मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2023
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (20:17 IST)

पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जन सुरु, हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीनंतर अखेर प्रशासनाची माघार

ganesh visarjan
गेल्या चार वर्षापासून घरगुतीसह सार्वजनिक गणेशमूर्तीचे कोल्हापुरात शंभर टक्के पर्यावरण पूरक विसर्जन होत आहे. यंदा मात्र हिंदुत्ववादी संघटनने पंचगंगेतच गणेश मूर्ती विसर्जन करण्याची भूमिका घेतली होती.यावर महापालिका प्रशासनाकडून पंचगंगा नदी घाट बॅरीकेट्स लावून बंद करत पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. याचबरोबर कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला विरोध करून पंचगंगा नदी घाटावरील बॅरीकेट्स तोडून थेट नदी घाटावर प्रवेश करत गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जन करण्यास सुरुवात केली.पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही हिंदुत्ववादी संघटनांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणाबाजीत विसर्जन सुरु ठेवले.अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली. आणि पंचगंगा नदीमध्ये गणेश मुर्ती विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला.
 
पंचगंगा नदीमध्ये प्रदूषण करू नये असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.त्यामुळं सर्व शहरवासियांनी पंचगंगा नदीत विसर्जन करू नये,असं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेनं केलं होत.पण या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या.आज दुपारी शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंचगंगा नदी काठावर दाखल झाले. त्यांनी आक्रमक होत ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत बॅरिकेटस तोडले आणि पंचगंगा नदीत गणेश मूर्तीच विसर्जन केलं. मोरयाच्या गजरात पंचगगा नदीत मूर्ती विसर्जन सुरू ठेवलं.पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही हिंदुत्ववादी संघटनेच्या दबावापुढं त्याचं काही चाललं नाही.