मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 13 डिसेंबर 2021 (15:41 IST)

औदुंबर वृक्ष महात्म्य आणि कथा

साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. २१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते.
 
औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती.
 
औदुंबर वृक्ष महात्म्य
औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. 
औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. 
औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रूद्र केला असता अतिरूद्र केल्याचे फळ मिळते. 
औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. 
या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. 
औदुंबराच्या सावलीत जपानुष्टान केल्याने अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. 
औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागिरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. 
औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतं. 
 
कथा
प्रभू विष्णु हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रुपात प्रकट झाले. जाणून घ्या कथा- 
 
हिरण्यकशिपु नावाचा एक दैत्य होता ज्याला देव, दानव व मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही मारु शकत नाही अर्थात त्याचा मृत्यु येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता. पण याने तो फार उन्मत्त झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता. त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णूभक्त होता. सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकशिपुने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही. अखेर कंटाळून हिरण्यकशिपु प्रल्हादाला म्हणाला, की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग ? तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहे. त्यावर हिरण्यकशिपु म्हणे की मग या खांबात आहे का? तर बालक म्हणाला होय... 
 
हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्यकशिपुने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानवशरीरासारखा अशा नृसिंह रूपांत श्री विष्णु बाहेर पडले. त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपुला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला. परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखांत भरले. आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नृसिंहंना आपली नखे खूपसावयाला सांगितले. त्या औषधाचा परिणाम झाला व नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला. याने उग्ररूप नरसिंह शांत झालस. तेव्हा विष्णु देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला- की हे औदुंबर वृक्ष, आपल्यावर सदैव फळे येतील. आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिध्द होतील आणि आपली पूजा, सेवा करणार्‍यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शनमात्रने उग्रता शांत होईल. आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल. याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात.

दैवीय वृक्ष औदुंबर
आता दैवी वृक्षांबद्दल बोलूया. तर कडुनिंब, पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात. या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड. पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे. या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे. या झाडाचे अनेक फायदे आहेत, ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही. या झाडाची फळे, पाने, मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच, पण ग्रहांमुळे होणारे अनेक दोष दूर होतात.