शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (07:30 IST)

मिझोराममध्ये म्यानमारच्या हजारो लोकांची घुसखोरी, तरीही विरोध नाही, कारण

 Mizoram
गेल्या काही दिवसांत भारत-म्यानमार सीमेजवळ म्यानमार लष्कर आणि लष्करी राजवटीला विरोध करणार्‍यांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सुमारे पाच हजार विस्थापित लोक म्यानमारमधून मिझोराममध्ये पोहोचले आहेत.
बुधवारपर्यंत (15 नोव्हेंबर पर्यंत) म्यानमार लष्कराच्या 45 जवानांनीही मिझोराम पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.
 
त्यांना भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आलं आणि नंतर म्यानमारला परत पाठवण्यात आलं.
 
मिझोराम पोलिसांचे आयजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) लालबियाक्तगंगा खिआंगते यांनी बीबीसीशी बोलताना याला दुजोरा दिला आहे.
बीबीसीशी बोलताना आयजीपी खिआंगते म्हणाले की, "सीमेच्या पलीकडे परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे, परंतु आतापर्यंत भारताच्या बाजूनं कोणतीही हिंसक कारवाई झालेली नाही.
 
म्यानमार-भारत सीमेच्या अगदी जवळ सुरू असलेल्या चकमकींचा सीमेवरील परिस्थितीवर परिणाम झाला आहे. बंडखोरांनी अनेक ठिकाणी हल्ले केले आणि लष्कराच्या चौक्या ताब्यात घेतल्या, त्यानंतर म्यानमारच्या सैनिकांना जंगलात लपून राहावं लागलं."
 
फेब्रुवारी 2021 मध्ये लष्करानं लोकशाही सरकारला हटवून म्यानमारमधील सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून म्यानमारमध्ये गृहयुद्ध सुरू असून त्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत.
 
म्यानमार लष्कराला फटका बसला
अलीकडच्या काही दिवसांत अनेक सशस्त्र गटांनी एकत्र येऊन चीनला लागून असलेल्या म्यानमारच्या शॅन प्रांतात लष्करावर हल्ले चढवले आणि अनेक ठिकाणी त्यांना यशही मिळालं.
 
यानंतर बंडखोरांनी भारताच्या सीमावर्ती भागातील म्यानमारच्या लष्कराच्या तळांवरही मोठे हल्ले केले आहेत.
 
मिझोराम पोलिसांच्या म्हणण्यानुसार यामुळे भारत-म्यानमार सीमेवरील हालचाली वाढल्या आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश विस्थापित चमफाई जिल्ह्यातील सीमावर्ती शहरांमध्ये पोहोचले आहेत.
 
आयजीपी खिआंगते म्हणतात, "म्यानमारमध्ये खूप अशांतता आहे, त्याचा सीमेवरही परिणाम झाला आहे, जरी मिझोरामच्या बाजूने कोणतीही हिंसक कृती झालेली नाही.
 
गेल्या काही दिवसांत म्यानमारमधून अंदाजे पाच हजार लोक मिझोराममध्ये आले आहेत. लोक सतत भारतात दाखल झाल्याच्या बातम्या येत आहेत.
 
बुधवारी (15 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत म्यानमार लष्कराच्या 45 जवानांनी मिझोराम पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे, आम्ही त्यांना केंद्रीय दलांच्या ताब्यात दिलं आहे. आसाम रायफल्स सीमेवर पहारा देत आहेत."
 
विस्थापित लोक मोठ्या संख्येनं येत आहेत
म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या भागात काम करणाऱ्या मिझो युथ असोसिएशनच्या सदस्यांशी बीबीसीनं संवाद साधला.
 
ते म्हणाले की, सीमेपलीकडे कारवाया तीव्र झाल्यामुळे निर्वासित भारताकडे येत आहेत. त्यांच्यासाठी चमफाई आणि जोखाथार इथं शिबिरं उभारली आहेत.
 
आयजीपी म्हणतात, "भारताच्या बाजूची परिस्थिती शांततापूर्ण आहे, पण म्यानमार सीमेच्या अगदी जवळ चकमकी होत आहेत. जेव्हा जेव्हा तिथं चकमकी तीव्र होतात तेव्हा त्याचा निश्चितपणे सीमेवरील परिस्थितीवर परिणाम होतो. बुधवार (15 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत आम्हाला सीमेपलिकडे चकमकीचं वृत्त मिळालं आहे."
 
वृत्तानुसार 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी चिन नॅशनल आर्मी आणि त्याचे समर्थक गट- सीडीएफ हुआलगोराम, सीडीएफ झानियात्राम, पीपुल्स डिफेंस आर्मी, सीडीएफ थांतलांग यांनी संयुक्तपणे भारतीय सीमेजवळील म्यानमार लष्कराच्या खावमावी ( तियाऊ) कॅम्प आणि रिखाद्वार (जे भारतीय सीमेपासून अगदी जवळ आहे ) छावणीवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात म्यानमार लष्कराचे अनेक जवान मारले गेले आणि जखमी झाले आहेत.
 
या हल्ल्यानंतर म्यानमार लष्कराचे 43 सैनिक मिझोरामला पळून आले आणि त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. बुधवारी (15 नोव्हेंबर) आणखी दोन जवानांनी आत्मसमर्पण केलं.
 
लष्करी छावण्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर म्यानमार लष्करानं एमआय हेलिकॉप्टर आणि जेट फायटर मदतीसाठी पाठवलं आणि बॉम्बफेक केली.
 
मिझोराम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीमेपलीकडील चकमकी आता कमी झाल्या आहेत, पण अधून मधून घटना घडत आहेत.
 
भारत-म्यानमार सीमा खुली झाली आहे
भारतातील मिझोराम प्रांत आणि म्यानमारच्या चिन प्रांतामध्ये 510 किमी लांबीची सीमा आहे.
 
दोन्ही बाजूचे लोक इकडे तिकडे सहज ये-जा करू शकतात. दोन्ही दिशेनं 25 किलोमीटरपर्यंत प्रवास करण्यावर कोणतंही बंधन नाही.
 
आयझॉल गव्हर्नमेंट जॉनसन कॉलेजचे प्रोफेसर डेव्हिड लालरिनछाना सांगतात की, "म्यानमारच्या चिन प्रांतातील लोक आणि मिझोरामचे मिझो लोक यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत आहेत, कारण दोन्ही गटांचा असा विश्वास आहे की त्यांचे पूर्वज समान आहेत.
 
त्यांचा इतिहास, संस्कृती आणि श्रद्धा समान आहेत. हे लोक सीमेच्या दोन्ही बाजूला राहत असले तरी ते स्वतःला भाऊ-बहीण समजतात. मिझोरामला म्यानमारच्या चिन प्रांतातील लोकांकडून पाठिंबा मिळत आला आहे आणि यावरून हे दिसून येतं की या दोन समुदायांमधील संबंध कौटुंबिक आहेत."
यामुळेच म्यानमारच्या चिन प्रांतांतून येणाऱ्या स्थलांतरितांना मिझोराममध्ये पूर्ण पाठिंबा मिळतो.
 
यंग मिझो असोसिएशनचे सचिव लालनुन्तलुआंगा म्हणतात, "सुमारे पाच हजार लोक सीमा ओलांडून पोहचले आहेत आणि चमफाई जिल्ह्यातील जोखाथर, मेल्बुक, बुल्फेकझाल भागात तंबूत राहत आहेत. आमची संघटना या लोकांना मदत करत आहे."
 
लालनुन्तलुआंगा स्पष्ट करतात, " सेंट्रल मिझो युथ असोसिएशन आपल्या विविध शाखांमधून देणगी घेत आहे आणि या शिबिरांमध्ये तांदूळ, भाज्या, डाळी, ब्लँकेट, भांडी यासारख्या आवश्यक वस्तू वितरीत करत आहे."
 
लालनुंतलुआंगा म्हणतात, "भारत आणि म्यानमारमधील सीमेवर फारशी सक्ती नाही आणि ती ओलांडणं खूप सोपं आहे. सीमेच्या दोन्ही बाजूंना 25 किलोमीटरपर्यंत जाण्याचंही स्वातंत्र्य आहे, त्यामुळे विस्थापितांना भारतात पोहोचणं अवघड नाही."
 
मिझोराममध्ये किती निर्वासित आहेत?
म्यानमारमध्ये लष्करी उठावानंतर लष्कर आणि बंडखोरांमध्ये झालेल्या हिंसाचारात अडकलेले लोक मोठ्या संख्येनं भारतात पोहोचले आहेत.
 
या वर्षी मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार म्यानमारमधील जवळपास 31,500 निर्वासित मिझोरामची राजधानी आयझॉल आणि इतर जिल्ह्यांमध्ये राहत होते. हे सर्व चिन प्रांतातून आले आहेत.
 
मिझोरमच्या गृहविभागाच्या म्हणण्यानुसार म्यानमारमधील लोकांनी मिझोरामच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
 
राज्यात 160 हून अधिक मदत शिबिरं आहेत, ज्यामध्ये अंदाजे 13 हजार निर्वासित आहेत, उर्वरित निर्वासित इतर ठिकाणी राहत आहेत.
 
आता ताज्या हिंसाचारानंतर पाच हजारांहून अधिक नवीन निर्वासित मिझोराममध्ये पोहोचले आहेत.
 
मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी अलीकडेच बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कबूल केलं होतं की, म्यानमारमधील निर्वासित ही मिझोरामची मानवतावादी जबाबदारी आहे.
 
हे निर्वासित त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी फायदेशीर आहेत, असंही ते म्हणाले.
 
झोरमथांगा यांनी असंही म्हटलं होतं की, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जेव्हा ब्रिटीश साम्राज्यानं भारताची फाळणी केली तेव्हा मिझो लोक बांगलादेश (तत्कालीन पूर्व पाकिस्तान), भारत आणि म्यानमारमध्ये विभागले गेले होते, पण तरीही त्यांच्यात बंधुत्वाचं नातं आहे. आणि ते सर्वजण स्वतःला मोठ्या समुदायाचा भाग समजतात.
 
यामुळेच म्यानमारच्या चिन प्रांतातून येणाऱ्या निर्वासितांना मिझोराममध्ये कोणताही विरोध होत नाही आणि इथले सामान्य लोक त्यांना मदत करतात.
 
निवडणुकीच्या काही दिवस आधी दिलेल्या मुलाखतीत बीबीसीनं झोरमथांगा यांना भविष्यात निर्वासितांना स्वीकारणार का असं विचारलं असता ते म्हणाले होते,
 
"सहानुभूती दाखवणं ही आमची मानवतावादी जबाबदारी आहे. जर लोक आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांना जबरदस्तीनं परत पाठवणार नाही. म्यानमारमधून येणारे लोक आमचे मिझो लोक आहेत."
 
म्यानमारसोबत असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो?
मिझोराम हा छोटा प्रांत आहे. इथली एकूण लोकसंख्या साडे तेरा लाख आहे. म्यानमारमधून येणाऱ्या निर्वासितांचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचं विश्लेषकांचं मत आहे.
 
प्रोफेसर डेव्हिड म्हणतात, "हे संकट बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय त्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळेच कोणताही उपाय शोधला जात नाही.
 
मिझोरामला सुरुवातीपासून त्याचा परिणाम जाणवत आहे. आता अलीकडील घटनांनंतर जोखाथारमधून होणारा सीमेपलिकडील व्यापार त्वरित थांबला आहे. सीमा क्रॉसिंग बंद झाल्यामुळे अनेक वस्तूंची आयात होत नाही आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर किमती वाढत असून स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे."
 
प्रोफेसर डेव्हिड म्हणतात, "मिझोरम हे एक लहान राज्य आहे आणि त्याच्याकडे अंतर्गत महसूलाचे स्रोत मर्यादित आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येनं विस्थापित लोकांना हाताळण्याचा राज्याच्या अर्थसंकल्पावरही परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम सुरक्षा आणि पर्यावरणावरही होत आहे."
 
पण, डेव्हिड यांचा असा विश्वास आहे की सर्व आव्हानं असूनही, या कठीण काळात मिझो लोकांमध्ये एकता वाढत आहे आणि मिझोरामचे लोक म्यानमारमधून येणाऱ्या लोकांना सर्व प्रकारे मदत करत आहेत.
 
या संकटामुळे, व्यापक पातळीवर भारताचे म्यानमार सोबत असलेले संबंध आणि भारताचं म्यानमारबाबतचं धोरण यावर परिणाम होऊ शकतो.
 
प्रोफेसर डेव्हिड म्हणतात, "या संकटाचा म्यानमारच्या सध्याच्या लष्करी सरकारशी मैत्री वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो.
 
मिझोरामचे राजकीय पक्ष आणि सरकार म्यानमारमध्ये राहणाऱ्या मिझो लोकांचं समर्थन करत असताना, मिझोराममध्ये निर्वासितांना दिली जाणारी राज्यस्तरीय मदत थांबवण्याच्या केंद्र सरकारच्या विचारसरणीत विरोधाभासही आहे. हे वैचारिक मतभेद भारताच्या म्यानमारशी असलेल्या संबंधांवर परिणाम करू शकतात."
 























Published By- Priya Dixit