शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : रविवार, 16 जुलै 2023 (11:05 IST)

Sant sawata mali Information in Marathi : संत सावता माळी यांची संपूर्ण माहिती

social media
महाराष्ट्रातील प्रमुख संत : संत सावता माळी 
संत सावतामाळी हे मराठी संतकवी होते .त्यांचे गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण हे होते. त्यांचे आजोबा दैवू माळी हे  पंढरीचे वारी होते. पुरसोबा आणि डोंगरोबा हे दोन मुले त्यांना होती. सावता माळी यांचे वडील पुरसोबा हे धार्मिक होते ते नेहमी भजन पूजन करायचे. त्यांच्या आईचे नाव सदू माळी होते. संत सावतामाळी यांचा जन्म पंढरपूर जवळ अरणभेंडी गावात झाला. 
 
सावता माळी यांचे लग्न भेंड गावातील भानवसे रूपमती घराण्यातील जनाई यांच्याशी झाले. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. ते गृहस्थाश्रमी असून विरक्त होते. ते नेहमी पंढरपूरच्या विठ्ठलाचे अभंग गायचे. त्यांचे विठ्ठल भक्तीचे काही अभंग उपलब्ध आहे. सावता महाराज हे लहान पणापासून विठ्ठल भक्त होते. त्यांचा फुले, फळे भाज्या काढण्याचा व्यवसाय होता.   
 
हे कर्म आणि आपले कर्तव्य करत असे. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे आराध्य दैवत विठ्ठल होते. ते कधीच पंढरपूरला गेले नाही. पांडुरंग त्यांना प्रत्यक्ष भेटायला आले. सावता हे शेतात कष्ट करायचे आणि ईश्वराची भक्ती देखील करत असे. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला होता.ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग्य तीर्थव्रत, कौशल्य या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन करणे किंवा नामस्मरण करणे यातच देव प्रसन्न होतो असे त्यांचे मत होते.
 
यांच्या विषयी एक आख्यायिका आहे की, संत सावतामाळी हे आपल्या शेतामध्ये खुरप्याने शेतातील काम करत होते. एकदा संत ज्ञानेश्वर, नामदेव आणि पांडुरंग असे तिघे कूर्मदास नावाच्या एका संताच्या भेटीला चालले होते. वाटेत सावतामाळी यांचे गाव अरणभेंडी लागली. तेव्हा पांडुरंगाने तुम्ही येथे थांबा, मी स्वतः भेटून येतो असे सांगितले. पांडुरंगाला सावतामाळींची चेष्ठा करण्याचा विचार करत ते बालरूप घेत सावता माळी कडे जाऊन म्हणाले, माझ्या मागे दोन चोर लागले आहे मला कुठे तरी लपव.
संत सावता यांनी बालरूपी पांडुरंगाला आपली छाती खुरप्याने फाडून हृदयामध्ये लपवून घेतले वरून कांबळे बांधून घेतली. ज्ञानेश्वर आणि नामदेव हे पांडुरंगाची वाट पाहून दमले आणि शेवटी पांडुरंगाचा शोध घेत संत सावतामाळी यांच्या पर्यंत पोहोचले. ते दोघे ज्ञानी असल्यामुळे पांडुरंग सावताच्या हृदयात आहे समजले. ते दोघे सावता यांना आपल्या सोबत घेऊन कुर्मदास यांना भेटायला गेले.   
 
संत सावता माळी यांनी ईश्वराचा नामजप करण्यावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. त्यांना 45 वर्षांचे आयुष्य लाभले.आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 यांनी आपला देह ठेवला. पंढरपूर जवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे.आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे जाते.
आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. 
 
अभंग -
 
‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’
‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’
’’लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’
 
प्रपंच असुनी परमार्थ साधावा | वाचे आठवावा पांडुरंग |
उंच नीच काही न पाहे सर्वथा | पुराणीच्या कथा पुराणीच ||
घटका आणि परत साधी उतावीळ | वाउगा तो काळ जाऊ नेदी ||
सावता म्हणे कांती जपे नामावळी | हृदय कमळी पांडुरंग ||
 
स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.
 
‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।
 
 



Edited by - Priya Dixit