रेल्वे २ लाख ५० हजार कोटी गुंतवणार
आगामी पाच वर्षांत रेल्वेच्या विस्तारासाठी, आधुनिकीकरणासाठी आणि सुधारणांसाठी दोन लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे आज सरकारतर्फे रेल्वे अर्थसंकल्पात सांगण्यात आले. हा निधी खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्राशी हातमिळवणी करून उभा करण्यात येणार आहे. अशा प्रकल्पांना लागणारा एवढा मोठा निधी एकट्या रेल्वेला स्वतःच्या स्त्रोतातून उभा करता येणे शक्य नाही. यासाठी आगामी पाच वर्षांत एक लाख कोटींची गुंतवणूक करण्यासाठी आम्ही अनेक सार्वजनिक-खासगी क्षेत्रांशी भागिदारी करून त्यांचे सहकार्य घेत आहेत, असे रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. या प्रकल्पांत मेट्रो स्टेशन्सवर जागतिक दर्जाच्या सुविधा देणे, बहुउपयोगी बड्या इमारती बांधणे यासह अनेक बाबींचा समावेश आहे. नवी दिल्ली, पाटणा, सिकंदराबाद आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही स्टेशन्स विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागविण्यात येणार असल्याचेही लालूंनी जाहीर केले. या स्टेशन्सवर पंधरा हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक होईल, असे आम्हाला अपेक्षित आहे. खुल्या निविदा पद्धतीच्या माध्यमातून तसेच सार्वजनिक- खासगी भागिदारीतून आम्ही डिझेल लोके, इलेक्ट्रिक लोको आणि रेल्वे कोच कारखाना सुरू करण्याच्या तयारीत आहोत. यासाठी चार हजार कोटीचा निधी लागेल, असेही ते म्हणाले.