1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2024 (20:25 IST)

कामाचं नाटक करत, माऊस खेळवत राहाणाऱ्यांची बँकेने केली हकालपट्टी

कोरोना नंतर जगभरात वर्क फ्रॉम होम कार्यसंस्कृती उदयास आली आणि पाहता पाहता लोकप्रिय झाली. याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट टळल्यानंतर कंपन्यांना कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कार्यालयात येऊन काम करावं असं वाटतं आहे. त्याचवेळी जे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत, त्यांच्यावर पाळत ठेवली जाते आहे.
 
वेल्स फार्गो या अमेरिकेतील वित्तीय सेवा आणि बँकिंग सेवा पुरवणाऱ्या बड्या बँकेनं अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे.
हे कर्मचारी कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर काम केल्याचं भासवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काम करत नसतानाही बँकेला काम आहे असं वाटावं म्हणून ते अशी शक्कल लढवत होते, असं बॅंकेचं म्हणणं आहे.
हे प्रकरण समोर कसं आलं किंवा हे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी निगडीत होतं का? याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
 
अमेरिकेतील या बँकेनं असं म्हटलं आहे की, "की बोर्डच्या खोट्या हालचालीद्वारे काम करत असल्याचा बनाव तयार करण्याच्या आरोपांचा आढावा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आलं आहे, किंवा त्यांनी राजीनामा दिला आहे."
 
अमेरिकेत अलिकडेच नवीन नियम लागू करण्यात आले होते. त्यानुसार जे ब्रोकर्स, वर्क फ्रॉम होम करत होते, त्यांची दर तीन तासांनी तपासणी करणं आवश्यक होतं.
 
बॅंकेच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "वेल्स फार्गो कर्मचाऱ्यांची हाताळणी सर्वोच्च मानकांवर करते आणि अनैतिक वर्तन सहन करत नाही."
2022 मध्ये वेल्स फार्गोनं म्हटलं होतं की, त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी कामाचं हायब्रिड-फ्लेक्सिबल मॉडेल स्वीकारलं आहे, ज्यामुळं कर्मचाऱ्यांना काही वेळ 'वर्क फ्रॉम होम' करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोविड संकटाच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' किंवा 'रिमोट वर्क' पद्धतीचा विस्तार झाल्यामुळं कर्मचाऱ्यांवर देखरेख करण्यासाठी काही बड्या कंपन्या अधिकाधिक अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहेत.

त्या माध्यमातून कीबोर्डवरील की चा वापर आणि डोळ्यांच्या हालचाली यांचा माग ठेवू शकतात, त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊ शकतात आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्या वेबसाईट्स पाहिल्या याचीही नोंद ठेवू शकतात.
मात्र या प्रकारच्या पाळतीला हुलकावणी देण्यासाठी देखील तंत्रज्ञान विकसित झालं आहे. त्यामध्ये "माऊस जिगलर्स" चा समावेश आहे. याचा उद्देश कॉम्प्युटर सक्रियपणे वापरात असल्याचं दाखवणं हा आहे. हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
 
अ‍ॅमेझॉनवर माऊस जिगलर्स 10 डॉलर्सपेक्षा कमी किंमतीला उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉननुसार मागील महिन्यात हजारो माऊस जिगलर्सची विक्री झाली आहे.
 
वेल्स फार्गोनं अमेरिकनं वित्तीय उद्योग नियामक यंत्रणेकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ब्लूमबर्गनं पहिल्यांदा यासंदर्भातील बातमी दिली होती. ब्लूमबर्गनुसार या कारवाईचा एक डझनपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे.
 
आढावा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना सोडण्यात आल्याच्या सहा घटनांची पुष्टी बीबीसीनं केली आहे. एका प्रकरणात दाव्यांना सामोरं गेल्यानंतर एका कर्मचाऱ्यानं स्वेच्छेनं राजीनामा दिला होता.
 
त्यांच्यापैकी अनेकांनी वेल्स फार्गोमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी काळ काम केलं होतं.
अनेक कंपन्या, विशेषत: आर्थिक क्षेत्रातील कंपन्या, कर्मचाऱ्यांवर कार्यालयात येऊन काम करण्यासाठी दबाव टाकत आहेत.
 
कोरोनानंतर रिमोट वर्क पद्धत लोकप्रिय झाली आहे, मात्र याची संख्या कमी होत चालली आहे.
 
स्टॅनफोर्ड मधील इस्टिट्युटो टेक्नोलोजिको ऑटोनोमो डी मेक्सिको (ITAM)बिझनेस स्कूल आणि शिकागो विद्यापाठीतील प्राध्यापकांच्या संशोधनानुसार अमेरिकेत 2020 मध्ये कोरोनाचे संकट शिखरावर असताना 60 टक्क्यांपेक्षा अधिक कामकाजी दिवस (पेड डेज) वर्क फ्रॉम होम प्रकारातील होते त्यातुलनेत मागील महिन्यात 27 टक्क्यांपेक्षा कमी कामकाजी दिवस वर्क फ्रॉम होम प्रकारातील होते.
 
संशोधकांनुसार, या गेल्या काही महिन्यांपर्यंत, अमेरिकेतील जवळपास 13 टक्के पूर्ण वेळ कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट वर्क प्रकारातील होते आणि आणखी 26 टक्के कर्मचारी हायब्रीड प्रकारात (वर्क फ्रॉम होम अधिक कार्यालय) काम करत होते.
 
Published By- Priya Dixit