गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जानेवारी 2021 (16:46 IST)

शेतकरी आंदोलनात मरण पावलेला शेतकरी कोण आहे?

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावरच्या संचलनाची दृश्यं मनात ताजी असतानाच मध्य दिल्लीत पोलीस मुख्यालयाजवळ एका शेतकरी आंदोलकाच्या तिरंग्यात लपेटलेल्या मृतदेहाचं दृश्य पाहायला मिळालं.
 
सुमारे दोन महिन्यांपासून आंदोलनकर्ते शेकतरी दिल्लीच्या सीमांवर ठिय्या देऊन बसलेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मार्च थेट दिल्लीकडे वळवला आणि सीमेवरचे बॅरिकेड्स धुडकवून ते दिल्लीत शिरले. राजपथ, इंडिया गेट, संसद भवनापासून काही मिनिटांवर असलेल्या आय.टी.ओ या ठिकाणी शेतकरी आंदोलकांना अडवण्यासाठी पोलिसांनी मोठाल्या बॅरिकेड्स उभ्या केल्या होत्या. इथेच एका शेतकरी आंदोलकाचा ट्रॅक्टर अलटून मृत्यू झाला.
 
मरण पावलेला आंदोलक शेतकरी कोण होता?
मरण पावलेल्या शेतकऱ्याचं नाव नवनीत सिंह असं होतं आणि त्याचं व साधारण 27-28 वर्षं होतं अशी प्राथमिक माहिती बीबीसी मराठीला मिळाली. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा शेतकरी चाळिशीतील होता.
 
दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांची आहे. पण मरण पावलेला शेतकरी हा उत्तराखंडमधून आलेला होता. उत्तराखंड राज्यातील बाजपूर नावाच्या गावचा तो रहिवासी होता अशीही माहिती समोर आलेली आहे.
 
आय. टी. ओ जवळ पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलकांची संख्या वाढू लागली तसा तिथेही अश्रूधुराचा मारा करण्यात आला.
 
हा शेतकरी नवनीत सिंह हा स्वतः ट्रॅक्टर चालवत होता. त्यांचा ट्रॅक्टर उलटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण ट्रॅक्टर कसा उलटला याबद्दल निश्चित माहिती समोर आलेली नाही.
 
काही शेतकरी आंदोलकांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना म्हटलं की पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यातील गोळी लागून नवनीत यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि त्यांचा मृत्यू झाला. पण पोलिसांनी गोळीबार केल्याचं नाकारलं आहे. ट्रॅक्टर उलटल्याने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला इतकंच पोलिसांनी म्हटलं आहे.
 
संतप्त शेतकऱ्यांनी नवनीत यांचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळून घटनास्थळीच ठेवला. त्यांनी रुग्णवाहिका आणून मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. डॉक्टर्स अहवाल देताना मृत्यूचं कारण बदलतील अशी आपल्याला भीती वाटत असल्याचं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
काही काळानंतर संतप्त आंदोलकांनी पत्रकारांनाही घटनास्थळावरून दूर घालवायला सुरुवात केली. काही पत्रकारांना धक्काबुक्कीही केली तसंच ते सरकारधार्जिणे असल्याचीची त्यांच्यावर टीका करून त्यांच्याशी बोलायला नकार दिला.