शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

मूगडाळ ढोकळा

साहित्य : एक वाटी मूगडाळ, ३-४ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, साखर, मीठ, इनोचं एक पाकीट.

फोडणीसाठी : तेल, मोहरी, हिंग, मिरची, पाणी (कढीपत्ता आणि तीळ ऐच्छिक)

मूगडाळ दोन-तीन तास आधी भिजत घालावी. भिजलेली डाळ शक्‍य तेवढं कमी पाणी वापरून मिक्‍सरमध्ये रवाळ वाटावी. वाटतानाच त्यात आलं, लसूण आणि दोन मिरच्या घालाव्यात.

वाटल्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात मीठ, किंचित साखर, लिंबाचा रस आणि थोडी हळद घालून नीट मिसळावे. कुकरमध्ये पाणी घालून गॅसवर ठेवावे. ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे, त्याला आतून सगळ्या बाजूनं नीट तेल लावावं. वरच्या मिश्रणात पाकिटातील सगळं इनो टाकून हलक्‍या हाताने पुन्हा एकदा नीट मिसळावं.

हे मिश्रण आता तेल लावलेल्या भांड्यात ओतून भांडं कुकरमध्ये ठेवावं. साधारण १५-२० मिनिटं वाफवावं आणि बंद करून ७-८ मिनिटं तसंच ठेवावं. बाहेर काढून वाफ गेल्यावर तुकडे करावेत. फोडणीसाठी एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग व मिरच्यांचे तुकडे टाकावेत. भांडं गॅसवरून खाली काढून त्यात पाऊण वाटी पाणी घालून पुन्हा गॅसवर ठेवून एक उकळी आणावी. नंतर चमच्यानं ही फोडणी ढोकळ्यावर सगळीकडे पसरावी. वर कोथिंबीर भुरभुरावी.