रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (13:09 IST)

'त्या कृष्णवर्णीय आहेत की भारतीय?' कमला हॅरिस यांच्या वांशिकतेवर ट्रम्प यांंचं प्रश्नचिन्ह

कृष्णवर्णीय पत्रकारांच्या अधिवेशनात बोलताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या वांशिक ओळखीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
31 जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅरिस यांच्या कृष्णवर्णीय आणि भारतीय वंशांच्या असण्याबाबत प्रश्न विचारत टीका केली आहे.
 
डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार असलेल्या कमला हॅरिस यांच्यावर चुकीचा आरोप करत ट्रम्प म्हणाले की, आजवर हॅरिस यांनी फक्त त्यांच्या 'आशियाई अमेरिकन' वंशाच्या असण्यावरच जोर दिला आहे.
 
ट्रम्प यांनी दावा केला की, "आता त्या अचानक कृष्णवर्णीय बनल्या आहेत."
 
अमेरिकेच्या शिकागोमध्ये बुधवारी (31जुलै) आयोजित करण्यात आलेल्या 'ब्लॅक जर्नालिस्ट कन्व्हेन्शन'मध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, "काही वर्षांपूर्वीपर्यंत मला हे माहित नव्हतं की कमला हॅरिस कृष्णवर्णीय आहेत, आता मात्र त्या कृष्णवर्णीय असल्याचं सांगत आहेत."
 
"त्यामुळे मला माहीत नाही की त्या भारतीय आहेत की कृष्णवर्णीय आहेत?"
 
ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना कमला हॅरिस म्हणाल्या की, ट्रम्प यांची अपमान करण्याची आणि विभाजन करण्याची ही जुनी सवय आहे.
 
सिग्मा गामा रो या कृष्णवर्णीय महिलांच्या संमेलनात बोलताना कमला हॅरिस म्हणाल्या की, "अमेरिकन नागरिक याहून चांगल्या नेत्यासाठी पात्र आहेत. आपल्याला एक असा नेता हवा आहे जो आपल्यातला फरक समजून घेईल आणि त्यावरून फूट पाडणार नाही. आपल्यातील भेद हेच आपल्या सामर्थ्याचे स्रोत आहेत."
 
कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. सोबतच उपाध्यक्षपदी असणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई वंशाच्या व्यक्ती आहेत.
 
ऐतिहासिकदृष्ट्या कृष्णवर्णीयांचं विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं असून प्रामुख्याने कृष्णवर्णीय महिलांचा समावेश असणाऱ्या अल्फा कप्पा अल्फा या संघटनेत त्या सामील झाल्या होत्या.
 
2017 मध्ये सिनेटमध्ये सामील झाल्यानंतर, त्या काँग्रेसच्या ब्लॅक कॉकसच्या सदस्य बनल्या होत्या.
 
शिकागोमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एबीसी न्यूजच्या प्रतिनिधी रॅचेल स्कॉट यांच्याशी ट्रम्प यांचा जोरदार वाद झाला.
 
हॅरिस यांच्या वांशिक ओळखीबाबत बोलताना रिपब्लिकन पक्षाचे नेते ट्रम्प म्हणाले की, "मी दोन्हीपैकी एका ओळखीचा सन्मान करतो. आत्तापर्यंत त्या भारतीय होत्या आणि आता अचानक त्यांनी स्वतःला कृष्णवर्णीय घोषित केलं आहे."
 
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पिएर म्हणाल्या की, "कुणालाही कोणाच्या ओळखीवर भाष्य करण्याचा किंवा त्यांची ओळख काय आहे हे सांगण्याचा अधिकार नाही. कुणालाच तो अधिकार नाही."
 
न्यूयॉर्कचे प्रतिनिधी रिची टॉरेस यांनी विचारलं की, "एखादी व्यक्ती कृष्णवर्णीय आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार ट्रम्प यांना कुणी दिला?"
 
त्यांनी ट्रम्प हे 'वंशवादी भूतकाळाचे अवशेष' असल्याचं म्हटलं आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी देखील त्यांच्या विरोधकांवर वांशिक आधारावर टीका केल्या आहेत. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरही टीका करताना ट्रम्प असे म्हणाले होते की ओबामा यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही.
 
ट्रम्प यांनी त्यांच्याच पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांच्यावर खोटा आरोप करताना असं म्हटलं होतं की निक्की हेली राष्ट्रपती होऊ शकल्या नाहीत कारण त्यांचा जन्म झाला तेंव्हा त्यांचे पालक अमेरिकन नागरिक नव्हते.
 
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ठरवण्याच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये निक्की हेली या ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी होत्या.
 
कमला हॅरिस यांच्यावर झालेले वैयक्तिक हल्ले
डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्यानंतर कमला हॅरिस यांच्यावर अनेक हल्ले झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाने कमला हॅरिस यांना केवळ त्यांच्या वांशिक ओळखीमुळे उमेदवारी मिळाल्याची टीका केली आहे.
 
टेनेसीचे रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेस सदस्य टिम बर्शेट यांनी कमला हॅरिस या 'DEI-उपाध्यक्ष' असल्याची टीका केली. DEI हा अमेरिकेचा विविधता, समानता आणि समावेश वाढवण्यासाठीचा उपक्रम आहे. याच उपक्रमाचा लाभ घेऊन कमला उमेदवार झाल्या असल्याचं टीम बर्चेट म्हणाले.
 
बुधवारच्या अधिवेशनात रॅचेल स्कॉट यांनी ट्रम्प यांना विचारलं की, 'ते टिम बर्शेट यांच्या विधानाशी सहमत आहेत का?' या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, "मला खरंच माहिती नाही, असूही शकतं."
 
हॅरिस यांनी याआधी बऱ्याचवेळा भारतीय असण्याबाबत भाष्य केलेलं आहे आणि त्या भारतात येऊन देखील गेल्या आहेत. त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या आईने दोन्ही मुलींना कशा पद्धतीने कॅलिफोर्नियाच्या ऑकलंडमध्ये कृष्णवर्णीय संस्कृतीत वाढवलं.
 
या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही शंका उपस्थित केल्या. ट्रम्प म्हणाले की कमला हॅरिस त्यांच्या करियरच्या सुरुवातीलाच वकिलीच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. ट्रम्प यांनी ही टिप्पणी केल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचं दिसून आलं.
 
ट्रम्प म्हणाले की, "मी फक्त तुम्हाला तथ्य सांगतो आहे. त्या परीक्षेत कमला हॅरिस उत्तीर्ण झाल्या नव्हत्या आणि त्यांना असं वाटत नव्हतं की त्या ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतील. मला माहित नाही नंतर काय झालं. कदाचित त्या उत्तीर्ण झाल्या असतील."
 
हॅरिस यांनी 1989 मध्ये 'कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ हेस्टिंग्ज कॉलेज ऑफ लॉ'मधून पदवी प्राप्त केली. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्या पहिल्या प्रयत्नात नापास झाल्या होत्या आणि दुसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी ठरल्या होत्या.
 
कॅलिफोर्नियाच्या स्टेट बारचं असं म्हणणं आहे की केवळ अर्धे लोक ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊ शकतात.
 
प्रश्नांवरून ट्रम्प भडकले
शिकागोमधील चर्चेच्या सुरुवातीलाच ट्रम्प आणि मुलाखतकार यांच्यात वाद झाला. ट्रम्प यांनी पत्रकार रॅचेल स्कॉट यांच्यावर आरोप केला की, मुलाखतीच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी कृष्णवर्णीय लोकांवर केलेल्या टीकांबाबत प्रश्न विचारून त्यांनी अतिशय चुकीची सुरुवात केली.
 
कृष्णवर्णीय पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ट्रम्प 'वर्णद्वेषी आणि मूर्ख' म्हणाले होते याचा उल्लेख रॅचेल स्कॉट यांनी केला. तसेच ट्रम्प यांनी एका गोऱ्या वर्चस्ववादी व्यकीतीसोबत डिनर केल्याबाबतही स्कॉट यांनी प्रश्न विचारला.
 
याला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, "मला देशातील कृष्णवर्णीय लोक आवडतात आणि मी त्यांच्यासाठी खूप काही केलं आहे."
 
या मुलाखतीच्या काही तासानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून या मुलाखतीवर टीका केली. ते म्हणाले की, "या मुलाखतीत विचारलेले प्रश्न अतिशय रुक्ष आणि खराब होते. प्रश्नांपेक्षा जास्त ती विधानं होती आणि आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला."
 
कोण आहेत कमला हॅरिस?
कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनीही त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
 
कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ओकलँडमध्ये 1964 मध्ये झाला होता. त्यांचे वडील मूळचे जमैकाचे तर आई मूळच्या भारतीय वंशाच्या होत्या.
 
आई वडिलांच्या घटस्फोटानंतर कमला यांच्या हिंदू आईनं एकटीनं त्यांना वाढवलं. त्यांच्या आई श्यामला गोपालन या कॅन्सर रिसर्चर आणि मानवी हक्क कार्यकर्त्या होत्या.
 
श्यामला यांनी त्यांच्या दोन्ही मुली कमला आणि माया यांना भारतीय संस्कृतीचा वारसा जपत लहानाचं मोठं केलं. आईबरोबर कमला अनेकदा भारतातही येत होत्या.
 
पण, तसं असलं तरी त्यांनी अमेरिका आणि आफ्रिकेची संस्कृतीही स्वीकारली होती. मुलींनाही त्यांनी तशी संमिश्र शिकवण दिली. त्यामुळं लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचा दृष्टीकोन त्यांना मिळत गेला.
 
कमला यांनी त्यांच्या 'द ट्रुथ वी होल्ड' नावाच्या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख केल आहे.
 
"माझ्या आईला चांगल्या प्रकारे जाणीव होती की, ती दोन कृष्णवर्णीय मुलींना वाढवत आहेत.आपण ज्या भूमीचा स्वीकार केला आहे, ती आपल्या मुलींकडे कृष्णवर्णीय मुली म्हणूनच बघेल हेही त्यांना माहिती होती. त्यामुळं आम्ही आत्मविश्वासपूर्ण कृष्णवर्णीय महिला बनावं याची काळजी त्यांनी घेतली."
 
जमैका, भारत आणि अमेरिका. अशा त्रिशंकू परिस्थितीत त्यांच्या ओळखीबाबत विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या आहेत की त्या स्वतःला अमेरिकन म्हणणं पसंत करतात.
 
मात्र, 2020 च्या निवडणूक प्रचारादरम्यान, कमला भारतीय जेवण बनवताना आणि एका व्हिडिओमध्ये दक्षिण भारताबद्दल बोलताना दिसल्या होत्या. कमला म्हणाल्या होत्या की त्या भरपूर भात, दही, रसरशीत बटाट्याची भाजी, मसूर आणि इडली खात वाढल्या आहेत.
 
2014 मध्ये कमलाने वकील डग्लस एमहॉफशी लग्न केले तेव्हा भारतीय आणि ज्यू दोन्ही परंपरांचे पालन केले गेले.