रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 जुलै 2024 (18:11 IST)

कमला हॅरिस: कृष्णवर्णीयांचा आवाज बुलंद करणाऱ्या वकील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीपर्यंत कशा पोहोचल्या?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक आहेत. अशा वेळी या निवडणुकीनं रंजक वळण घेतलं आहे. जो बायडन यांची माघार आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी कमला हॅरिस यांना दर्शवलेला पाठिंबा यामुळं निवडणुकीची रंगत वाढणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या डिबेटमध्ये बायडन यांची कामगिरी पाहता, त्यांच्यावर उमेदवारी सोडण्यासाठी प्रचंड दबाव होता.
अखेर त्यांनी निर्णय उमेदवारीतून माघार घेण्याचा जाहीर केला आणि आता कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅट्सकडून निवड होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
 
 
अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिल्या, कृष्णवर्णीय आणि आशियाई-अमेरिकन वंशाच्या उप-राष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचा इथवरचा प्रवास खास आहे.
कमला हॅरिस बायडन यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. गर्भपात आणि कृष्णवर्णियांच्या मुद्द्यांवर त्यांनी अगदी थेट मते मांडलेली आहेत. हॅरिस यांचं भारताबरोबर असलेलं नातंही अगदी खास आहे.
 
 
आई 'सिंगल मदर'
कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ओकलँडमध्ये 1964 मध्ये झाला होता. त्यांचे वडील मूळचे जमैकाचे तर आई मूळच्या भारतीय वंशाच्या होत्या.
 
आई वडिलांच्या घटस्फोटानंतर कमला यांच्या हिंदू आईनं एकटीनं त्यांना वाढवलं. त्यांच्या आई श्यामला गोपालन या कॅन्सर रिसर्चर आणि मानवी हक्क कार्यकर्त्या होत्या.
श्यामला यांनी त्यांच्या दोन्ही मुली कमला आणि माया यांना भारतीय संस्कृतीचा वारसा जपत लहानाचं मोठं केलं. आईबरोबर कमला अनेकदा भारतातही येत होत्या.
पण, तसं असलं तरी त्यांनी अमेरिका आणि आफ्रिकेची संस्कृतीही स्वीकारली होती. मुलींनाही त्यांनी तशी संमिश्र शिकवण दिली. त्यामुळं लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचा दृष्टीकोन त्यांना मिळत गेला.
कमला यांनी त्यांच्या 'द ट्रुथ वी होल्ड' नावाच्या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख केल आहे.
 
"माझ्या आईला चांगल्या प्रकारे जाणीव होती की, ती दोन कृष्णवर्णीय मुलींना वाढवत आहेत.आपण ज्या भूमीचा स्वीकार केला आहे, ती आपल्या मुलींकडे कृष्णवर्णीय मुली म्हणूनच बघेल हेही त्यांना माहिती होती. त्यामुळं आम्ही आत्मविश्वासपूर्ण कृष्णवर्णीय महिला बनावं याची काळजी त्यांनी घेतली."
 
कमला यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या आई श्यामला गोपालन यांचा जन्म चेन्नईत झाला होता.1958 मध्ये न्यूट्रिशन आणि एंडोक्रनॉलोजीमध्ये पीएचडी करण्यासाठी त्या अमेरिकेत गेल्या. नंतर ब्रेस्ट कॅन्सरच्या क्षेत्रात त्या संशोधक बनल्या होत्या.कमला यांचे आजोबा पी. व्ही. गोपालन भारत सरकारचे वरिष्ठ राजदूत होते.
हॉर्वडमधील महत्त्वाचा अनुभव
हॉर्वड युनिव्हर्सिटी या ऐतिहासिक कृष्णवर्णीय महाविद्यालयातील शिक्षणादरम्याच्या कालावधीत जीवनातील सर्वात संपन्न करणारा अनुभव मिळाला, असं कमला सांगतात.
 
हॉर्वर्डमध्ये 1980च्या दशकात विद्यार्थी कॅम्पसमध्ये एकत्र जमून राजकारणावर चर्चा करायचे. त्यावेळी कमला यांचं म्हणणं फारच तर्कसंगत असायचं, असं त्यांच्याबरोबर त्यावेळी असलेल्या रिटा रोसारियो रिचर्डसन सांगतात.
 
कृष्णवर्णीय म्हणून वावरत असताना बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं असल्याचा विचार त्यांना हॉर्वर्डमधील अनुभवातून मिळाला होता.
कमला यांनी मात्र कायम त्यांची ओळख अमेरिकन असल्याचं अगदी सहजपणे म्हटलं आहे.
 
2019 साली वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, राजकीय नेत्यांनी वर्ण आणि पार्श्वभूमी या आधारावर कुठल्याही विशिष्ट भूमिकेत शिरता कामा नये.
 
त्या म्हणाल्या होत्या, "मला म्हणायचं आहे की मी जी आहे ती आहे. मला त्याचा आनंद आहे. काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. पण मी पूर्णपणे आनंदी आहे."
 
हॉर्वर्डनंतर कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्या वकिली व्यवसायात उतरल्या. यानंतर त्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या अ‍ॅटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या.
 
कमला हॅरिस दोन वेळा अ‍ॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर 2017 साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या.
 
कमला 'मोमाला'
कमला हॅरिस यांनी 2014 मध्ये वकील असलेले डग एम्पहॉफ यांच्याशी लग्न केलं. डग यांच्या दोन मुलांच्या त्या सावत्र आई (स्टेपमॉम) बनल्या.
 
त्यानंतर एले मॅगझिनमध्ये लिहिलेल्या एका लेखात त्यांनी या अनुभवाबद्दल लिहिलं होतं. त्यात त्यांनी केलेल्या खुलाशाने चांगलीच चर्चा झाली होती.
 
त्यात त्यांनी लिहिलं होतं की, "डग आणि मी लग्न केलं तेव्हा कोल, एला (त्यांची सावत्र मुलं) आणि मी आम्हाला 'स्टेपमॉम' संकल्पनाच आवडली नाही. त्यामुळं त्यांनी मला नवं नाव दिलं 'Momala'.
 
उपराष्ट्रपतीपदापर्यंत मजल
कमला हॅरिस या पाच वर्षांपूर्वीपर्यंत कॅलिफोर्निया राज्यातील सिनेटर होत्या. त्यावेळीही त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची आशा होती.
 
त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अल्मेडा काऊंटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिसमधून झाली होती. त्याठिकाणी त्या डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी बनल्या. 2003 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोतील प्रमुख वकील बनल्या.
 
त्याआधी कॅलिफोर्नियातील पहिल्या महिला आणि कृष्णवर्णीय अ‍ॅटर्नी जनरल बनल्या होत्या.
 
डेमेक्रॅटिक पार्टीमध्ये वेगानं लोकप्रिय होणाऱ्या नेत्या म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर सिनेटर म्हणून निवडणूक जिंकली.
 
पण 2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवण्यात मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही. त्याचं कारण म्हणजे वादविवादातील प्रावीण्य असूनही त्यांना व्यवस्थिपणे धोरणं मांडता आली नाही.
 
2013 मध्ये कमला हॅरिस यांचे सहकारी गिल दुरान यांनीच त्यांच्यावर टीका केली होती. कमला हॅरिस यांच्यासाठी हा नशिबाचा मोठा उलटफेर ठरल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
व्हाइट हाऊसमध्ये असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर काम केलं. बायडन प्रशासनाच्या सर्वात यशस्वी कामांमध्ये हॅरिस यांचा मोलाचा वाटा होता.
 
गर्भापातवरील बंदीमुळं महिलांच्या शरिरावर होणाऱ्या दुष्परिणामांकडं लक्ष वेधण्याचं काम त्यांनी केलं. स्वतःच्या शरिराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महिलांना असावा, ही भूमिका त्यांनी अगदी ठामपणे मांडली.
 
सिनेटच्या इतिहासात उपराष्ट्राध्याक्षानं केलेल्या सर्वाधिक टाय ब्रेकिंग मतांचा विक्रमही कमला हॅरिस यांनी केला. महागाई आणि कोव्हिड सारख्या विषयांवरील महत्त्वाच्या कायद्यांवर त्यांचं मत निर्णायक ठरलं.
 
त्याचवेळी अमेरिकन नागरिकांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवण्यात त्यांना यश आलं नाही. अनेक प्रकारे त्यांना टीकेचा सामना करावा लागला.
 
अमेरिका-मॅक्सिको सीमेवर होणऱ्या प्रचंड स्थलांतरामुळं बायडन प्रशासनावर प्रचंड टीका होत होती. त्याचं मूळ शोधण्याची जबाबदारी बायडन यांनी हॅरिस यांनाच दिली होती.
 
पण बायडेन यांच्या विजयाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागल्यानंतर मात्र कमला हॅरिस यांना मिळणारा पाठिंबा वाढायला सुरुवात झाली होती.
 
भारतीय परंपरांबाबतची आपुलकी
कमला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या नावाचा अर्थ सांगताना भारतीय संस्कृतीचा उल्लेख केला आहे.
 
त्या लिहितात की, "माझ्या नावाचा अर्थ 'कमळाचं फुल'असा आहे. भारतीय संस्कृतीत याचं खूप जास्त महत्त्वं आहे. कमळाचं रोप पाण्याखाली असतं. तर फुल पाण्याच्या वरच्या भागात फुलतं. तर याची मुळं नदीच्या तळापर्यंत रुजलेली असतात," असं त्यांनी म्हटलं होतं.
 
कमला यांनी 2014 मध्ये लग्न केलं त्यावेळी त्यांनी भारतीय आणि ज्यू अशा दोन्ही पद्धतीनं विधी केल्या होत्या. कमला यांनी डगलस यांना फुलांचा हार घातला तर डगलस यांनी ज्यू परंपरेनुसार काच फोडली होती.
कमला हॅरिस यांच्यासोबतचा एक व्हिडिओ भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉमेडियन आणि अभिनेत्री मिंडी कॅलिंग यांनी पोस्ट केला होता. त्यात कमला आणि कॅलिंग कुकींग करताना दिसल्या होत्या. त्यात त्यांनी त्यांच्या भारतीय पार्श्वभूमीबाबत चर्चा केली होती.
 
यात कॅलिंग यांनी दक्षिण भारतीय पदार्थांबाबत विचारलं असता कमला यांनी अनेक दक्षिण भारतीय पदार्थांची नावं घेतली. कर्ड राईस, डाळ, इडली हे खाऊनच मोठ्या झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
 
कमला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात घरी भारतीय बिर्याणी आणि स्पॅगेटी बोलोगनीज असे सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत असल्याचं लिहिलं आहे.
 
पोलिसिंगबाबत भूमिका
कमला हॅरिस यांची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्या यापूर्वीच्या कामाबाबतही बोललं जात आहे. त्यांनी वकिली करताना केलेल्या कामाचाही त्यात समावेश आहे.
 
गे मॅरेज आणि मृत्यूदंड अशा प्रकरणांत डाव्या बाजूला झुकलेल्या असूनही पुरोगाम्यांकडून त्यांच्यावर अनेकदा हल्लाबोल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पाहिजे तेवढ्या पुरोगामी नसल्याचा आरोप त्यांच्यावर होतो.
 
कमला यांच्या निवडणूक प्रचारात "कमला इज अ कॉप" वाक्याचा वापर करण्यात आला.
अमेरिकेत वर्णद्वेषी घटना आणि पोलिसांच्या वर्तनावर वादविवाद सुरू असताना कमला हॅरिस यांनी याबाबत भूमिका घेतली होती. अमेरिकेत पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल होणं गरजेचं असल्याचं त्यांनी अनेक टॉक शोमध्ये म्हटलं होतं.सिस्टीमॅटिक वर्णद्वेश संपवणं अत्यंत गरजेचं असल्याचंही कमला हॅरिस यांनी अनेकदा म्हटलं आहे.
 
कृष्णवर्णीय ओळखीच्या पार्श्वभूमीवर वंचित गटांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचा दावा कमला हॅरिस करतात.उपराष्ट्राध्यक्ष असताना कमला हॅरिस यांनी ज्या पद्धतीनं जो बायडन यांना कामात मदत केली, त्यामुळं बायडन यांचा त्यांच्यावरील विश्वास आणखी वाढला.
त्याशिवाय बायडन यांच्या राष्ट्राध्यक्ष पदच्या उमेदवारीनंतर हॅरिस यांनी अगदी प्रामाणिकपणे त्यांच्या आणि डेमोक्रॅटच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
 
त्यामुळं आता बायडन यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या जागी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून हॅरिस यांचं नाव पुढं केलं आहे. त्यांची उमेदवारी अंतिम झाल्यास, एका वेगळ्याप्रकारे ऐतिहासिक निवडणूक अनुभवायला मिळणार हे नक्की.
 
Published By- Priya Dixit