गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2023 (13:05 IST)

Champa Shashti 2023 चंपा षष्ठी 2023 कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत

champa shashti 2023
Champa Shashti 2023 मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी हे व्रत केले जाते. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते. यंदा 13 डिसेंबर बुधवारी मार्तंडभैरव षड्रात्रोत्वारंभ होत असून 18 डिसेंबर सोमवारी चंपाषष्ठी आहे. या दिवशी मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले होते असे मानले जाते. म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षड्ररात्रोत्सव हा उत्सव करतात. चंपाषष्ठीचे महत्त्व तसेच कशा प्रकारे हा दिवस साजरा केला जातो याबद्दल माहिती जाणून घ्या-
 
मल्हारी मार्तंडचा खंडोबा उत्सव 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसापासून हा उत्सव सुरू होईल. 6 दिवसांचा उत्सव नवरात्रीप्रमाणे साजरा केला जातो. व्रत पाळण्याबरोबरच लोक उपासनेशी संबंधित नियमांचे पालन करतात.
 
चंपा षष्ठी पूजा वेळ-
षष्ठी तिथी सुरु- 17 डिसेंबर रोजी 17:33 मिनिटापासून
षष्ठी तिथी समाप्त- 18 डिसेंबर रोजी 15.15 मिनिटापर्यंत
 
या नवरात्रीत आराध्य देव खंडोबाची विशेष पूजा-आराधना केली जाते. त्यांच्या मूर्तीवर हळद उधळली जाते आणि हवन-पूजनासह भंडारा आयोजित केला जातो. यादिवशी विशेष करुन वांग्याचे पदार्थ तयार केले जातात.
 
राज्यातील जेजुरी या मंदिरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. कारण मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे येथील बहुतांश भाविकांचे कुलदैवत आहे. तसेच घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो. कुळाचाराप्रमाणे या नवरात्रीत पूजेत सुघट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात. या उत्सवादरम्यान अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो.
 
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालून तयार केलं जाणारं पदार्थ, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. 
 
देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण "सदानंदाचा येळकोट" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. ब्राह्मण-सुवासिनीला जेवायला बोलवतात.