गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (09:19 IST)

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत संसारानंतर विभक्त, कशी होती दोघांची लव्हस्टोरी?

अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे.
18 वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त होत आहेत. धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.
 
धनुषने ट्विटरवर एक छोटी पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
"18 वर्षांची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही सहजीवनाचा प्रवास केला होता. आज आम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या खाजगीपणाचा आदर ठेवा," असं धनुषने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ऐश्वर्यानेही अशीच पोस्ट लिहीत विभक्त होत असल्याची माहिती दिली आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी असलेली ऐश्वर्या दिग्दर्शिका आणि पार्श्वगायिकाही आहे.
धनुष आणि ऐश्वर्याचा 2004मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन मुलंही आहेत.
 
धनुष- ऐश्वर्याची लव्हस्टोरी
धनुष आणि ऐश्वर्या दोघेही तमीळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज कुटुंबातले आहेत. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे, तर धनुष हा प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक कस्तुरीराजा यांचा मुलगा.
दोघांचीही भेट धनुषच्या Kadhal Kondaen चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस झाली. ऐश्वर्याने धनुषचं त्याच्या चित्रपटातील परफॉर्मन्सबद्दल अभिनंदन केलं.
दुसऱ्या दिवशी धनुषला एक पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड मिळालं...ते ऐश्वर्यानं पाठवलं होतं. मात्र त्यानंतरही त्या दोघांमध्ये मैत्रीशिवाय फार काही नव्हतं.
मात्र, त्यांच्या अधूनमधून होणाऱ्या भेटीगाठी या मीडियात चर्चेचा विषय ठरू लागल्या. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत धनुषनं ऐश्वर्या ही केवळ आपल्या बहिणीची मैत्रीण आहे, आमच्यात बाकी काही नाही असं म्हटलं होतं.
याच दरम्यान, दोन्ही कुटुंबांना धनुष आणि ऐश्वर्या हे एकमेकांना अनुरुप आहेत असं वाटलं आणि त्यांनी लग्नाची बोलणी सुरू केली.
18 नोव्हेंबर 2004 ला धनुष आणि ऐश्वर्या विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नाच्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं, कारण त्यावेळी धनुषचं वय केवळ 21 वर्षं होतं. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. अर्थात, या गोष्टीचा आम्हाला फरक पडत नाही, असं दोघांनीही म्हटलं होतं.
ऐश्वर्या आणि आपल्या नात्याबद्दल बोलताना धनुषनं एकदा म्हटलं होतं, की आम्ही दोघंही एकमेकांना आवश्यक असलेली स्पेस देतो. आम्हाला दोघांनाही कायम एकत्र राहायचं आहे.
'आधी मला इंग्रजी बोलण्यासाठीचा आत्मविश्वास नव्हता. कोणी माझ्याशी इंग्रजीत बोललं, तर मी फक्त 'येस' आणि 'नो' एवढंच बोलायचो. पण माझ्या बायकोने मला बरीच इंग्रजी पुस्तकं वाचायला लावली. त्यामुळं इंग्रजी बोलायला मदत झाली," असंही त्यानं एकदा सांगितलं होतं.
 
धनुषची कारकिर्द
2002 मध्ये 'थुल्लुवाढो इलामाई' चित्रपटातून 'महेश' नावाचं पात्र रंगवत त्यानं अभिनयाची कारकिर्द सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंतचा त्याचा प्रवास अगदीच सोपा राहिलेला नाही.
चित्रपट क्षेत्रातील जडणघडणीच्या काळात त्याला अनेक वादांना सामोरं जावं लागलं. शारीरिक ठेवणीवरून त्याच्यावर टीका झाली, त्याला अपयशही सहन करावं लागलं.
धनुषवर तामिळ अभिनेते राजकिरण यांचा प्रचंड प्रभाव आहे. ते माझ्या कुटुंबासाठी 'देवासमान' आहेत, असं धनुष म्हणतो. राजकिरण यांनीच धनुषचे वडील कस्तुरीराजा यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती, तसंच धनुषचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट 'पा पांडी'चेही निर्माते तेच होते.
दिग्दर्शक वेत्रीमारन आणि धनुष हे अगदी जिवलग मित्र आहेत. दोन दिग्दर्शकांबरोबर कथा न ऐकताही काम करायची धनुषची तयारी असते. त्यापैकी भाऊ सेल्वाराघवन असून दुसरा वेत्रीमारन आहे.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळामध्ये इंजिनीअर व्हायचं की शेफ व्हायचं याबद्दल धनुषच्या मनात संभ्रमाची स्थिती होती. पण त्याच्या भावानं त्याला चित्रपट क्षेत्रामध्ये आणलं.
धनुषने "रांझणा" या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी हिंदी येत नसल्याचं त्यानं दिग्दर्शक आनंद एल. राय यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. आनंद एल राय यांनी त्याला तामिळमध्येच बोलायला सांगितलं. डबिंग हिंदी कलाकाराकडून करून घेऊ असं ते म्हणाले होते.
मात्र दुसऱ्या दिवशी धनुषने त्याचे हिंदी संवाद तामिळमध्ये लिहिले आणि ते पाठ केले. चित्रीकरणाच्या वेळी तो हिंदीतच बोलला. एक-दोन टेकमध्येच तो दिग्दर्शकाचं समाधान होईल अशा रितीने काम करत होते.
"अभिनेता म्हणून माझ्याकडून दिग्दर्शकाला बऱ्याचा आशा असणार. त्यामुळं त्यांची निराशा व्हावी असं मला वाटत नाही," असं धनुष सांगतो.
 
चित्रपट निर्मितीतही मिळवले यश
धनुषने त्याच्या 'वंडरबार' या कंपनीद्वारे 16 चित्रपटांची निर्मिती केली आहे. कक्का मुत्ताई, विसारनाई, काला व वाडाचेन्नई अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. कक्का मुत्ताई व विसारनाई या चित्रपटांचा निर्माता म्हणून धनुषला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.
 
त्याला 'आडुकलम' व 'असुरन' या चित्रपटांसाठी दोन वेळा अभिनयाचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
गेल्या दोन वर्षांमध्ये त्याच्या कारकिर्दीचा आलेख चढउतार असलेला राहिला आहे. वाडा चेन्नई, मारी-२, असुरन, पत्तास, कर्नन व जगामे थन्धीरम हे त्याचे चित्रपट या दरम्यान आले.
 
काधल कोन्देन, पुदुपेट्टई, आदुकलम, वाडाचेन्नई, असुरन व कर्नन या चित्रपटांनी त्याच्या अभिनयाला नवी ओळख मिळवून दिली.
 
ट्विटरवर धनुषचे एक कोटींहून अधिक फॉलोअर आहेत.
 
आगामी काळात धनुषच्या काही महत्त्वाच्या चित्रपटांसह त्याला पहिला हॉलिवूड चित्रपट 'द ग्रेमॅन' देखील येत आहे. त्यानंतर स्वतःच्या दिग्दर्शक म्हणून पुढच्या प्रोजेक्टचा विचार करणार असल्याचं त्यानं सांगतलं आहे.
 
संगीताशी वेगळं नातं
"धनुषला संगीताविषयी बरंच ज्ञान आहे, पण तो दिखावा करत नाही. 'जगामे थन्धीरम' करताना आम्ही त्याच्या सूचना ऐकूण मग गाणी चांगली झालीत का ते ठरवायचो," असं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत संगीतकार संतोष नारायणन यांनी सांगितलं होतं.
 
'जगामे थन्धीरम'पूर्वी संतोष नारायणन यांनी धनुषच्या 'कर्नन' या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं. या चित्रपटात धनुषने 'थत्तन थत्तन' हे गाणं गायलं. 45 मिनिटांत गाण्याचं रेकॉर्डिंग करून तो पुढच्या चित्रिकरणासाठी रवाना झाला होता.
'कोलावेरी डी' हे गाणं धनुषच्या आयुष्यातील एखाद्या अध्यायासारखं आहे. हे गाणं प्रचंड हिट ठरलं. या गाजलेल्या गाण्याद्वारेच त्यानं गाणं लिहिण्याची सुरुवात केली. आतापर्यंत धनुषनं 30 पेक्षाही जास्त गाणी लिहिली आहेत.
 
संगीत दिग्दर्शक युवन शंकर राजा यांच्याबरोबर त्यानं गायक म्हणून सर्वप्रथम काम केलं. जी.व्ही.प्रभासकुमार, देवा, हॅरिस जयराज अशा अनेक संगीतकारांसाठीही त्यानं गाणी गायली आहेत.
 
इलाईराजा यांच्या संगीताचा धनुष हा प्रचंड मोठा चाहता आहे. इलाईराजा यांचं संगीत इतर कशाहीपेक्षा महत्त्वाचं आहे, असं धनुष म्हणतो.
 
त्यांच्या संगीतातून मला अभिनयामध्ये प्रेरणा मिळते असं धनुष सांगतो. दुःखी, आनंदी व रोमँटिक दृश्यांचं चित्रीकरण करताना इलाईराजा यांचं संगीत ऐकून मग तो अभिनयाला सुरुवात करतो.
 
धनुषने अनिरुद्धला '3' या चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शनाची संधी दिली.