शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (15:26 IST)

सुतक

सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय होते त्याला घालायची पूजा. ते काय भावकीतले होते का जवळचे पाहुणे होते...? घालून टाकायची, कोणी म्हणाले शेजारी होते. लांबून पाहुणे लागतात. मग सुतक पाळायला हवेच.
 
तात्या विचारात पडले, मुलगा-सून पुण्यावरून आले, जावई हैदराबादवरून आले. सगळी तायारी झाली. भाज्या चिरून फोडणी टाकायची बाकी होती, पण आता ते शक्य नाही. शेवटी एक जीव गेला होता. त्याची जी काही जागा होती ती रिकामी झाली होती. अशावेळी दुःख तर होतेच, पण काही सूचत नाही. अस्वस्थ होते. काही करावेसे वाटत नाही. उदास बसल्यासारखे दिसल्यावर म्हणतातच ना की, सुतकात असल्यासारखा बसलास. का पाळतात सुतक... माणूस मेल्यावरच पाळतात. दुःख झाले म्हणून सुतक पाळतात की, आणखी का कारण असावे. माझ्‍या ऐकणत आले की, माणूस मेला की, त्याच्या आजारपणामुळे जंतुसंसर्ग होतो तो साफसफाई करून नाहीसा करतात. आणि सुतकातून बाहेर पडतात. आता असं काही करत नाहीत. माती देऊन आल्यावर पूर्वी आंघोळ केल्याशिवाय घरात घेत नसत. आता तेही पाळत नाहीत. धार्मिक काही करायचे नाही, एवढ्यापुरते सुतक मर्यादित असते. त्या घरात सोडले तर इतरत्र हवे ते खाल्ले जाते. माझी आई एक आठवण सांगायची, कुठला तरी सण होता. पायलीभर पुरण घातले होते. निम्मा अर्ध्या पोळ्या झाल्या होत्या. सांगावा आला कोण तरी वारले, आजोबांनी तेवढ्या पोळ्या कुणाला तरी देऊन टाकल्या. पण घरात खाल्ल्या नाहीत. सुतकात गोडधोड खायचे नाही. सण करायचा नाही हा नियम कडक पाळत लोक. माझी चुलती वारली होती. घरे लांब लांब होती तरी आईने शिरा करू दिला नाही. आता असे घरातही पाळत नाहीत. लहान मुले असली तर करतातच. आता फोनची सोय असल्यामुळे तिसर्‍याला तरी कितीही लांबचा पाहुणा येतोच. काही गावात तो पुन्हा कार्याला येत नाही म्हणून तिसर्‍यालाच गोडाचे जेवण केले जाते. सोयीने शास्त्र पाळले जाते. वारलेल्या जिवाला ना कशाचे सोयरे ना सुतक.
 
अलीकडे तर मोठी भावकी आखूड सुतक पाळताना लांबच्या भावकीला तीन दिवस सुतक पाळले तरी चालते. लग्ने असतात. हे एक कारण. पूर्वी नियम म्हणजे नियम असत. मझ्या एका चुलत नणंदेच्या तीनवेळा पत्रिका छापाव्या लागल्या. त्यामुळेच भावकी तोडून घेतली आहे. तरी त्यांच्यासाठी कार्य पाचव्या दिवशीच करावे लागते. यात गावातल्या ब्राह्मणाचे महत्त्व फार असते. तो सांगेल तेच सगळ्यांनी ऐकायचे. माझ्या  सासूबाई वारल्या तेव्हा लांबच्या भावकीत लग्न होते. त्यांचे लग्न सुखरूप पार पाडावे म्हणून आम्हाला पाचव्या दिवशी कार्य  करायला लावले. कुंकू लावले. त्यांना मोकळे केले. आणि पुन्हा तेराव्या दिवसापर्यंत आम्ही सुतक पाळले. अगदी घरातल्यांना चपाती खायला बंदी. पाचवीला कार्यात सगळे पोळी शिरा खाल्लेला लहान मुलांना केल्यावर उरलेल्या चपात्या टाकून द्यायच्या पण खायच्या नाहीत. असे हे सुतकाचे नियम आणि कायदेकानून!
 
माणूस मल्यावर सुतक म्हणजे दुःख पाळावे. काही दिवस. मग त्यातून बाहेर पडणे बरे पडते. अपराधी पणा राहात नाही. आपण जगतोय ते गेले तरी... या भावनेतून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी  मिळून सुतक पाळावे. तसेच महत्त्वाचे काम असले तर करतातच. पण जवळच्या व्यक्ती गेल्यावर सुतक पाळावे. कुणाला हे पटणारही नाही. मझ्या आईने वडील वारल्यानंतर त्यांना आवडणार्‍या काही गोष्टी म्हणजे, आंबा, पेढा, वरण, असे काही पदार्थ कायमचे सोडून दिले. असे दुःख पाळणे मला पटतच नाही. वीस-पंचवीस वर्ष झाली ती आम्रखंडही खात नाही. 
 
सुतकाच्या दिवसात आपणशांतपणे आपल्या आत डोकावून बघू शकतो. मनाची एवढी धाव वाढली की, माणसाला स्वतःशी संवाद करालाही वेळ नाही आज. या निमित्ताने बोलावे स्वतःशी शांत होऊन बघावे. शून्यातून राहून जगावे. गेलेली व्यक्ती समाजाचा भाग असतो. समाजाला कुठे ना कुठे, कधी ना कधी उपयोगी पडलेली असते. परिसराचा तो चालता बोलता घटक असतो. सत्तर- ऐंशी किंवा जे काही वर्ष ती उणेअधिक जगलेली असते. त्याचा आठवणी ज्याच्या त्याच्या मनात कमी अधिक, चांगल्यावाईट रेंगाळत असतात, आणि तो माणूस जातो. अव्याहत चालणारा श्वास थांबतो आणि सगळे संपते. हा धक्का असतो जवळच्या नातेवाईकांना, परिसराला. खूप वय झाले, भान गेले, सगळे विधी जागेवर असतात अशावेळी त्या व्यक्तीचे जगणे कुणालाच नको असते. तरी ती या जगातून जाणे, कधीही परत न येणे दुःखाचे असते. चांगले धडधाकट असताना ती व्यक्ती त्याच्या मगदुराप्रमाणे जगलेली असते. अस्वस्थ वाटते. मग अशा दुखवट्यामुळे मनाला अवसर मिळतो. निसर्ग चक्राचा अव्याहत कारभार का आणि कसा चालतो, याबद्दल मनात अनेक तरंग उठतात. त्या तरंगांना संवेदनांना अलिप्तपणाने न्याहाळाचे. बदलाचे अपरिर्हापण अंगी मुरवावे. एरवी अशा विचारांना काही स्थानच नसते,धकाधकीच्या आयुष्यात. शांतपणे विचार करायला   आता वेळ तेवढा नसतो कुणाकडे.
 
माझ्या सासूबाईंचा मृत्यू होताना मी पहिल्यांदा बघितले. हे होणार होते. तरी दुःख होतेच. त्याला व्यक्त करण्याचे आपल्या आपल्या संस्कृती, परंपरेत बरेच मार्ग आहेत. ते केल्यावर बरेच ओझे उतरते असे मला वाटते. आपल्या माणसासाठी शेवटी काही केल्याने बरे वाटते. ऐंशी-नव्वद वर्षाचे जगणे एक श्वास थांबला की संपून जाते... एका क्षणात... हा धक्का प्रचंड असतो. या धक्क्यातून सावरण्यासाठी, दुःखाचा निचरा होण्यासाठी सुतक पाळावे. गेलेल्या जिवाला त्याचं काय ...? सगळे जगणे असे कसे नाहीसे होते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा या दिवसात. निसर्गापुढे नम्र व्हावे. सुतक पाळण्याचा उद्देश असा एवढा असावा.

सावित्री जगदाळे