सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (22:55 IST)

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ममता बॅनर्जी विरोधी पक्षांचं नेतृत्व करतील का?

सरोज सिंह
पश्चिम बंगालमध्ये एखाद्या कार्यक्रमात ममता बॅनर्जींना भाषण द्यायचं असेल, तर त्या क्वचितच हिंदीत बोलतात.
 
पण बुधवारी पश्चिम बंगालमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'शहीद दिवसा'च्या कार्यक्रमावेळी ममता यांनी हिंदी व इंग्रजीमध्ये भाषण दिलं.
 
बंगालमधील एका आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या आपल्या 13 कार्यकर्त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ममता बॅनर्जी गेली 28 वर्षं 21 जुलैला 'शहीद दिवस' साजरा करतात.
 
पण त्यांनी यापूर्वी कधी या कार्यक्रमात हिंदी किंवा इंग्रजीमध्ये भाषण दिलेलं नव्हतं.
या वेळी त्यांनी हा पायंडा मोडला. शिवाय, या वर्षी या कार्यक्रमाचे फलक पश्चिम बंगालपासून त्रिपुरापर्यंत आणि गुजरातपासून तामिळनाडूपर्यंत लागले होते.
 
या ऑनलाईन कार्यक्रमात दिल्लीतील अनेक विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी झाले. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी अकाली दल, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्ष, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती, शिवसेना व काँग्रेस यांसारख्या विरोधी पक्षांचे नेते ऑनलाईन हजर होते.
विरोधी पक्षांचे इतके नेते एकत्र उपस्थित असल्यावर ममता बॅनर्जींनीसुद्धा ही संधी वाया घालवली नाही. येत्या आठवड्यात विरोधी पक्षांची एक सामायिक बैठक आयोजित करावी, असा प्रस्ताव त्यांनी इतर वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवला.
 
या बैठकीमध्ये आपण स्वतः सहभागी होऊ इच्छितो, असंही त्यांनी सांगितलं.
 
ममचा बॅनर्जी दिल्लीला येणार
सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे सर्व पक्षांचे नेते दिल्लीत हजर आहेत. ममता बॅनर्जीसुद्धा पुढच्या आठवड्यात दिल्लीला येणार आहेत.
 
आपण केवळ एक कार्यकर्ती असून, वरिष्ठ नेत्यांच्या आदेशांनुसार कृती करू, असं ममता बॅनर्जी बुधवारी म्हणाल्या.
या घडामोडीनंतर, 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या आघाडीची धुरा सांभाळतील का, याबद्दल तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत.
 
त्यांनी स्वतःला कार्यकर्ती संबोधलं असलं, तरी पंतप्रधानपदावरील त्यांचा संभाव्य दावा राजकीय विश्लेषकांना नजरेआड करता येण्यासारखा वाटत नाही.
 
ममतांनी शहीद दिवसाच्या निमित्ताने केलेलं भाषणच यासाठी ठोस आधार पुरवणारं ठरलं आहे.
 
अचूक वेळ
बुधवारी (21 जुलै) ऑनलाईन भाषणात ममता बॅनर्जी म्हणाल्या, "2024 साली काय होईल, हे मला माहीत नाही. पण त्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला हवी. आपण जितका वेळ वाया घालवू, तितका उशीर होत जाईल. भाजपच्या विरोधात इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक आघाडी करायला हवी."
 
ममतांच्या या विधानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार महुआ चॅटर्जी म्हणतात की, 2019 सालच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनीही विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा निवडणुकांना अगदीच थोडा वेळ उरला होता, या अपुऱ्या वेळेमुळे त्यांच्या प्रयत्नांना विशेष यश मिळालं नाही.
या वेळी ममता बॅनर्जी अडीच वर्षं आधीपासूनच प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजप आधीच्या तुलनेत थोडासा कमकुवत झाल्यासारखा वाटतो आहे, अशी वेळ साधून त्यांनी या प्रयत्नाला चालना दिली आहे. प्रतिस्पर्धी कमकुवत स्थितीत असेल तेव्हा हल्ला करावा, हा कोणत्याही लढाईचा मूलमंत्र आहे.
 
भाजपने पूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या, पण ममता बॅनर्जी यांच्या व्यूहरचनेने भाजपचं 'सोनार बांग्ला'चं स्वप्न उद्ध्वस्त केलं. बंगालमधील या विजयामुळे ममता उत्साहात आहेत आणि भाजप आधीच्या तुलनेत काहीसा हताश आहे.
 
आपण प्रत्यक्ष जमिनीवर अटीतटीची झुंज देण्याची तयारी ठेवली, तर मोदी-शाह दुकलीला हरवणं शक्य आहे, याचा एक दाखला ममता बॅनर्जी यांनी विरोधकांसमोर ठेवला आहे.
 
विरोधकांची एकजूट
परंतु, ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी महुआ चॅटर्जींच्या मांडणीशी सहमत नाहीत.
 
नीरजांच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी यांच्यासाठी दिल्ली अजून बरीच दूर आहे. बुधवारी झालेली ऑनलाईन सभा म्हणजे त्या दिशेने टाकलेलं केवळ पहिलं पाऊल आहे. त्यांना विरोधकांची एकजूट साधायची आहे यात काही शंका नाही. पण त्यांना तसं करता येईल का, याबद्दल अजून बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. आताच त्यांना पंतप्रधानपदाच्या संभाव्य दावेदार मानणं घाईचं होईल.
 
नीरजा म्हणतात, "ममता बॅनर्जी विरोधकांपैकी कोणाला एकत्र आणतील? कशा आणतील? कोण त्यांच्या सोबत येईल? कोण सोबत येणार नाही? नेतृत्व कोण करेल? पश्चिम बंगालच्या बाहेर त्यांचा प्रभव कितपत आहे? या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत.
 
काँग्रेस स्वतःला राष्ट्रीय पक्ष मानतो, बाकीचे पक्ष प्रादेशिक आहेत, त्यामुळे आपला बंगालच्या बाहेरसुद्धा प्रसार व्हावा, याचा एक प्रयत्न ममतांनी बुधवारच्या सभेद्वारे केला."
केंद्रातून भाजपला हटवण्याच्या हेतूने विरोधकांना एकत्र आणणं, हेच ममता बॅनर्जींसमोरचं खूप मोठं आव्हान असणार आहे, असं नीरजा यांना वाटतं.
 
बुधवारच्या सभेमध्ये ममता यांनी शरद पवार आणि पी. चिदंबरम यांना आवाहन केलं की, या मुद्द्यावर दिल्लीत 27 ते 29 जुलै या दिवसांमध्ये बैठकीचं आयोजन करावं. त्या वेळी स्वतः ममतासुद्धा दिल्लीत येणार आहेत.
 
विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यापैकी कोणीतरी खांद्यावर घ्यावी आणि आपण त्यांना सहकार्य करू, अशी त्यांची इच्छा यावरून स्पष्ट होते.
 
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस व डावे पक्ष वगळता विरोधकांपैकी अखिलेश यादव, तेजस्वी यादव, शरद पवार अशा बड्या नेत्यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला होता.
 
महुआ चॅटर्जी सांगतात की, "विधानसभा निवडणुकीवेळी ज्या पक्षांनी ममतांना पाठिंबा दिला, ते पक्ष आजही त्यांच्या सोबत आहेत. या समर्थनाच्या पाठबळावर संसदेपासून विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रभाव पाडण्याचा ममतांचा प्रयत्न आहे. त्यांनी केवळ विरोधी पक्षांनाच नव्हे, तर शेतकऱ्यांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. वेळोवेळी प्रत्येक मंचावर त्या लोकांशी संबंधित समस्या मांडताना दिसत आहेत."
पश्चिम बंगालमध्ये भाजपची जी अवस्था झाली, तसंच काही उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही झालं आणि भाजपच्या काही जागा कमी निवडून आल्या, तर 2024 साली विरोधकांचं काम बरंचसं सोपं होईल, असं महुआ म्हणतात. पण त्यासाठी बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी केली तशी कामगिरी उत्तर प्रदेशातील पक्षांना करून दाखवावी लागेल.
 
आघाडीतील मोठे पक्ष जागा वाटपावेळी जास्त जागांची मागणी करतात, पण त्यांची कामगिरी त्या प्रमाणात होत नाही, त्यामुळे समाजवादी पक्ष छोट्या पक्षांशी आघाडी करेल, असं अखिलेश यादव यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
 
या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळे लढणारे पक्ष लोकसभा निवडणुकीतच एकत्र आले तर ते सूत्र कितपत परिणामकारक ठरेल, याबद्दल आत्ता काही अंदाज बांधणं अवघड आहे. ममतांच्या बुधवारी झालेल्या सभेमध्ये बहुजन समाज पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपी या पक्षांचे कोणीही नेते उपस्थित नव्हते.
 
सोनिया आणि पवार यांची ममतांना पसंती
विरोधकांच्या संभाव्य आघाडीसंदर्भात सोनिया गांधी व शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असं नीरजा चौधरी सांगतात. त्यांच्या मते, विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्यामध्ये प्रशांत किशोर यांचीही भूमिका कळीची ठरू शकते.
 
काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असले, पक्षाला गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये जास्त जागा मिळाल्या नसल्या आणि विधानसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसची कामगिरी फारशी चांगली झाली नसली, तरीही अजून काँग्रेस अजूनही 'मोठा भावा'च्या भूमिकेतून बाहेर आलेली नाही. शरद पवारसुद्धा त्यांच्या प्रदेशातील एक शक्तिशाली नेते आहेत. अशा वेळी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व प्रादेशिक पक्ष स्वीकारतील का, असा प्रश्न उपस्थित होतो. दुसऱ्या बाजूला, प्रादेशिक पक्षांमधून आलेलं नेतृत्व काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष स्वीकारेल का, हासुद्धा प्रश्न आहे.
महुआ म्हणतात, "सोनिया व पवार यांना ममतांच्या नेतृत्वाबाबत काही आक्षेप असणार नाही. भाजपला केंद्रातील सत्तेतून हटवणं, हे प्रत्येक विरोधी पक्षाचं सध्याचं मुख्य उद्दिष्ट आहे.
 
"राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्ष मोठा आहे, पण सोनिया गांधींना पंतप्रधान व्हायचं नाहीये. काँग्रेसकडून पंतप्रधान म्हणून फारतर राहुल गांधींचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येऊ शकतं. पण वय आणि अनुभव या दोन्ही निकषांवर राहुल गांधी ममता बॅनर्जींपेक्षा कमी पडतात. समजा, ममता बॅनर्जी पंतप्रधान असतील असं स्वीकारायची वेळ राहुल गांधींवर आली, तरी त्यात काय अडचण आहे? राहुल गांधींचा अहंकार खूप मोठा आहे, असं काही त्यांच्या सार्वजनिक वावरामधून कधीही दिसलेलं नाही."
 
पवारांनासुद्धा निवडणुकीच्या राजकारणाची अतिशय चांगली समज आहे. ते महाराष्ट्रातील मराठा नेते आहेत आणि ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या आहेत."
 
पवार, ममता व सोनिया एकेकाळी काँग्रेसमध्ये एकत्र होते, ही बाबसुद्धा लक्षात घ्यायला हवी.
 
पश्चिम बंगालबाहेरचा ममतांचा प्रभाव
महुआ चॅटर्जी म्हणतात, "2024साली ममता बॅनर्जी पंतप्रधानपदाच्या दावेदार असतील का, असा प्रश्न तुम्ही विचारलात तर, ही शक्यता नाकारता येणार नाही, असं मी म्हणेन."
 
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या केवळ 42 जागा असल्या, तरी देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल याहून कमी जागा पाठीशी असतानाही पंतप्रधान झालेले आहेत, त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतील दावा पश्चिम बंगालच्या निवडणुकानंतर आणखी ठोस झाला, तर त्यात काही नवल नाही. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवाची चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यात होते, तेव्हा त्यात ममता बॅनर्जींचंही नाव घेतलंच जातं.
ममतांचा पक्ष बंगालपुरताच मर्यादित आहे, ही वस्तुस्थिती असली, तरी 'शहीद दिवसा'चे फलक बंगालच्या बाहेरसुद्धा लावून त्यांनी पश्चिम बंगालपलीकडेही आपली ओळख निर्माण करण्याचा मानस स्पष्ट केला. शिवाय, त्यांनी बंगालीऐवजी हिंदी व इंग्रजीमध्ये लोकांना संबोधित केलं, या भाषणाचं थेट प्रक्षेपण पश्चिम बंगालबाहेरच्या दिल्ली, गुजरात, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश व तामिळनाडू या ठिकाणी झालं.
 
बुधवारच्या भाषणात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्या केवळ एक कार्यकर्ती असून, वरिष्ठ नेत्यांच्या आदेशांनुसार कृती करतील. यावर महुआ म्हणतात, "हे विधानसुद्धा ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाचा भाग आहे. एखादा नेता कोणत्याही पदाची मनिषा राखून नसेल, तर इतर राजकीय पक्ष त्याच्यावर लवकर विश्वास ठेवतात आणि त्याच्या सोबतही जातात."
 
ममतांच्या विधानाचा अर्थ स्पष्ट करताना महुआ म्हणतात, "भारताचं पंतप्रधानपद मिळवणं आपल्या अग्रक्रमावर नसून केंद्रातून भाजपला खाली खेचणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, असंही ममतांनी सांगितलं आहे."
 
राजकीय तज्ज्ञ ममता बॅनर्जींच्या भाषणाचे निरनिराळे अर्थ लावत आहेत, आपापल्या परीने त्याची मांडणीही करत आहेत. येत्या काळात 2024 सालच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेची चर्चा होईल, तेव्हा त्या यादीत ममता बॅनर्जींचंही नाव असेल, याबाबत मात्र सर्वांना खात्री आहे.