हातात घेतली. त्यांनी बिन लादेनला अमेरिकेच्या ताब्यात द्यायला नकार दिला. तालिबानची हवाई सुरक्षा दलं आणि मोजक्या विमानांचा ताफा उद्ध्वस्त करण्यात आला.
 
काबूलचा पाडाव - 13 नोव्हेंबर 2001
तालिबानी बंडखोरांविरोधातील नॉर्दर्न अलायन्स हा गट नाटो फौजांच्या पाठबळावर काबूलमध्ये प्रवेश करतो आणि तालिबानी बंडखोर शहरातून पळ काढतात.
 
13 नोव्हेंबर 2001पर्यंत सर्व तालिबानी एकतर पळून गेलेले आहेत किंवा त्यांना निःशस्त्र करण्यात आलेलं आहे. इतर शहरही वेगाने त्यांच्या हातून जातात.
 
नवीन संविधान - 26 जानेवारी 2004
'लोया जिर्गा' इथे किंवा महासभेसमोर प्रदीर्घ वाटाघाटी झाल्यावर नवीन अफगाण संविधानाला कायदेशीर मान्यता मिळाली. या संविधानाद्वारे ऑक्टोबर 2004मध्ये राष्ट्राध्यक्षीय निवडणुका घेण्यात आल्या.
 
हमीद करझाई राष्ट्राध्यक्ष होतात
7 डिसेंबर 2004
 
पॉपलझाई दुरानी जमातीचे नेते हमीद करझाई नवीन संविधानानुसार पहिले राष्ट्राध्यक्ष होतात. ते राष्ट्राध्यक्षपदाचा पाच वर्षीय कार्यकाळ दोनदा पूर्ण करतात.
 
हेल्मन्डमध्ये युनायटेड किंगडमची दलं तैनात
मे 2006
 
देशाच्या दक्षिणेकडील तालिबानचा बालेकिल्ला असणाऱ्या हेल्मन्ड प्रांतात ब्रिटिश दलांचं आगमन होतं.
 
त्यांची सुरुवातीची मोहीम पुनर्बांधणी प्रकल्पांना सहकार्य करण्याची असते, पण लवकरच त्यांना लढाईतही गुंतावं लागतं. या संघर्षादरम्यान अफगाणिस्तानात साडेचारशेहून अधिक ब्रिटिश जवांनांनी प्राण गमावले.
 
ओबामांच्या काळातील उसळी
17 फेब्रुवारी 2009
 
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानात पाठवायच्या सैनिकांच्या संख्येत मोठी वाढ केली. एका टप्प्यावर सुमारे 1 लाख 40 हजार अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानात तैनात होते.
 
इराकमध्ये अमेरिकी फौजांनी नागरी लोकसंख्येचं संरक्षण करण्यासोबतच बंडखोरांना मारण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं, तिचं व्यूहरचना अफगाणिस्तानात वापरणारी ही 'उसळी' होती.
 
ओसामा बिन लादेनचा मृत्यू
2 मे 2011
 
पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये एका आवारात अमेरिकी नौदलाने केलेल्या हल्ल्यात अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेन याचा मृत्यू झाला. बिन लादेनचा मृतदेह तिथून बाहेर आणून समुद्रापाशी त्याचं दफन करण्यात आलं. सीआयएच्या नेतृत्वाखाली 10 वर्षं सुरू असलेल्या शोधमोहिमेचा इथे शेवट झाला. बिन लादेन पाकिस्तानी भूमीवर राहात असल्याचं सिद्ध झाल्यावर पाकिस्तान हा दहशतवादविरोधी लढाईतील अविश्वासू साथी असल्याचे आरोप अमेरिकेतून होऊ लागले.
 
मुल्ला उमरचा मृत्यू
23 एप्रिल 2013
 
तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहम्मद उमरचं निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी दोन वर्षांहून अधिक काळ गुप्त ठेवण्यात आली.
 
तालिबानचा पुन्हा उदय - 2015
तालिबान ही संघटना आत्मघातकी हल्ले, कार-बॉम्बस्फोट व इतर हल्ल्यांची मलिका सुरू करते. काबूलमधील संसदेची इमारत व कुंदुझ शहर यांच्यावर हल्ला होतो. इस्लामिक स्टेटचे बंडखोर अफगाणिस्तानात मोहीम सुरू करतात.
 
मृतांच्या आकडेवारीची घोषणा
25 जानेवारी 2019
 
2014 साली आपण देशाची सूत्रं हाती घेतल्यापासून सुरक्षा दलांमधील 45 हजारांहून अधिक जवान मृत्युमुखी पडल्याचं अफगाणी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी सांगितलं. आधी मानलं जात होतं त्यापेक्षा हा आकडा खूपच जास्त निघाला.
 
अमेरिकेचा तालिबानसोबत करार
29 नोव्हेंबर 2020
 
दोहा, कतार इथे झालेल्या बैठकीत अमेरिका व तालिबान अफगाणिस्तानात 'शांतता आणण्यासाठीच्या करारा'वर सह्या करतात. तालिबान बंडखोरांनी या कराराचं पालन केलं, तर 14 महिन्यांमध्ये सर्व दलं मागे घेण्याला अमेरिका व नाटो मित्रराष्ट्रांनी सहमती दर्शवली.
 
फौजा मागे घेण्याची तारीख
11 सप्टेंबर 2021
 
9/11 हल्ल्याला वीस वर्षं पूर्ण होत असताना 11 सप्टेंबर 2021पर्यंत अमेरिकी फौजा पूर्णपणे अफगाणिस्तानातून बाहेर आलेल्या असतील, असं नियोजित आहे. अधिकृत अंतिम तारखेपूर्वीच ही सैन्यमाघार पूर्ण होण्याची ठळक चिन्हं आहेत.