रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

mahalaxmi guruvar katha
श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान घरात नांदावे; म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ध्यानी घ्यावी, अशी ही कहाणी आहे. द्वापार-युगातली. आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली.
 
तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता प्रजादक्ष होता. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकून आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा-राणीने कन्येचे नाव शामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल; प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत-टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, "कोण गं बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय ? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली, "माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेय. कुठे आहे ती? दासी म्हणाली, "राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले, तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब." म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली. "तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्‍नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी-तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार्‍या श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती, समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्‍नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे." म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, " मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही."
 
म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार, तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, "कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ? जा इथून." तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार, तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली, "आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते." राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता.
 
पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले.
 
लवकरच शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा-समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव, ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती; ती स्थिती आता बदलली. अन्न-पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे; पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता.
 
एक दिवस भद्रश्रवाला वाटले, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि चार-आठ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून-चालून तो खूप दमला होता; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शामबालालाही ते समजले. शामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली.
 
भद्रश्रवा परत जायला निघाला, तेव्हा शामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे, हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय? हंड्यात धन नव्हतेच. होते फक्त कोळसे ! महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्र्श्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता.
 
दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करवून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. पण 'बाप' भेटायला गेला असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता; पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही,' हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली.
 
स्वगृही आल्यावर मालाधराने शामबालेला विचारले, " माहेराहून काय आणलंस?" शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले, तर हंड्यात मिठाचे खडे ! मालाधराने चकित होत पत्‍नीला विचारले, "हे काय? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, "थोडं थांबा, म्हणजे कळेलच." त्या दिवशी शामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न-पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. "हा मिठाचा उपयोग!' शामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले
थोडक्यात, जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील.
 
महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥
 
ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।