शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (18:41 IST)

Novavax: नोव्हावॅक्सच्या कोरोना लशीचं उत्पादन भारतात होणार, पण लस मिळणार कधी?

लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगादरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेच्या नोव्हावॅक्स औषधनिर्मिती कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लशीचे उत्साहवर्धक परिणाम समोर आले आहेत.
तिसऱ्या फेजच्या मानवी चाचण्यांनंतर नोव्हावॅक्सने त्यांच्या लशीची परिणामकारता (एफिकसी) ही 90.4 टक्के असे सोमवारी घोषित केलं.
 
भारतासाठी ही आनंदाची बातमी यासाठी आहे की नोव्हावॅक्सने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच पुण्याच्या 'सिरम इन्स्टिट्यूट ओफ इंडिया'सोबत 2021 मध्ये या लशीचं उत्पादन करण्याचा करार केला आहे.
 
त्यामुळे लवकरच जग वाट पाहत असलेल्या या लशीचं उत्पादन भारतातही सुरु होण्याचे संकेत आहेत.
भारतात ही लस 'कोवोवॅक्स' या नावानं ओळखली जाईल जिचं उत्पादन 'सिरम' करेल. सोमवारी नोव्हावॅक्सनं जाहीर केलेले परिणाम हे अमेरिका आणि मेक्सिकोतल्या एकूण 29960 जणांवर केलेल्या ट्रायल्सचे आहेत.
'सिरम' तर्फे भारतातही या लशीच्या चाचण्या होत आहेत, ज्या अंतिम टप्प्यात आहेत असं समजतं आहे. पण अमेरिकेतल्या ट्रायल्समध्ये फायझर आणि मॉर्डना या अमेरिकन लशींनी दाखवली तशीच 90 टक्क्यांहून अधिक परिणामकारता या लशीनं दाखवली आहे.
 
युरोप आणि भारतात प्रथम परवानगी मिळण्याची शक्यता
या लसउत्पादक कंपनीनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मुख्य कार्यकारी अधिकारी स्टॅनले जे एरिक यांनी म्हटलं आहे की, "आमची NVX-CoV2373 ही लस सौम्य आणि तीव्र अशा दोन्ही प्रकारच्या कोरोना विषाणू संसर्गासाठी एकदम उपायकारक ठरते आहे आणि पूर्ण संरक्षण देत आहे.
 
जगाची जशी आवश्यकता आहे त्यानुसार जलद गतीनं आम्ही विविध नियामक मंडळांकडे माहिती देण्याची आणि त्यानंतर लस पुरवठा करण्याच्या दिशेनं काम करत आहोत."
आवश्यक परवाने मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सध्या नोव्हावॅक्स आहे आणि त्यानंतर लगेचच उत्पादनाला सुरुवात करुन सप्टेंबरपर्यंत प्रतिमहिना 100 कोटी डोस आणि 2021च्या शेवटापर्यंत 150 कोटी डोस प्रति महिना एवढं उत्पादन वाढवण्याची तयारी असल्याचं या कंपनीनं म्हटलं आहे.
 
पण अमेरिकेअगोदर युरोपीय देश आणि भारतासारख्या देशांमध्ये या लशीला तात्काळ परवाने मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जाते आहे, कारण आणीबाणीच्या काळात तात्काळ परवाने देऊन हव्या तेवढ्या लशी अमेरिकेला मिळाल्या आहेत.
 
2020 सप्टेंबरमध्ये 'सिरम' सोबत 100 कोटी लशींचा करार
गेल्या वर्षी, म्हणजे 2020 साली सप्टेंबर महिन्यातच नोव्हावॅक्सने 'सिरम' सोबत लसनिर्मितीचा करार केला होता. त्यानुसार पुण्यात 2021 सालचा अखेरपर्यंत 100 कोटी डोसेसचं उत्पादन होईल असं त्यावेळेस प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं होतं .
 
अर्थात या लशींच्या पुरवठा 'कोवॅक्स' कराराअंतर्गत विकसनशील आणि अविकसित देशांनाही होणार आहे. त्यामुळे आता भारतात उत्पादन सुरु झाल्यावर भारतातील वापरासाठी यातल्या किती लशी उपलब्ध होतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या लशीच्या मर्यादित प्रमाणातल्या ट्रायल्स भारतातही होत असून 18 वर्षांखालील लहान मुलांवरही त्या होऊ शकतात.
 
भारतात या वर्षांच्या शेवटास 20 कोटी 'कोवोवॅक्स'चे डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यावर अद्याप केंद्र सरकार, 'सिरम' आणि नोव्हावॅक्स यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.
 
आजपर्यंत 25 कोटी नागरिकांचं लसीकरण केलेल्या भारतात लसीकरणाचा वेग कमालीचा मंदावला आहे. राज्य सरकारं उत्पादक कंपन्यांकडून थेट लस विकत न घेऊ शकल्यानंतर आता केंद्र सरकारनं परदेशी लशी विकत घेण्याचा निर्णय घोषित केला आहे. पण त्यानंतर अद्याप देश नव्या लशींच्या प्रतिक्षेतच आहे.
 
स्पुटनिक येऊन दाखल झाली आहे, पण फायजर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांच्यासोबतच करार अद्याप झाले नाही आहेत.
 
सरकारनं या वर्षाअखेरपर्यंत बहुतांश लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण करु असं वारंवार म्हटलं आहे, पण या लशी येणार कशा हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळेच अजून एका लशीची परिणामकारता सिद्ध झाल्यानंतर आणि त्याचं मोठं उत्पादन भारतात होणार असल्यानं, लशींसाठी आसुसलेल्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.