Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:08 IST)
युद्धाचा फटका बहुराष्ट्रीय कंपन्यांना बसणार
भारत व पाकिस्तानदरम्यान युद्ध झाल्यास त्याचा मोठा फटका वेगाने महासत्ता बनण्याकडे वाटचाल करण्याला भारताला बसेल असा अंदाज अमेरिकी तज्ज्ञांनी वर्तवला आहे. भारतातील येणारे विदेशी पर्यटक व येथे काम करत असलेल्या बहुराष्ट्रीय कर्मचार्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे या तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
अमेरिकास्थित भूराजकीय सुरक्षितता व गुप्तचर सेवा स्ट्रॅटफोरच्या मते उभय देशांत झालेल्या युद्धाचा मोठा फटका भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना बसेल. या कंपन्यांना आत्ताच अतिरेकी हल्ल्याचा धोका आहे. युद्धानंतर तो अधिकच वाढेल, असे या संस्थेचा निष्कर्ष आहे.
मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कर्मचारी धास्तावले आहेत. यापुढील काळात या कंपन्यांना लक्ष्य करून हल्ले केले जातील, अशी भीती असल्याचा अंदाज या संस्थेने वर्तवला आहे. गर्दीच्या बाजारपेठेत जाऊन तिथे हल्ला करण्यापेक्षा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन हल्ले केल्याने बरेच विदेशी नागरिक मारता येतील, हे हेरून अशा ठिकाणी हल्ले करण्याचा पर्याय अतिरेक्यांनी निवडला असल्याचा संस्थेचा कयास आहे.
पंचतारांकित हॉटेल्स व नेहमीच्या हल्ल्याच्या ठिकाणी आता सुरक्षा व्यवस्था वाढविल्याने तेथे हल्ले करणे आता कठीण झाले आहे. त्याऐवजी अशी नवी ठिकाणे हल्ल्यासाठी तुलनेने सोपी असल्याकडेही संस्थेने लक्ष वेधले आहे. त्यामुळे मोठ्या अपार्टमेंट, रहिवासी संकुले, पाश्चिमात्य नागरिक रहात असलेली घरे किंवा पाश्चात्या धर्तीवरची बाजारपेठ, हॉटेल्स आता अतिरेक्यांचे नवे लक्ष्य असल्याचा अंदाज आहे.