या गूढ पंथाच्या प्रमुखांच्या मृतदेहाची ममी करून का ठेवण्यात आली?

Last Modified शुक्रवार, 14 मे 2021 (20:38 IST)
जोशुआ नेवेट
अमेरिकेतल्या कोलोरॅडोमध्ये बुधवारी संध्याकाळी स्टिव्हन हॅन्सेन यांना एका प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश मिळाले.
कोलोरॅडोतल्या डोंगरांनी वेढलेल्या कल-डी-सॅक या जेमतेम शंभर लोकवस्तीच्या गावात एक मृतदेह आढळल्याचं त्यांना कळलं. केस हातात येताच हॅन्सेन यांनी त्या घराच्या झडतीचे आदेश काढले आणि घटनास्थळी पोहोचले.

मात्र, घरात गेल्यावर त्यांनी जे बघितलं ते बघून त्यांचाच थरकाप उडाला.

त्या घराच्या बेडरूममधल्या बेडला एखाद्या देऊळ किंवा समाधीसारखं करण्यात आलं होतं आणि तिथे ठेवला होता महिलेचा कुजलेला मृतदेह. इजिप्तमधल्या एखाद्या ममीसारखा.
एका स्लिपिंग बॅगमध्ये हा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यावर क्रिसमसची लायटिंग होती आणि त्या मृतदेहाच्या डोळ्यांभोवती भडक आणि चमचमणारा मेकअप करण्यात आला होता.
अमेरिकेत Love Has Won या नावाचा एक पंथ आहे. या पंथाच्या 45 वर्षीय आध्यात्मिक गुरू अॅमी कार्लसन यांचा तो मृतदेह असल्याचा पोलिसांचा संशय होता.

हा मृतदेह अॅमी कार्लसन यांचाच आहे, याची खात्री पटवण्यासाठी डॉक्टरांना मृतदेहाच्या बोटांचे ठसे घ्यायचे होते. मात्र, मृतदेह इतका कुजला होता की बोटांचे ठसे घेणं अशक्य होतं. अखेर डॉक्टरांनी दाताच्या नमुन्यांवरून मृतदेहाची ओळख पटवली. या महिलेचा मृत्यू मार्च महिन्यातच झाला असावा, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
एका दुर्गम गावातल्या एका घराच्या खोलीत गेले कित्येक दिवस एका महिलेचा मृतदेह अशा प्रकारे जतन करण्याचा प्रयत्न सुरू होता. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सिव्हन हॅन्सेन म्हणाले, "एक मृतदेह घरात असूनही कुणालाच त्याचं काहीही वाटत नव्हतं. अशी माणसं मी यापूर्वी कधीही बघितलेली नाही."
अॅमी कार्लसन यांच्या कुटुंबीयांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, जे काही घडलं, त्याचं त्यांना जराही नवल वाटलं नाही.

अॅमी कार्लसन यांची थाकटी बहीण चेल्सी रेनिंगर बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "तिने स्वतः हा पंथ स्वीकारला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात तिची काहीच चूक नाही, असं म्हणता येणार नाही. मात्र, आयुष्याच्या शेवटी तिच्याबाबत जे घडलं ते योग्य नाही. असं कुणाबाबतही घडू नये."
Love Has Won या पंथाचा शेवट दुर्दैवीच असणार, याची चेल्सी यांना खात्री होती.
Love Has Won या पंथाविषयी फारशी माहिती नाही. मात्र, 2000 साली या गटाची स्थापना झाल्याचं सांगितलं जातं.
या गटाच्या एका अनुयायाच्या सांगण्यावरून अॅमी कार्लसन यांनीही या गटाचं शिष्यत्व स्वीकारलं. पुढे त्या स्वतःच या गटाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्या. या पंथाच्या अनुयायांच्या काही विशिष्ट आस्था किंवा श्रद्धा नसतात. उलट नव्या पिढीचं तत्त्वज्ञान, षडयंत्र सिद्धांत (conspiracy theory) आणि मसिहाची म्हणजेच देवदूताची उपासना अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असणाऱ्या एकप्रकारच्या प्रवाही धर्मशास्त्राचा अभ्यास आणि प्रचार, असं या पंथाचं स्वरुप होतं.
या पंथाच्या मसिहा स्वतः अॅमी कार्लसन होत्या. त्यांचे अनुयायी त्यांना 'देवमाता' (Mother God) म्हणायचे.

त्यांची शिकवण अतिपवित्र मानली जायची. त्याचं उल्लंघन कुणालाही करता येत नसे. मात्र, त्यांचे दावे अत्यंत काल्पनिक होते. 534 जन्मांपूर्वी आपण स्वतः येशू ख्रिस्त होतो, असा दावा त्या करत. आपण कॅन्सर बरा करू शकतो आणि दिवंगत अभिनेते रॉबीन विलियम्स यांच्या आत्म्याशी बोलू शकतो, असेही दावे त्या करत.
अॅमी कार्लसन दररोज यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून अमेरिका आणि जगभर पसरलेल्या आपल्या अनुयायांना उपदेश करत आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे खोटे दावे करत. या कार्यक्रमातून लोकांना देणगी देण्याचं आवाहनही करण्यात यायचं. तसंच व्हिडियोमध्ये या पंथाचे अनुयायी 'देवमाते'चं गुणगान करायचे.
कॅमेऱ्यावर हे अनुयायी आपल्या बोहेमियन जीवनशैलीत समाधानी आहेत, असं भासवायचे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी होती, अशी शंका यायला जागा आहे. या पंथात आपला प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचं या पंथाच्या काही माजी अनुयायांचं म्हमणं आहे.

या प्रकरणात कोर्टात सादर करण्यात आलेली कागदपत्रं बीबीसीनेही पडताळली. यात पोलिसांनी म्हटलं आहे, "अमेरिकेतल्या अनेक कुटुंबांनी या पंथाविरोधात तक्रार दाखल करून या पंथाचे अनुयायी लोकांचं ब्रेनवॉश करून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे आरोप केले आहेत."
यावर आम्ही Love Has Won ची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिक्रिया देण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. त्यांची वेबसाईटही बंद आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरूनही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरही उत्तर आलेलं नाही.


अॅमी कार्लसन यांनी या पंथासाठी स्वतःच्या कुटुंबावरही पाणी सोडलं होतं. अॅमी कार्लसन टेक्सासला रहायच्या आणि मॅकडोनल्डमध्ये कर्मचारी म्हणून काम करायच्या. त्यांचं लग्न होऊन त्यांना तीन अपत्यही झाली होती.
मी 12 वर्षांचा असताना आई आम्हाला सोडून आध्यात्माच्या मार्गावर गेली, असं अॅमी कार्लसन यांचा मुलगा कोल कार्लसन म्हणतो. ज्या क्षणी आई सोडून गेली त्याविषयी सांगताना कोलचा कंठ दाटून आला.

ह्युस्टनमध्ये आईबरोबर क्रिसमस साजरा करणार, या आनंदात असताना क्रिसमसच्या अगदी काही दिवस आधी वडिलांनी आई आपल्याला सोडून गेल्याचं सांगितल्याचं कोल म्हणाला. त्यावेळी कोलचा सर्वात धाकटा भाऊ जेमतेम दोन वर्षांचा होता.
आईविषयीच्या इतक्या कटू आठवणी असतानाही आपण आईवर अलोट प्रेम केल्याचं तो सांगतो.

तो म्हणतो, "ती आमच्यासोबत होती त्यावेळीसुद्धा आई म्हणून ती खूप चांगली नव्हती. मात्र, मी शेवटपर्यंत तिच्यावर प्रेम केलं." कोल कार्लसन सध्या ओरेगॅनोमधल्या पोर्टलँडमध्ये जीवशास्त्राचा अभ्यास करतोय.
अॅमी कार्लसन यांच्या पूर्वायुष्याविषयी बोलताना त्यांची बहीण चेल्सी रेनिंगर म्हणाल्या, "अॅमीच्या आयुष्यात तिला भरभरून प्रेम मिळालं. डलासमध्ये मुलांवर प्रेम करणाऱ्या आई-वडिलांच्या सानिध्यात आम्ही वाढलो."
शाळेत अॅमी हुशार विद्यार्थिनी होत्या. त्यांचा आवाजही सुरेल होता. त्यामुळे चर्चमधल्या प्रार्थनेच्या ग्रुपच्या त्या लीडर होत्या. मात्र, तरुणवयात इंटरनेटवर त्यांची अनोळखी लोकांशी मैत्री झाली आणि इथूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाल्याचं रेनिंगर सांगतात.

त्या अनोळखी लोकांसोबत राहण्यासाठी अॅमी घराबाहेर पडल्या. त्यानंतर कुटुंबातल्या कुणीच त्यांना बघितलं नाही किंवा कधी त्यांच्याशी बोललंही नाही.
अॅमी यांना त्या मार्गावरून परत आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने बरेच प्रयत्न केले. पण, कसलाच उपयोग झाला नाही. त्यांनी अमेरिकेतल्या सीबीएस चॅनलवरच्या एका टॉक-शोमध्येही नोंदणी केली. डॉ. फिल असं या टॉक शोचं नाव आहे. डॉ. फिल स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहेत.

त्यांनी गेल्याचवर्षी अॅमी कार्लसन आणि त्यांच्या अनुयायांवर एक कार्यक्रमही केला. या कार्यक्रमात त्यांनी अॅमी आणि त्यांच्या अनुयायांना बरेच प्रश्न विचारले आणि त्यांना पुन्हा सामान्य आयुष्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही.
अॅमी कार्लसन कधीच त्या वाटेवरून परतल्या नाही. अगदी शेवटपर्यंत.
अॅमी यांचा मृत्यू कसा झाला, याचा तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व जणांवर मृतदेहाशी छेडछाड केल्याचे अधिक गंभीर गुन्हे दाखल करण्याचा विचार असल्याचं या खटल्यातील वकिलांनी सांगितलं आहे.
अनेक दिवस अॅमी यांचा मृतदेह पडून असल्याने तो बऱ्यापैकी कुजला होता. त्यांची कातडी राखाडी झाली होती. डोळे दिसत नव्हते. दातही बाहेर आले होते.

अॅमी यांच्या अशा भयंकर मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. स्वतःला दैवी अवतार समजण्याचे परिणाम किती घातक ठरू शकतात, हे लोकांनी लक्षात घ्यावं, असं आवाहन ते करतात.

कुठल्याही पंथात जाण्याचा विचार करणाऱ्यांना अशाप्रकारे पंथात गेलेल्यांचा शेवट किती वाईट झाला आहे, हे सांगितलं पाहिजे, असं कार्लसन यांच्या आई लिंडा हॅथॉर्न यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
त्या म्हणाल्या, "तिने काही भयंकर चुका केल्या असल्या तरी ती एक माणूस होती. हे असले पंथ किती धोकादायक असतात, हे मला सांगायचं आहे. यातून इतरही आई, बहीण, मुलींना मदत होईल, अशी आशा करते."

यावर अधिक वाचा :

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार
येत्या ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच ...

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार ...

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द ...

आयएमएकडून आज राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय ...

आयएमएकडून आज  राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता
केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची ...

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द
जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १०जुलै २०२०ची अधिसूचना रद्द करण्याच्या ...