मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जय हनुमान
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (13:53 IST)

Hanuman Jayanti हनुमान जयंती विशेष, मारुतीचे जन्मगाव

hanuman jayanti
Nashik MH
यावर्षी हनुमान जयंती 6 एप्रिल 2023 रोजी साजरी होणार आहे. देशात हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हनुमान जयंती वर्षातून दोनदा येते. हनुमान जयंती ही हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. याची दोन कारणे दिली आहेत. वर्षातील पहिली हनुमान जयंती चैत्र महिन्यात येते.हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. म्हणूनच हा दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. आणि वर्षातील दुसरी हनुमान जयंती दिवाळी जवळ येते. दिवाळीच्या जवळ येणारी हनुमान जयंती कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते.
 
हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस :
हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय.चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते.या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे, त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजिनेरी येथे झाला असे मानले जाते.
 
वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे. हनुमान हा श्रीरामांचा निससीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची भक्ती ही सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे.
 
हे सर्व पाहता हनुमान यांचा जन्म नाशिकच्या अंजनेरी येथे झाला, होता , त्यबद्दल विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.
hanuman ajanri gaon
Nashik MH
अंजनेरी गाव हनुमान जन्मस्थान
अंजनेरी पर्वताच्या कुशीत पहुडलेले अंजनेरी गाव हनुमान जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. अंजनेरी पर्वताची भव्यता प्रत्येकाला श्रद्धेने नतमस्तक व्हायला लावत असली तरी याच पर्वताच्या कुशीत एकेकाळचा वैभवशाली इतिहास व त्याच्या भग्नावशेष झालेला प्राचीन मंदिरांचा सडा अखेरचा श्वास घेतोय, हाही दैवदुर्विलास. एकेकाळी राजधानीचा दर्जा असलेले अंजनेरी बाजारपेठेचे मुख्य ठिकाण होते. या इतिहासाच्या वैभवात लेणीचे कोंदणही भर टाकतात. अंजनेरीच्या अवतीभवती एकांतात पहुडलेल्या असंख्य पाऊलखुणा पुन्हा पुन्हा ‘त्या’ वैभवाची आठवण करून देतात.
 
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे निघाल्यावर महिरावणीनंतर नाणे संशोधन केंद्रापासून पुढे निघाल्यावर डाव्या हाताला अंजनेरी पर्वत आपल्याला खुणावू लागतो. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला हनुमानाचे मोठे मंदिर लक्ष वेधून घेते. अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे जन्मस्थान असलेले अंजनीमाता मंदिर आहे. हजारो वर्षांपासून माणूस श्रद्धेने येथे येतो आहे. बाल हनुमानाने केलेल्या अनेक बाल करामती तसेच सूर्याला फळ समजून ते खाण्यासाठी पहिले उड्डाण याच पर्वतावरून घेतल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे. माता अंजनीच्या नावावरूनच या गावाला अंजनेरी नाव पडल्याचे म्हटले जाते. रस्त्यालगतच्या हनुमान मंदिरापासून गावात जाता येते. नव्या जुन्या घरांनी गाव सजले आहे. अंजनेरी पर्वताकडे जाण्यासाठी वनविभागाने पहिल्या टप्प्यापर्यंत गाडीने जाता येईल, अशी सोय केली आहे.
anjaneri killa
Nashik MH
अंजनेरी ईश्वरसेन (ईश्वरदत्त)नावाचा पराक्रमी अभिर राजाची राजधानी
अंजनेरी गाव तसे लहान पण त्याच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ते मोठे भासते. या गावचा इतिहासही रोचक आहे. इ. स. २६०च्या सुमारास अंजनेरी ईश्वरसेन (ईश्वरदत्त)नावाचा पराक्रमी अभिर राजाची राजधानी होती. ईश्वरसेनने सातवाहनाचे वर्चस्व झुगारून या प्रदेशावर यज्ञश्री सातकर्णीनंतर स्वत:चे राज्य निर्माण केले. चालुक्य राजा भोगशक्ती यांचा कलचुरी वर्ष ४६१ मधील ताम्रपटानुसार महाराजधिराज परमेश्वर विक्रमादित्य यांच्या अधिपत्याखाली एकूण चौदा हजार गावे होती. यात अंजनेरीचा उल्लेख सापडतो. इ. स. ७१०च्या सुमारास बदामीच्या चालक्यांची सत्ता काही काळ नाशिक, कोकण परिसरात होती. या गावातील शिद कुटुंबीयांकडे मिळालेल्या ताम्रपटावरून गुर्जरवंशीय जयभट (तृतीय, इ. स. ७ वे शतक), हरिश्चंद्रवंशीय राजा भोगशक्ती (इ. स. ७ वे शतक), पृ‌थ्वीचंद्र भोगशक्ती (इ. स.७ वे, ८ वे शतक) हे चालुक्य राजे अंजनेरीवर राज्य करीत असल्याच्या नोंदी आहेत.
 
सिन्नर येथील यादव राजांच्या काळात सेऊनचंद्र तिसरा याने इ. स. ११३० ते ११४५च्या सुमारास अंजनेरीहून काही काळ कोकणचा कारभार पाहिला.
 
जैनांचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभू यांच्या जैन मंदिराची व्यवस्था
जैनांचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभू यांच्या जैन मंदिराची व्यवस्था नीट चालावी म्हणून अंजनेरी येथील वत्सराज, लाई, दशरथ या व्यापाऱ्यांनी तीन दुकाने, काही घरे दान दिल्याचे उल्लेख मिळतात. अजूनही हा भाग बाजारपेठ गल्ली म्हणून ओळखला जातो. याच काळात अंजनेरी परिसरात लेणी बहरली. परिसरात लहान मोठ्या १०१ लेणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या लेणींमधील शिलालेखांकडेही दुर्लक्ष झाले आहे. या लेणींचा पुरेसा अभ्यासही झालेला नसल्याने इतिहासाचे अनेक पैलू अजूनही दडलेलेच आहेत. अंजनेरी पर्वतावर जाताना तलाव, दोन पुरातन मंदिरे व शुद्ध पाण्याच्या गुफा ‌आढळतात. तर पर्वताच्या टोकावर अंजनीमाता मंदिर आहे.
 
अंजनेरी परिसराला जैन परंपरेत ‘श्वेतप्रद’
अंजनेरी परिसराला जैन परंपरेत ‘श्वेतप्रद’ असे म्हटले जायचे. यादवांच्या काळात हा परिसर श्री संत ज्ञानेश्वर, त्यांचे बंधू आणि गुरू निवृत्तीनाथ महाराज व त्यांच्या पूर्वजांच्या पदस्पर्शाने पुनीत झाला आहे. मोगल-मराठा संघर्षाच्या काळात अंजनेरी किल्ल्याचे उल्लेख येतात. या काळातील किल्लेदारांची नावे अंजनेरीशी संबंधित आहेत. एवढेच नव्हे तर निजामशाहीचे पुनरूज्जीवन होत असताना अल्पवयीन निजामशहाला ज्या किल्ल्यांवर काही काळ सुरक्षित ठेवले होते त्यात अंजनेरी किल्ल्याचा उल्लेख येतो. या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी होत असावा, असा उल्लेखही ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये मिळतो. इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी किल्ल्यावरील थंड हवामान व निसर्ग पाहून गडावर बंगले बांधले. त्यामध्ये अनेक अधिकारी, ख्रिस्ती मिशनरी उन्हाळ्यात मुक्कामास येत असत, असे प्रभाकर शिंदे व छगनराव चव्हाण या ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले.
 
गावाच्या पायथ्याला जुनी प्राचीन मंदिरे
अंजनेरी पर्वताच्या व गावाच्या पायथ्याला जुनी प्राचीन मंदिरे आहेत. ही जवळपास १६ मंदिरे असून, त्यापैकी १२ जैन व ४ हिंदू देवालये आहेत. अंजनेरी एक प्राचीन मुख्य बाजारपेठ व एक प्रमुख राजकीय केंद्र होते, हे या मंदिरावरून स्पष्ट होते. चालुक्य ते यादवापर्यंतच्या काळात अंजनेरी गावात असंख्य मंदिरे उभारली गेली. अंजनेरी राजधानी व व्यापारी पेठ असल्याने येथे येणाऱ्या राजे, महाराजे तसेच व्यापाऱ्यांकडून मंदिरांना मोठ्या प्रमाणात निधी मिळे. त्यामुळे परिसरात मंदिर उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात झाले. या मंदिरांच्या स्थापत्यावर वेगवेगळ्या शैलींचा प्रभाव दिसतो. या रचनेत नागर, भूमिज, फासना अशी प्रमुख वैशिष्ट्ये आढळतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे काही मंदिरांचे सभामंडप व मुखमंडप यांच दोन्ही रुंदी समान आहेत.
 
आठवे जैन तीर्थंकर चंद्रप्रभू यांचीही मूर्ती
 
हे वेगळेपण महाराष्ट्रात इतरत्र दिसत नाही. आठवे जैन तीर्थंकर चंद्रप्रभू यांचीही मूर्ती आहे. तसेच, यातील ८ क्रमांकाचे विष्णू मंदिर व इतर हिंदू देवालये अप्रतिम होती. या देवालयावर नरसिंह, वामन, वराह अवतार तर काही ठिकाणी शिव, ब्रह्मा, गणपती अशा मूर्ती आहेत. अंजनेरीची स्थापत्य वैशिष्ट्ये म्हणजे जैन व हिंदू धर्म येथे एकत्रपणे आनंदात नांदत होते, असे दिसते. मात्र ही मंदिरे सध्या अंतिम घटका मोजत आहेत. पुरातत्त्व खात्याने या मंदिरांभोवती कंपाऊंड उभारून त्यांचे दगड चोरीला जाऊ नयेत, याची काळजी घेतली आहे; मात्र या मंदिरांची पुनर्बांधणी गरजेची आहे. ही सोळा मंदिरे पुन्हा उभी राहिली तर अंजनेरीचे राजधानी म्हणून असलेले महत्त्व पुन्हा उठून दिसेल. नाणे संशोधन केंद्र, परिसरात ब्रह्मा व्हॅली, सपकाळ नॉलेज अशा शैक्षणिक संस्थांमुळे अंजनेरीचे रूप पालटत आहे. अंजनेरी पर्वतामुळे हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. हा परिसर पर्यटन क्षेत्र व गिर्यारोहकांचे आवडते ठिकाणही होऊ पाहत आहे.
 
अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताना वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. गुहा दोन खोल्यांची आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते. गुहेच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहे. समोर असणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर २० मिनिटांत आपण दुसऱ्या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे नाही.
 
किल्ल्यावर जाण्यासाठीची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावरील फाट्यावर उतरावे. या फाट्यापासून १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी गावात पोहोचावे. गावातून नवरा-नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो. मुळेगावचा रस्ता ही पायी चालणार्‍यांसाठी चांगली पायवाट आहे. ह्या वाटेने आल्यास विशेष मजा येते. उतरताना तेथेच येण्यासाठी बुधली या अवघड मार्गाचा वापर केल्यास लवकर खाली पोहचता येते. परंतु धाडसी माणसांनीच या मार्गाचा अवलंब करावा.
Edited by : Ratnadeep Ranshoor