राज्यात काल २४८७ नव्या रुग्णांची वाढ; बाराशेहून अधिक जणांना डिस्चार्ज
राज्यात काल नव्या २४८७ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या आता ६७ हजार ६५५ इतकी झाली आहे. तसंच काल एका दिवसात १२४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण २९ हजार ३२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण ३६०३१ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज ८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे- ७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९, कल्याण डोंबिवली ४), नाशिक- ६ (मालेगाव ६), पुणे- ११ (पुणे ९, सोलापूर २), लातूर-१ (उस्मानाबाद १), अकोला-१(यवतमाळ १) असे आहेत. एकूण मृतांमध्ये ४६ पुरुष तर ४३ महिलांच समावेश होता. आज नोंद झालेल्या ८९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४७ रुग्ण होते, तर ३५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील होते. तर ७ जण ४० वर्षांखालील होते.
या ८९ रुग्णांपैकी ५६ जणांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले होते. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२८६ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू हे २७ एप्रिल ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५० मृत्यूंपैकी मुंबई २७, नवी मुंबई -९, मालेगाव -६,कल्याण डोंबिवली -४, ठाणे -३, सोलापूर- १ असे आहेत.