शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 जुलै 2024 (14:10 IST)

ऋषी सुनक ते लिसा नंदी, युकेच्या निवडणुकीत जिंकलेले 'हे' आहेत भारतीय वंशाचे 10 खासदार

rishi sunak
युनायटेड किंग्डममध्ये झालेल्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये मजूर पक्षाला (लेबर पार्टी) मोठा विजय मिळाला आहे. 14 वर्षांनंतर मजूर पक्ष सत्तेत परतला आहे.
मजूर पक्षाच्या या विजयामुळे हुजूर पक्ष (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) आणि ऋषि सुनक यांच्या हातून सत्ता गेली आहे.
आता मजूर पक्षाचे किएर स्टार्मर हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनले आहेत.
या निवडणुकीत भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांचा विजय झाला आहे ही एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
भारतीय वंशाच्या कोणत्या नेत्यांच्या बाजूनं युनायटेड किंगडममधील लोकांनी कौल दिला आहे आणि त्यांना विजयी केलं आहे हे पाहूया.
ऋषि सुनक
हुजूर पक्षाचे (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) नेते आणि आता युनायटेड किंग्डमचे माजी पंतप्रधान असलेले ऋषि सुनक या निवडणुकीत आपल्या पक्षाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. ते स्वत: मात्र उत्तर इंग्लंडमधील रिचमंडमधून जिंकले आहेत.
शिवानी राजा
हुजूर पक्षाच्या (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) शिवानी राजा पूर्व लेस्टर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. लेस्टरमध्ये जन्मलेल्या शिवानी राजा यांनी डि मॉंटफोर्ड विद्यापीठातून कॉस्मेटिक सायन्सचं शिक्षण घेतलं आहे.
 
त्यांना या निवडणुकीत जवळपास 31 टक्के मतं मिळाली. तर मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) राजेश अग्रवाल दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना जवळपास 21 टक्के मतं मिळाली. लिबरल डेमोक्रॅटचे जुफ्फार हक या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
शिवानी राजा ज्या लेस्टरमधून निवडून आल्या त्या लेस्टर मतदारसंघाचा बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव यांनी घेतलेला आढावा :
शौकत अॅडम पटेल
शौकत अॅडम पटेल अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. त्यांनी दक्षिण लेस्टर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांनी आपला विजय गाझासाठी समर्पित केला आहे.
सुएला ब्रेवरमॅन
सुएला ब्रेवरमॅन हुजूर पक्षाच्या (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) नेत्या आहेत. भारतीय वंशाच्या सुएला या ऋषि सुनक सरकारमध्ये गृहमंत्री होत्या.
नंतर सुनक सरकारनं त्यांच्या जागी जेम्स क्लेवरी यांना गृहमंत्री केलं होतं. सुएल ब्रेवरमॅन या 'फेयरहॅम-वॉटरलूविल' मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
या निवडणुकीत हुजूर पक्षाचा पराभव झाला आहे. पक्षाच्या पराभवाबद्दल सुएला यांनी माफी देखील मागितली आहे. त्यांचे वडील मूळचे गोव्यातील होते. त्यांची आई सुद्धा भारतीय वंशाचीच होती.
कनिष्क नारायण
कनिष्क नारायण मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) नेते आहेत. ते वेल्स वेल ऑफ ग्लेमॉर्गन मतदारसंघातून जिंकले आहेत. ते वंशीय अल्पसंख्यांक समुदायाशी संबंध असलेल्या वेल्सचे पहिले खासदार आहेत. कनिष्क नारायण कार्डिफमध्येच वाढले आहेत. सध्या ते बॅरी मध्ये राहतात.
 
आपल्या विजयानंतर कनिष्क म्हणाले की त्यांना लोकांना उत्तम सेवा पुरवायच्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आपल्या मतदारसंघात त्यांना रोजगार निर्मिती करायची आहे आणि इथे सुबत्ता आणायची आहे.
प्रीत कौर गिल
प्रीत कौर गिल या मजूर पक्षाच्या (लेबर पार्टी) उमेदवार होत्या. त्या बर्मिंघम एजबेस्टन मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांना जवळपास 44 टक्के मतं मिळाली आहेत.
 
2017 मध्ये निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर प्रीत कौर गिल ब्रिटनच्या पहिल्या महिला शीख खासदार बनल्या होत्या.
 
गगन मोहिंद्रा
गगन मोहिंद्रा हुजूर पक्षाचे (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) उमेदवार होते. त्यांनी साऊथ वेस्ट हर्ट्स मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत गगन मोहिंद्रा यांना यंदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे.
 
नवेंदु मिश्रा
नवेंदु मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) नेते आहेत. त्यांनी स्टॉकपोर्ट मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
नवेंदु मिश्रा यांनी पुन्हा विजय मिळाल्यानंतर ट्विट करत स्टॉकपोर्टच्या लोकांचे आभार मानले आहेत. त्यांचे आई-वडील भारतीय वंशाचे असून ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.
लीसा नंदी
मजूर पक्षाच्या (लेबर पार्टी) लीसा नंदी 2014 पासून विगन मतदारसंघात विजय मिळवत आल्या आहेत. यंदाही त्यांनी आपला मतदारसंघ राखला आहे.
 
त्यांचा जन्म 1979 ला मॅंचेस्टरमध्ये झाला होता. त्यांचे वडील दीपक नंदी भारतीय वंशाचे आहेत. आपले वडील ब्रिटनमधील मोजक्या मार्क्सवाद्यांपैकी एक असल्याचे लीसा सांगतात.
तनमनजीत सिंह ढेसी
तनमनजीत सिंह ढेसी मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) शीख नेते आहेत. ते स्लॉ मतदारसंघातून निवडून आले आहेत.
आपल्या आणि मजूर पक्षाच्या विजयानंतर तनमनजीत सिंह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, परिवर्तन, एकता आणि समृद्धीसाठी लोकांनी मतं दिली आहेत.

Published By- Priya Dixit