1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

गुढीपाडवा हा सण का साजरा करतात ? कथा व संपूर्ण माहिती

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यात देखील साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
 
गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते.महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नावाच्या राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात.
 
तसेच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचे मानले जाते. पुढे सत्य-युगाची सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात.
 
एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते. शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. तेव्हा देवी-देवता, ऋषी-मुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले आणि ते शंखासुराचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा. तेव्हा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंखास धारण केले.
 
तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
 
तर एका आणखी कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात. तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी देवी सासरी जाते.
 
श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नव्हे तर विजयध्वज देखील आहे. जेव्हा "श्री राम" लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते.
 
तसेच असे ही सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.