शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

योगेंद्र पुराणिक: मराठी माणसानं अशी जिंकली जपानमधली निवडणूक

योगेंद्र पुराणिक यांनी जपानमधल्या महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. योगेंद्र पुराणिक हे मूळचे पुण्याचे आहेत. पण गेल्या 15 वर्षांपासून ते जपानमध्ये वास्तव्यास आहेत. बँकर म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या पुराणिक यांनी 3 वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. सध्या ते जपानमधल्या Constitutional Democratic Party (CDP) या पक्षात आहेत. सुधारणा करण्यासाठी राजकारणात आलो, असं ते सांगतात. त्यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे;
 
प्रश्न - तुम्हाला निवडणूक लढवायची पहिल्यापासून इच्छा होती का?
उत्तर - 3 वर्षांपूर्वी मी राजकारणात यायचा विचार केला. माझ्या वार्डमध्ये आम्ही Little India नावाचा प्रोग्राम सुरू केला. पण तो चुकीच्या दिशेनं जात असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग माझ्या लक्षात आलं की, मी बाहेर बसून नुसती तक्रार करण्यात काही अर्थ नाही. मग मी स्वत:हून राजकारणात यायचं ठरवलं आणि बदलासाठी काम करायला सुरुवात केली.
 
प्रश्न - निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही जपान का निवडलं?
उत्तर - मी टोकियोतल्या एडोगावामध्ये गेल्या 15 वर्षांपासून राहत आहे. इथंच एक व्यावसायिक व्यक्ती आणि पालक म्हणून माझी वाढ झाली. मी स्थानिक संघटनांसोबत सक्रीय पद्धतीनं काम केलं. एडोगावा राहण्यासाठी उत्तम ठिकाण असलं तरी नवीन पीढीसाठी पोषक ठरतील असे बदल इथं करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. इथ मुलांसाठीच्या संगोपन केंद्रांची कमतरता आहे. त्याशिवाय सार्वजनिक शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याची गरज आहे. तसंच नोकरीची संधी कमी होत आहे आणि ज्येष्ठांकरता असलेल्या सोयीसुविधांची कमतरता आहे. एडोगावामध्ये राहणाऱ्या भारतीय आणि परदेशी लोकांची संख्या मोठी आहे. परदेशी लोकांच्या सुलभ जीवनासाठी एडोगावानं सक्षम पावलं उचलली नाहीत. तसंच जपानी लोक आणि परदेशी नागरिक यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी सक्षम प्रयत्न केले नाहीत. याशिवाय एडोगावामधील पायाभूत सुविधा जुन्या आहेत. कार्यालयं, चित्रपटगृह, दुकानं यांसारख्या बहुउद्देशीय पायाभूत सुविधा शहरात नाहीत. मला या शहरासाठी बहुउद्देशीय पायाभूत सुविधा सुचवायच्या आहेत. त्यासाठी जपान आणि विदेशातल्या कंपन्यांना इथं बोलवायचं आहे.
 
प्रश्न - जपान आणि भारतातल्या निवडणुकीत काही फरक असतो का?
उत्तर - जपानमधील निवडणूक अतिशय पद्धतशीर असते. तसंच नवीन चेहऱ्यांना खूपदा संधी दिली जाते. यासाठी कागदांची जमावजमाव, निवडणुकीसाठीच्या पैशाचं नियंत्रण खूपच महत्त्वाचं असतं. सभ्य पद्धतीनं प्रचार मोहीम राबवली जाते. प्रत्येक उमेदवार एकमेकांचा आदर करतात आणि शिवीगाळ केली जात नाही. तसंच पोलीसही खूप दक्ष असतात. एखादा उमेदवार नियम मोडत तर नाही ना, याची ते सतत चाचपणी करत असतात. आपल्याकडे जसं प्रचारादरम्यान घरोघरी भेटी दिल्या जातात, वैयक्तिक भेटी घेतल्या जातात, तसं जपानमध्ये चालत नाही. इथं कार्यकर्ते मोफत प्रचार करू शकत नाहीत. यासाठी त्यांना एकतर पैसे मिळतात अथवा त्यांचा वेळ ते दान करतात.
 
प्रश्न - तुम्ही जपानला का शिफ्ट झालात?
उत्तर - 1997 आणि 1999मध्ये सरकारी शिष्यवृत्ती मिळवून मी इथं आलो. त्यानंतर 2001मध्ये मी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली.
प्रश्न - भारतीय वंशाचे असल्यामुळे जपानमध्ये निवडणूक लढवणं किती कठीण होतं?
उत्तर - मला असं वाटतं, निवडणूक लढवणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. शेवटच्या क्षणापर्यंत किती लोक मला मतदान करतील, हे मला माहिती नव्हतं. असं असलं तरी, सामाजिक संस्थांमधील माझा सक्रीय सहभाग, भारतीय समुदायासोबतचा माझा सततचा संपर्क, माझं एडोगावामधील इंडिया कल्चर सेंटर, या सर्वांमुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मी नेहमीच लोकांना मदत करत आलो आहे. तसंच माझे मार्गदर्शक आणि विद्यमान खासदार Akihiro Hatsushika या सर्वांनी खूप मेहनत घेतली. तसंच माझी भाषणंही लोकांना आवडली, असं मला वाटतं.
 
प्रश्न - भविष्यात भारतात येऊन भारतीय राजकारणात सहभाग घ्यायची तुमची इच्छा आहे का?
उत्तर - सध्या तरी मी तसा काही विचार केलेला नाही. मी राजकारणी नाहीये. मी या सगळ्याकडे सुधारणा करणारा एक अधिकारी या नजरेनं पाहतो. माझं प्रसाशन आणि विकासाला प्राधान्य आहे.
 
प्रश्न - भारतीय राजकारणाबाबत तुमचे काय विचार आहेत?
उत्तर - भारतीय राजकारण पारदर्शक नाही आणि आग्रही बदल होत आहेत, असं वाटत नाही. यापेक्षा खूप काही करता येऊ शकतं, खूप काही गाठता येऊ शकतं.
प्रश्न - एखाद्या पक्षात प्रवेश करावा, असं तुम्हाला का वाटलं?
उत्तर - माझ्या राजकीय संघटनेचं नाव Jisedai wo ninau kai (पुढच्या पीढीसाठीची संघटना) आहे. आणि मी ज्या पक्षात प्रवेश केला आहे त्याचं नाव Constitutional Democratic Party (CDP) असं आहे. सध्या हा जपानमधील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. Akihiro Hatsushika यांनी मला एकदम स्पष्ट प्रस्ताव दिला आणि मी तो स्वीकारला. Edano हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. सकारात्मक आहे.
 
प्रश्न - बँकर असणं तुम्हाला राजकीय प्रवासात कशापद्धतीनं मदत करणार आहे?
उत्तर - बँकरची नोकरी खास असते. लोकांच्या पैशांची बँकर अतिशय उत्तम पद्धतीनं काळजी घेतो. नगरसेवक म्हणून काम करताना मला ही संस्कृती जोपासायची इच्छा आहे.
 
प्रश्न - दोन देशांमधील राजकारणात काय साम्य आहे?
उत्तर - घराणेशाहीचं राजकारण दोन्हीकडे मजबूत आहे. काँग्रेसप्रमाणे LDPचा तळ मजबूत आहे. धार्मिक श्रद्धेमुळे पडद्यामागे अनेक गोष्टी घडतात.
 
प्रश्न - तुमच्या राजकीय महत्त्वाकांक्षा काय आहेत, आता तुम्ही पुढे काय ठरवलं आहे?
उत्तर - पुढच्या निवडणुकीत मला महापौर पदासाठी लढायचं आहे. आणि त्यापुढे खासदारकीसाठी. मोठे बदल करायाचे असल्यास मोठ्या भूमिकेची गरज असते. पण त्यापूर्वी मला एडोगावासाठी काम करायचं आहे.
 
प्रश्न - नरेंद्र मोदींविषयी तुम्हाला काय वाटतं? भारताचे पुढचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला कुणाला बघायला आवडेल?
उत्तर - मी स्वत:ला एखाद्या व्यक्तीशी जोडत नाही. मी प्रयत्नांशी स्वतःला जोडतो. सध्यातरी आपल्याकडे नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधान पदासाठी खूप चांगले पर्याय नाहीत. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर ते प्रत्यक्षात काम करून आपल्या देशाला पुढे घेऊन जातील, लोकांना काय हवंय, त्यावर काम करतील, अशी मला इच्छा आहे. भारतात अजून खूप काम बाकी आहे.