पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारला पदभार; सार्क देशाच्या प्रमुखांची भेट
देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजता पंतप्रधान कार्यालयाचा पदभार स्वीकारला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाचा पहिला दिवस असल्याने संपूर्ण जगाचे याकडे लक्ष लागले आहे. शपथविधी सोहळ्याला स्कॉर्पिओमधून आलेले मोदी पंतप्रधान कार्यायलयात बीएमडब्ल्यूमधून पोहोचले.
कार्यालयात दाखल झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले आणि त्यानंतर अधिकृतरित्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर तातडीने ते हैदराबाद हाऊसच्या दिशेने रवाना झाले. इथे ते अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान जगभरातील सार्क देशांच्या प्रमुखांसह देशातील दिग्गज नेत्यांनीही मोदींच्या शपथविधीला हजेरी लावल्याने हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरला.
पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोदी सार्क अनेक देशांच्या प्रमुखांची औपचारिक भेट घेतील.
हैदरबाद हाऊसमध्ये या बैठका सुरु झाल्या असून दुपारी 12 वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीत भारत-पाकमधील विविध मुद्दयांवर चर्चा होणार असल्याचे समजते. या दोन देशाच्या नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.