मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (12:11 IST)

समुद्राच्या तळाशी सापडलं 107 वर्षांपूर्वी बुडालेलं जहाज!

शास्त्रज्ञांना आत्तापर्यंतचा सर्वात जुन्या अशा 107 वर्षापूर्वीच्या जहाजाचे भग्नावशेष अंटार्क्टिकाच्या समुद्राच्या तळाशी सापडले आहेत. या जहाजाचं नाव आहे एन्ड्युरन्स!
 
हे जहाज प्रसिद्ध ध्रुवीय संशोधक सर अर्नेस्ट शॅकलटन यांचं हरवलेलं जहाज म्हणून प्रसिद्ध आहे. मागच्या आठवड्यात हे जहाज अंटार्क्टिकाच्या समुद्राच्या तळाशी सापडलं.
 
1915 मध्ये हे जहाज समुद्रातील बर्फाला धडकून समुद्रात बुडालं होतं. त्यावेळी शॅकलटन आणि त्यांच्या जहाजावरील सोबत्यांनी लहान बोटींचा आधार घेत किनाऱ्यापर्यंतचा प्रवास केला होता.
 
आज जहाजाचे जे अवशेष सापडले आहेत त्यावरून तरी जहाज सुस्थितीत असल्याचं दिसून येत.
 
हे जहाज समुद्रात एका शतकाहून जास्त वेळ राहिलं आहे. जहाज 3 हजार मीटर म्हणजेच 10,000 फूट खोल समुद्रात बुडालं आहे. पण आज ही ते हल्ली हल्लीच बुडालं असावं अशा अवस्थेत आहे.
जहाजच्या बांधकामातील लाकूड थोडं झिजलं असलं तरी अजूनही जहाजाच्या सांध्यांना त्या लाकडाने एकत्र बांधून ठेवलं आहे. जहाजाची सहनशीलता त्याच्या नावाप्रमाणेच 'एन्ड्युरन्स' आहे.
 
जहाजाच्या बांधणीविषयी सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ मॅनसन बाऊंड बीबीसीशी बोलताना सांगतात, " अतिशयोक्ती टाळली तर मी आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वोत्तम लाकडी जहाज आहे. हे जहाज समुद्रतळाचा अभिमान आहे. आज ही ते अखंड आणि संवर्धन केल्यासारखे उत्कृष्ट स्थितीत आहे."
 
बाउंड हे शोध मोहिमेवर आहेत आणि त्यांनी आपल्या जवळपास 50 वर्षांच्या कारकिर्दीत स्वतःच्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्या आहेत.
 
हरवलेले जहाज शोधण्याचे मिशन फॉकलँड्स मेरीटाईम हेरिटेज ट्रस्ट (FMHT) यांच्याद्वारे सुरू होते. त्यांनी जहाज शोधण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील आइसब्रेकर, अगुल्हास II आणि दूरस्थपणे चालवल्या जाणार्‍या सबमर्सिबल वापरल्या.
या मिशनचे प्रमुख ध्रुवीय भूशास्त्रज्ञ डॉ. जॉन शीअर्स यांनी जेव्हा जहाजाच्या दिशेने कॅमेरे नेण्यात आले तेव्हाच्या क्षणाचे वर्णन "अविस्मरणीय" असं केलं.
 
ते या जहाजविषयी सांगतात, "उद्ध्वस्ताचा शोध ही एक अविश्वसनीय कामगिरी आहे.
 
आम्ही जगातील सर्वात जुन्या जहाजाचा शोध यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. समुद्रातील बर्फ, हिमवादळे आणि -18C पर्यंत खाली जाणाऱ्या तापमानात झुंज देत आम्ही हा शोध साध्य केला आहे. बऱ्याच लोकांनी या शोधमोहीमेला केवळ अशक्य अशी गोष्ट म्हंटल होतं. पण जे अशक्य होतं ते आम्ही साध्य केलं आहे."
 
हे जहाज कुठे सापडले?
एन्ड्युरन्स हे जहाज वेडेल समुद्रात 3,008 मीटर खोलीवर आढळलं.
 
एक पूर्वनिर्धारित असे शोध क्षेत्र निवडण्यात आले. त्याच भागात दोन आठवड्यांहून जास्त वेळ शोध घेण्यात आला. त्या शोध मोहिमेत मनोरंजक अशा गोष्टींची तपासणी करण्यात आली. सरतेशेवटी शनिवारी शॅकलेटनच्या 100 व्या वर्धापन दिनापूर्वी हे जहाज सापडलं. लाकूड आणि आजूबाजूच्या ढिगाऱ्यांचे तपशीलवार फोटोग्राफिक रेकॉर्ड बनवण्यात आले.
 
आंतरराष्ट्रीय अंटार्क्टिक करारानुसार हे बुडालेलं जहाज स्वतःच एक स्मारक आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहचविता येणार नाही. त्यामुळे जहाजातील कोणत्याही वस्तू जमिनीवर आणल्या गेल्या नाहीत.
 
जहाज शोधायला गेलेल्या लोकांनी तिथे काय पाहिलं?
1915 मध्ये शॅकलेटॉनचे चित्रपट निर्माते फ्रँक हर्ले यांनी जेव्हा शेवटच्या वेळी जहाजाचा फोटो घेतला होता अगदी त्याच अवस्थेत ते आजही आहे. जहाजाच्या शिडाचा भाग खाली आला आहे. मात्र जहाजाचा तळ मोठ्या प्रमाणात सुसंगत आहे. जहाजाच्या टोकाचं थोडं नुकसान झालं आहे. हे शक्यतो समुद्रतळावर आदळल्यामुळे झालं असावं. जहाजावर काही बुट्स आणि भांडी सुद्धा सापडली आहेत.
 
मॅनसन बाऊंड सांगतात त्याप्रमाणे, "पुढच्या डोल खांबाजवळ एक हॅन्ड रेलिंग आहे. त्याखाली E N D U R A N C E असं जहाजाचे नाव देखील लिहिलेलं दिसतं आहे. हे नाव पितळेसारखे ठळक आहे. त्या नावाखाली पाच-बिंदूचा स्टार दिसतो आहे.
तुम्ही जहाजावर एक गोलाकार खिडकी पाहू शकता. ती शॅकलटनची केबिन आहे. ती केबिन बघितल्या क्षणी, तुम्हाला त्या महान व्यक्तीचा सहवासाचा भास झाल्याचं जाणवेल."
 
जहाजावरचं जीवनमान काय दर्शवतं?
विशेष म्हणजे, जहाजाचे अवशेष जीवनाच्या विपुलतेचं दर्शन घडवतात मात्र ते वापरात येतील अशा प्रकारचे नाहीत.
 
एसेक्स विद्यापीठाचे ध्रुवीय जीवशास्त्रज्ञ डॉ मिशेल टेलर यांच्या मते, "जसे इतर महासागरात लाकूड खाणारे प्राणी आढळतात तसे अंटार्क्टिक प्रदेशात नसावेत. त्यामुळे असा अंदाज लावता येईल जहाजाचा लाकडी भाग अजूनही सुस्थितीत आहे.
 
द एन्ड्युरन्स पाहिल्यावर तुम्हाला ते थोडं भीतीदायक वाटेल. कारण त्यावर खोल समुद्रातील सागरी जीवसृष्टीने आपलं घर केलं आहे.
 
यात समुद्री स्क्वर्ट्स, अॅनिमोन्स, विविध प्रकारचे स्पंज, ब्रिटलस्टार्स आणि क्रिनोइड्स असे विविध जीव आढळतील."
 
हे जहाज इतकं महत्वाचं का होतं ?
याची दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे, ब्रिटिश संशोधक आयरिश शॅकलटन बराच काळ दक्षिण ध्रुवाचा शोध घेत होते. त्यांनी या भागात एकूण चार शोधमोहीम राबवल्या होत्या. एन्ड्युरन्स जहाज 1914 मध्ये ब्रिटनमधून निघाले आणि एका वर्षानंतर अंटार्क्टिकामधील मॅकमर्डो साउंडला पोहोचले. या शोध मोहीमेला इंपीरियल ट्रान्स-अंटार्क्टिक मोहीम असे नाव देण्यात आले. अत्यंत वाईट परिस्थितीमुळे हे जहाज वेडेल समुद्रात घनदाट आणि कडक बर्फात अडकल्याचे आढळून आले. तेव्हा त्यांना शोध सोडून द्यावा लागला.
 
एन्ड्युरन्सला सोडून उत्तरेकडे तरंगणाऱ्या बर्फाच्या पृष्ठभागावर तळ ठोकला. आणि या सर्वांची येथून सुटका करण्यात आली. मोहीम अयशस्वी झाली.
आता दुसरे म्हणजे हे जहाज शोधण्याचे आव्हान होते. वेडेल समुद्र बर्‍यापैकी कायमस्वरूपी जाड समुद्री बर्फाने आच्छादलेला असतो. त्याच समुद्री बर्फाने जहाजाची मध्यरेषा फोडली. आता जहाज जिथे बुडालं त्या गृहित ठिकाणाजवळ पोहोचण कठीण होतं. त्यात आणि 1970 च्या दशकापासून तर इथला बर्फ कमीच नव्हता.
 
पण गेल्या महिन्यात अंटार्क्टिक समुद्राच्या बर्फाची जाडी आतापर्यंतची सर्वात कमी जाडी असल्याची नोंद झाली. परिस्थिती अनपेक्षितपणे अनुकूल होती.
 
मग या भग्नावशेषाचे सर्वेक्षण पूर्ण करून मंगळवारी काही लोक शोधस्थळी रवाना झाले. आइसब्रेकर त्याच्या होम पोर्ट केपटाऊनकडे रवाना झाले. मात्र हेतू हा होता की, शॅकलटन जिथे दफन केलं आहे त्या दक्षिण जॉर्जियाच्या ब्रिटीश ओव्हरसीज टेरिटरीशी संपर्क साधता यावा.
 
यावेळी डॉ शिअर्स म्हणाले, "आम्ही नेहमीच आमच्या 'बॉसला' आदर देऊ" एन्ड्युरन्स क्रू त्यांच्या नेत्यासाठी 'बॉस' हे टोपणनाव वापरतं असतं.