मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (08:39 IST)

राज्यात गुरुवारी 1 हजार 182 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत काहीचे चढ- उतार झाले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी 1 हजार 182 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर राज्यात गुरुवारी  19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे बुधवारी राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसताना गुरुवारी मात्र 58 नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 516 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याचबरोबर राज्यात आज एकूण 10 हजार 250 रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरु आहेत.
 
राज्यात आजपर्यंत 78 लाख 62 हजार 650 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 675 इतकी आहे. यामुळे कोरोना मृतांचा दर 1.82 टक्के झाला आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 77 लाख 04 हजार 733 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.99 टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 75 लाख 74 हजार 774 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 62 हजार 650 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण 10.14 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 1 लाख 56 हजार 920 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर 801 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
 
राज्यात आज तब्बल 58 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 52 रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत तर पुणे ग्रामीणमध्ये 3 रुग्णांची नोंद झाली आहे. यात औरंगाबाद, सातारा आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत राज्यात 4567 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 4456 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.