नागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर. साधेच परंतु ऐसपैस असे आहे. झाडाच्या प्रचंड मोठ्या बुंध्याशी शांतपणे टेकून बसलेली वाटावी अशी गणपतीची भव्य मूर्ती मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते.
डोक्यावर मोठ्ठा मुकुट धारण केलेली आणि मंदिरात कुठूनही थेट दर्शन होणारी ही मूर्ती आहे. गणपतीच्या डोक्यावर गंधाच्या ठिकाणी लाल रंगाचा चमचमता हिरा आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. पण परकीय आक्रमणात ते उद्ध्वस्त झाले. त्यानंतर काही काळाने 1866 साली ती मूर्ती पुन्हा सापडली आणि तेथे मंदिर बांधण्यात आले. हा गणपती नागपूरकरांचे आराध्य दैवत आहे. माघ महिन्यातील चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो लाखोंच्या संख्येने भक्त या काळात गणपतीच्या दर्शनाला येतात.