शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2020 (13:05 IST)

नववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या

सबंध भारतात अधिकतम चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. जगाचा आरंभ या दिवशी झाला ही हिंदूंची धारणा आहे. आपण दैनंदिन व्यवहारात ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत असतो तरी आजही आपण आपले सण उत्सव जल्लोषात आणि उत्साहाने साजरे करतो. जे भारतीय कालगणेनुसार येतात. ३१ डिसेंबर हा ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार शेवटचा दिवस व १ जानेवारी हा नववर्षाचा पहिला दिवस. पण जगामध्ये १ जानेवारी केवळ शुभेच्छा देण्यासाठी असतो व ३१ डिसेंबर हा साजरा करण्यासाठी असतो असे दिसते आहे. गंमतीने सांगायचं झालं तर आजही भारतात काही लोक विचारतात ३१ दिसंबर कौनसे तारीख को हैं? हा प्रश्न मजेशीर असल तरी यामागची सामान्य वर्गातल्या लोकांची भावना जाणून घेण्यासारखी आहे. त्यांना ३१ डिसेंबर हा जणू सण किंवा उत्सव वाटत असतो. पण या दिनांकातच हा उत्सव (पार्टी हा शब्द जास्त योग्य आहे) कधी साजरा करतात ते स्पष्ट दिसतं. असो...
 
काही ठिकाणी दिवाळी पाडवा हे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते. तरी सुद्धा देशात आणि विदेशात अधिकतम चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. गुढी पाडवा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड, काठी किंवा तोरण असा आहे. हिंदीत सुद्धा कुडी म्हणजे लाकूड असा अर्थ होतो. म्हणूनच लाकडापासून बनलेल्या झोपडीला कुटी असं म्हणतात. गुढी या शब्दाचा मागोवा घेतल्यास हा शब्द कानडी भाषेतून आला असावा असे तज्ज्ञांचे मत आहे. कानडी भाषेत गुढी अर्थात गुडी म्हणाजे ध्वज, बावटा, निशाण असा आहे. तरी गुडीचा दुसरा अर्थ मंदिर असाही होतो. आपण बांबू, गडू, वस्त्र, फुलमाळाने उभारलेली गुढी ही मंदिरासारखी भासते. म्हणून गुढी हा शब्द रुळला असावा असं श्री. कृ. पां. कुलकर्णी यांनी त्याच्या व्युत्पत्तीकोशात लिहिलं आहे. 
 
कोंकणी भाषेत यास सौसार पाडवो किंवा सौसार पाडयो असं म्हणतात. सौसार किंब्व संसार हे संवत्सरचे अपभ्रंश आहे. दक्षिण भारतात पाडव्याला पदिया म्हणतात. तेलगू हिंदू यास उगादी म्हणतात तर कानडी आणि कोंकणी हिंदू युगादी म्हणतात. दोन्ही शब्दाचा अर्थ युगाचा आरंभ किंवा वर्षारंभ असाच आहे. काश्मिरी हिंदू यास "नवरेह" म्हणतात. तर मणिपूरमध्ये हा दिवस "सजिबु नोंगमा पानबा" किंवा "मेइतेई चेहराओबा" या नावाने ओळखला जातो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये "गुडी पडवा" किंवा "उगाडी" असे म्हणले जाते. पंजाबमध्ये बैसाखी, सिंधीमध्ये चेटी चांद, बंगालमध्ये नव बारशा, आसाममध्ये गोरु बिहू, तामिळनाडूत पुथन्दू आणि केरळमध्ये विशू या नावाने हा सण साजरा केला जातो.
 
गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र, कनार्टक व आंध्र प्रदेशात गोडाचा पदार्थ म्हणून पुरणपोळी केली जाते. त्याच प्रमाणे आंध्र प्रदेशात "पच्चडी/प्रसादम" तीर्थ म्हणून लोकांना वाटले जाते. याचे सेवन केल्यामुळे माणूस निरोगी राहतो अशी समज आहे. अनेक ठिकाणी कडुलिंबाचा प्रसाद सुद्धा दिला जातो. कडुनिबांची कोवळी फुले, कैरी, जिरं, ओवा, हिंग, काळं मीठ, गूळ हे सर्व पदार्थ कुटून त्यात थोडे पाणी घालून तीर्थ तयार केले जाते. या सणानिमित्त साखरेच्या गाठींचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. महत्वाचे म्हणजे धुळ्यात साखरेचे दागिणे आणि गाठी तयार करणारी कुटुंब ही मुस्लिम समाजाची आहेत. होळी आणि गुढीपाडवा हे सण जवळ आले की ही कुटुंब या गाठी बनविण्याच्या कामात व्यस्त होतात. म्हणजे सण हिंदूंचे असले तरी प्रत्येक भारतीयाचा रोजगार यावर अवलंबून असतो. यामुळेच आपल्या सर्व सणांची महती लक्षात येते. या सणांमुळे भारताचं अर्थशास्त्र सुरु आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हिंदू सण म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक भावना जपण्याची ही एक परंपरा आहे. साधारणपणे गुढीची पूजा करून तिला वरण, पुरण पोळी, श्रीखंड, दूध-साखर, पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. निरंजन आणि उदबत्ती लावली जाते.
ब्रम्हध्वज नमस्तेsतु सर्वाभिष्ट फलप्रद
प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु
म्हणत गुढीची पूजा केली जाते आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी नैवेद्य दाखवून ती विधीपूर्वक उतरवली जाते. गुढी मांगल्याचे प्रतीक म्हणून तिची पूजा केली जाते. 
 
नवे वर्ष साजरा करण्याची प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असली तरी भावना तीच आहे. खेडे गावात स्त्रीया घरासमोरील अंगण गाईच्या शेणाने सारवून सुंदर रांगोळीने सजवतात. उत्तम प्रकारे फुलांची आरास करुन देवाची पूजा करतात. अभ्यंग स्नान करुन नवे कपडे, दागदागीने घालून लोक छान तयार होतात... शेतकरी बांधव या दिवशी शेतात नांगरणी करतात. शेतकऱ्यांप्रमाणे बाकीचे लोकही आपल्या घराच्या अंगणातील माती थोडी उकरतात. असे केल्याने मातीची गुणवत्ता सुधारते असे म्हणतात. शेतकरी शेतीच्या उपकरणांची त्यावर अक्षता टाकून पूजा करतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात घराला आंब्यात पानांनी बनवलेले तोरण लावून सजवतात. हे तोरण आनंद, सुख व समृद्धीचे प्रतिक आहे. अशीही एक मान्यता आहे की या दिवशी प्रभूरामचंद्रांनी बालीचा वध केला. त्यानंतर बालीच्या अत्याचारापासून मुक्तता मिळाल्यामुळे लोकांनी घराघरात उत्सव साजरा करुन ध्वज अथवा गुड़िया उभारली. 
 
गुढी, पताका किंवा काठीची पूजा ही केवळ भारतात नव्हे तर जगभरात केली जाते. कदाचित मूर्ती अथवा इतर दैवी प्रतिके निर्माण होण्याआधी काठीची प्रथा सुरु झाली असावी. कारण काठी म्हणजे शौर्य, संरक्षण याचे प्रतीक आहे. महाराष्ट्राप्रमाणे त्रिपुरा, राजस्थान, मध्य प्रदेशात काठी पूजेची आणि काठीनृत्याची व काठी खेळाची परंपरा प्रचलित आहे. पूर्वी संरक्षणासाठी सामान्य लोक काठीचा वापर करत होते. त्यामुळे माणूस आणि काठी यांचे नाते घट्ट झाले आहे. चक्राकार, चौपदी, दौड, बनेठी असे काही काठीचे खेळ आहेत. कोकणात चैत्र महिन्यात सुरु होणार्‍या यात्रांमध्ये काठीचा वापर केला जातो. साधारण २० फुटांचा बांबू त्यास घुंगरु, हाराने सजवला जातो व जत्रेच्या आदल्या दिवशी रात्री वाजगगाजत ही काठी निघते आणि जत्रेच्या दिवशी देवस्थानी पोहोचते.  
दक्षिण आफ्रिकेतील 'दामारा' या जमातींमध्ये काठीपूजेची परंपरा होती. ज्यू धर्माच्या स्थपनेपूर्वी इस्रायलमधील अशेराह पोल ही काठी पूजेची परंपरा प्रचलित होती. युरोपमधील मेपोल हा काठी उत्सव ख्रिश्चनपूर्व काळापासून साजरा केला जातो. चीन, कोरिया म्यानमार अशा देशांतही काठी पूजनाची परंपरा विभिन्न पद्धतीने साजरी केली जाते. गुढी, पताका, निशाण अथवा काठी उभारुन पूजा करण्याची पद्धत केवळ भारतात प्रचलित नसून ती जगदमान्य आहे. परंतु भारतातील हिंदूंनी आजही आपली प्राचीनता जपलेली आहे. जगात काही ठिकाणी प्राचीन परंपरा आजही आढळतात. पण ईस्लाम आणि ख्रिश्चन पंथाच्या उदयाच्या काळात कदाचित या प्रथा पुसल्या गेल्या असाव्यात. पण भारतीय लोकांनी ही परंपरा जतन करुन ठेवली आहे. अजून सहस्त्र वर्ष तरी भारतातीय प्रथा, परंपरा, पूजा विधी, व्रत वैकल्ये पाळले जाणार आहेत. कारण भारतीय माणूस हा संघप्रणाली मानणारा आहे. विविधतेत एकता मानणारा आहे. म्हणूनच सहस्त्रो वर्षांपासून भारतातील विविध संस्कृतीची विविधता असूनही इथल्या जनतेत हिंदू भावना दृढ होती आणि आजही आहे. 
 
आज गुढी पाडव्याला एक नवे सामुहिक स्वरुप प्राप्त झाले आहे. काही वर्षांपूर्वी कुणा सज्जनाला ही कल्पना सुचली असावी. त्याचे पालन आज केवळ महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगातही केले जाते. गुढी पाडव्यला निघणारी शोभा यात्रा हिच ती नवकल्पना... पूर्वी गुढी पाडवा हा वैयक्तिक स्तरावर साजरा केला जायचा. पण शोभा यात्रेच्या निमित्ताने सर्व समाजातील बांधव एकत्र येतात आणि हा सण सामुहिक पद्धतीने साजरा करतात. शोभा यात्रा म्हणजे गुढीपाडव्याला सकाळी ठिकठिकाणी मिरवणूका काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपारिक पोशाखात स्त्री-पुरुष स्वागतयात्रांमध्ये सहभागी होतात. लेझीम, ढोल, झांज, ध्वज अशा विविध पथकांचा समावेश यात असतो. इतकेच नव्हे तर दही हंडी प्रात्यक्षित, मल्लखांब, कुंफू - कराटे, लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाल अफिरवणे अशा खेळांचाही यात समावेश झालेला आहे. या उत्सवातून लोकांचे प्रबोधन व्हावे म्हणून चित्ररथही साकारले असतात. कुणी शिवाजी महाराज, कुणी झांशीची राणी, सावरकर, विवेकानंद यांची  वेशभूषा करुन मिरवतात... रथामध्ये राम, लक्षण, सीता यांचा थाट तर पाहन्य़ासारखा असतो... घोड्यावर बसलेले शिवराय, झांशीची राणी यांना पाहू आपला ऊर अभिमानाने भरुन येतो. बाईक, सायकलवरुन भगवा फेटा घालून शिस्तबद्ध पद्धतीत फिरतात... नववारी नेसलेल्या स्त्रियां, त्यांच्या नाकातील चमकणारी आकर्षक सोन्याची नथ, कानातले कर्णफुलं, गळ्यातील लक्ष्मीहार, मंगळसूत्र, मोत्यांचा सर, सोन्याचे बाजूबंध, हिरेजडीत बांगड्या, कमरपट्टा, अर्धचंद्रकोर टिकली, हळद कुंकू, चांदीचे पैंजण, केसांचा पारंपारिक अंबाडा, त्यावर सुवासित गजरा अशा पद्धतीने नटलेल्या स्त्रीया बाईकवरुन फिरतात तेव्हा आपल्याला कौतुक वाटतं की या अत्याधुनिक युगातही तरुण मंडळी आपली संस्कृती जपत आहेत. भगवे झेंडे आणि भगवे फेटे पाहून शिवकाल साकारल्याचा भास होतो. ज्या मार्गावरुन मिरवणूक जाणार असतात, तिथे चौकाचौकात भव्य रांगोळ्या आणि उंच गुढ्या उभारलेल्या दिसतात... मिरवणूकींमध्ये असणार्‍या लोकांची व स्वयंसेवकांची गैरसोय होऊ नये म्हणून लोक चौकाचौकात पाणी, सरबत व खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. मुंबईमध्ये गिरगाव-ठाणे-डोंबिवलीमध्ये पाहायला मिळणारी मिरवणूक आज उपनगरांतही पोहोचली आहे. इतकंच काय तर सबंध महाराष्ट्रात आज मिरवणूका काढल्या जातात. विशेष म्हणजे काही वर्षांपासून विदेशात राहणारे मराठी-हिंदू बांधव त्या त्या देशांतही अशा मिरवणूका काढत आहेत. 
 
गुढी पाडवा हा विश्वाच्या निर्माणाचा दिवस आहे असे आपण मानतो. आज जगात हिंदू धर्माविषयीची आस्था वाढत आहे. तलवारीच्या बळावर नव्हे व प्रसार प्रचार न करता विदेशातील नागरिक हिंदू धर्माच्या जवळ येत आहेत. कारण हिंदू धर्मातील मोकळे वातावरण व उपासना पद्धतीतील विविधता... तुम्ही नास्तिक असाल तरी तुम्ही हिंदू आहात अशी सूट हिंदू धर्माने दिलेली आहे. ती इतर कोणत्याच पंथात पाहायला मिळत नाही. म्हणूनच हिंदू धर्माविषयीचे आकर्षण प्रचंड वाढत आहे. येणार्‍या काळात अनेक देशांत हिंदू सण साजरे व्हायला लागले तर नवल वाटून घेण्याचे कारण नाही. गुढी पाडवा हा त्यातलाच एक मंगल सण आहे. साडे तीन मुहूर्तंपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा. म्हणूनच हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.    
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री