1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मार्च 2022 (15:12 IST)

रशियन-युक्रेन युद्धाचा थेट नाशिकवर होतोय परिणाम

रशिया युक्रेन युद्ध त्याचा परिणाम केवळ या दोन देशावर झाला नसून जगभरातील अनेक देशांवर त्याचा दूरगामी परिणाम झालेला आहे. या युद्धामुळे विशेषतः कच्च्या तेलाच्या आयात निर्यातीवर झाला असून अन्य व्यापारावर देखील मोठा परिणाम झालेला दिसतो त्याचप्रमाणे रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आता भारतीय लष्कराच्या अपग्रेडेशनवर दिसून येत आहे.या युद्धामुळे भारतीय फायटर जेट सुखोईच्या अपग्रेडेशनवर परिणाम होऊ शकतो. रशियन सुखोई-30 MKI अपग्रेड केले जाणार आहे. हे काम नाशिकमधील ओझर येथे असलेल्या हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथे केले जात आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे या अपग्रेडेशन कामास विलंब होण्याची शक्यता आहे. सुखोई-30 एमकेआयला लवकरात लवकर अपग्रेड करण्याची गरज असल्याचे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांचे मत आहे. परंतु आता रशियन पुरवठा विलंब होण्याची शक्यता आहे.
 
भारताने रशियाशी करार केल्यानंतर ओझर एचएएलमध्ये रशियन बनावटीच्या मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात आली आहे. सुखोई 30MKI हे अलिकडेच उत्पादित केलेले विमान आहे. भारताने आता स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांची निर्मिती गेल्या दशकभरापासून सुरू केली आहे. मात्र, अद्यापही अनेक सुट्या भागांसाठी भारताला रशियावरच अवलंबून रहावे लागत आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की, सुखोई लढाऊ विमान सुमारे दोन दशकांपूर्वी हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले होते. नंतर सुखोई 30MKI ही विमानेही आली, वास्तविक ती आधीच्या जेट विमानांपेक्षा जास्त प्राणघातक होती. या सर्व लढाऊ विमानांचे सुटे भाग रशियाकडून येतात. भारताकडे काही महिन्यांचे सुटे भाग आहेत, पण मॉस्कोमधून वेळेत त्याचा पुरवठा झाला नाही तर भारतासमोर अडचण निर्माण होऊ शकते. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर ज्या प्रकारे निर्बंध लादले आहेत, त्यामुळे रशियाकडून सुटे भाग येण्यास विलंब होणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.भारतीय लढाऊ ताफ्यांसाठी, रशियाकडून दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपयांचे सुटे भाग खरेदी केले जातात. भारतीय हवाई दलाकडे एकूण 272 सुखोई 30 आहेत. यापैकी अनेकांना अपग्रेड करणे आवश्यक आहे. सदर अहवालात असे सूचित होते की, सुमारे एक दशकापूर्वी सुखोई भारतातच अपग्रेड करण्यासाठी अशी योजना तयार करण्यात आली होती, परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाला आजपर्यंत मंजुरी मिळालेली नाही.
 
अनेक लढाऊ विमाने अजूनही उडण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे अनेकांना अपग्रेड करण्याची गरज असल्याचे अहवाल सांगतो. अनेक सुखोई विमानांना रडार, फुल-ग्लास कॉकपिट्स आणि फ्लाइट-कंट्रोल कॉम्प्युटरने अपग्रेड करणे आवश्यक आहे. तसेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यावेळी भारताला दोन आघाड्यांवरील युद्धासाठी सदैव तयार ठेवायचे आहे, तेव्हा भारताची लढाऊ विमाने अद्ययावत राहणे अत्यंत आवश्यक आहे.