अधिकमास नि गैरसमज
अधिक मास व्रतवैकल्ये, धार्मिकता महिलांसाठी आनंदाची पर्वणी असणारा महिना. हा अधिकमास दर तीन वर्षांनी येतो. या महिन्यात पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे महत्त्व तर आहेच, तसेच गंगास्नान व दानाला देखील महत्त्व आहे. मात्र या काळात जे विधी केले जातात त्यामध्ये काळानुरूप काही बदल केल्यास हा अधिक मास आनंददायी तर राहिलंच शिवाय तो विधायकही ठरेल.
या अधिक मासात हिंदू धर्मात गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. नदीवर गंगास्नान, गंगापूजन, आरती तसेच गंगेची ओटी हे धार्मिक विधी करत असताना मंदिराचे व गंगेचे (नदीचे) पावित्र्य राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही नळदुर्ग येथील काही महिला पुरुषोत्तम पुरी येथे पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी गेलो होतो. गंगास्नानाच्या महत्त्वामुळे आमचे गंगास्नान करायचे ठरले. आम्ही नदीपात्रात चालत जात होतो, सर्वत्र कपडे, ब्लाऊज पीस, पुरणाचे धोंडे, बताशाचे नैवेद्य इतरत्र पसरलेले दिसले. महिला गंगेची पूजा करतात की गंगेचे प्रदूषण मला हेच कळत नव्हते. श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नसावी. काही ठिकाणी ब्लाऊज पीस, ओटीचे सामान, पुरणाचे धोंडे, बताशे, आरती करून ठेवलेले दिवे दिसून आले. हे सर्व पूजेचे साहित्य जळालेल्या अवस्थेत दिसून आले. हे पाहून आम्ही अस्वस्थ झालो. आरती करून दिवे तिथेच ठेवल्यामुळे वार्याने पेट घेतला असावा असे वाटले. अशा गोष्टीमुळे नदीचे प्रदूषण वाढते, याकडे आपले दुर्लक्ष होते. खरे तर धार्मिक विधी या वैयक्तिक बाबी आहेत. मात्र यामुळे प्रदूषण होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. गंगेत कपडे अर्पण करण्यापेक्षा गरजू महिलांना त्याचे वाटप कराला हवे. शिवाय पुरणाचे धोंडे नदीत वाहण्यापेक्षा भुकेलेल्यांना गोडधोड खाऊ घालून ते पुण् कर्म करावे. सर्व महिला भगिनांना सांगावेसे वाटते, आपण आपली संस्कृती जपूनही नवीन पर्यावरण रक्षणाची क्रांती करु शकतो. त्यासाठी एवढंच करा.
गंगास्नान करून आपल्याच मैत्रिणीचा किंवा गरजू स्त्रीचा ओटी भरून सन्मान करणे, तिचे तोंड गोड करणे, आणलेला नैवेद्य तिला व सर्वांना देणे असे केल्याने नदीपात्रात प्रदूषणही होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे पूजेचे साहित्य पायदळी पडणार नाही, देव भावाचा भुकेला असतो. देवा्ने विश्र्वाची निर्मिती केली. निसर्गातील कोणतीही वस्तू अगदी पाने, फुले या विधात्याने निर्माण केलेल्या वस्तू देवाला अर्पण करण्यात काय श्रध्दा आहे. देवाला अर्पण करायचेच असेल तर आपला भाव अर्पण करा. देव आपल्या भावाचा भुकेला आहे. आपण देवासाठी नैवेद्य बनवतो. तो देवाला दाखवल्यानंतर देवासमोर न ठेवता सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करा म्हणजे नैवेद्य पायदळी किंवा इतरत्र पडणार नाही. चला, अधिक मासी नवा संकल्प करू...मंदिराचे पावित्र्य राखेन, कोणत्यांही मूर्तीस किंवा मंदिराच्या खांबांना पेढे चिकटवणार नाही, नैवेद्य इतरत्र ठेवणार नाही, नदीपात्राचे प्रदूषण करणार नाही, गंगेची ओटी समजून एका सवाष्णीची ओटी भरेन. अशा पध्दतीने आपण आपले सणवार साजरे करून आपली संस्कृतीही आणि पर्यावरण रक्षणाची सुरूवात आपल्यापासूनच करू.
कविता पुदाले