सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (18:32 IST)

पाकिस्तान जगातील सर्वाधिक धोकादायक देश, असं बायडेन का म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे जगभरात नवा गदारोळ निर्माण झाला आहे. लॉस अँजलिस इथल्या एका कार्यक्रमात बायडेन यांनी जगभऱात धोक्यात आलेली लोकशाही आणि वाढती निरंकुश सरकारे यावर मुक्तपणे वक्तव्यं केली आहेत.
 
याच कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. "मला वाटतं कदाचित पाकिस्तान जगातील सर्वाधिक धोकादायक देशांपैकी एक आहे. अण्वस्त्र बाळगणारा तो एक बेजबाबदार देश आहे." असं ते म्हणाले आहेत.
 
काय म्हणाले बायडेन?
बायडेन म्हणाले, "जग बदलतंय, फार वेगानं बदलतंय. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय. हे काही एका व्यक्ती किंवा एकाच देशामुळे होत नाहीय. तुम्ही अमेरिकन देशांच्या गटाकडे पाहा, इथं काय चाललंय. नेटोच्या दृष्टीने पाहिलं तरी इथं काय चाललंय ते समजतम. प्रत्येकजण जगातल्या आपल्या स्थानाबद्दल पुन्हा एकदा विचार करतोय. प्रत्येकजण आपले योगदान आणि सहकार्यावर पुन्हा एकदा विचार करत आहे."
 
बायडेन म्हणाले, " तसं पहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर बरंच काही आहे. अनेक गोष्टी एकदम घडत आहेत. तंत्रज्ञानाने वस्तूमध्ये भयानक बदल घडवलेल्या स्थितीत आपण आहोत. जगभरातील राजकारणात व्यापक बदल झालाय. खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत कशा स्थितीत पोहोचत आहेत? लोक वस्तुस्थिती आणि आभासी स्थिती यातला फरक कसा ओळखत आहेत? अनेक गोष्टी घडत आहेत. आपण त्यामध्ये आहोत. जगभरातले लोक आपल्याला पाहात आहेत. याचा सामना आपण कसे करणार आहोत हे शत्रूराष्ट्रंही पाहात आहेत."
ते म्हणाले, "मी नेटो आणि युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या प्रमुखांशी 225 तास संपर्कात होतो असं माझ्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं. पुतीन यांनी नेटोमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला. नेटोत काय चाललंय पाहा, पोलंडमध्ये काय चाललंय पाहा. पोलंड संघटनेत राहिलं. पण हंगेरीचं काय? नुकतंच स्पेन आणि इटलीत काय घडलं पाहा."
 
बायडेन पुढे म्हणाले., 1946 नंतर जगात शांतता टिकून राहिली. आजचं जग बदललंय. आताचं जग अगदी वेगळं आहे. क्युबा मिसाईल संकटानंतर एक रशियन नेता अण्वस्त्रांद्वारे रणनितीक धमकी देईल, असा तुमच्यापैकी कोणी विचार केला होता का, भारत-पाकिस्तान प्रकरणात रशिया, चीन आपली भूमिका वठवण्याचा प्रयत्न करेल असं कधी वाटलं होतं का?
 
अमेरिका आणि पूर्ण जगात जिनपिंग यांच्याबरोबर मी जितका काळ घालवलाय तितका कोणीच व्यतीत केला नाही. मी त्यांच्याबरोबर 78 तास व्यतीत केले आहेत. त्यातील 68 तास गेल्या 10 वर्षांमधले आहेत. बराक ओबामांनी मला ही जबाबदारी दिलेली. मी जिनपिंग यांच्याबरोबर 17 हजार मैल प्रवास केला आहे.
 
या व्यक्तिला स्वतःला काय पाहिजे आहे हे माहिती आहे. पण ही स्थिती कशी हाताळायची हा मोठा प्रश्न आहे. रशियात जे चाललंय ते कसं हाताळावं, आणि मला वाटतं पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे. तो एक अण्वस्त्रं बाळगणारा बेजबाबदार देश आहे.
 
पाकिस्तानातून टीका
बायडेन यांच्या विधानांवर पाकिस्तानातून एकदम तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
 
पाकिस्तान तहरिक ए इन्साफचे नेते असद उमर ट्वीटमध्ये लिहितात, "एका अस्थिर देशाकडे अण्वस्त्रं? अमेरिका हे स्वतःबद्दल बोलत आहे काय? गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. काचेच्या घरात राहाणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडं मारू नयेत."

पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित ट्वीटमध्ये लिहितात, पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमावरचं बायडेन यांचं विधान खेद निर्माण करणारं आहे. आज पाकिस्तानपेक्षा अमेरिका जास्त विभागलेला आहे, हेच सत्य आहे. राष्ट्रीय सुरक्षा रणनिती 2022 वर अमेरिकेने स्वाक्षरी केलेली आहे, त्याचंही ते पालन करत नाहीयेत.
इम्रान खान यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणाऱ्या शिरिन मजारी ट्वीट करतात, अमेरिकेने दुसऱ्या देशावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. एक अस्थिर अण्वस्त्रधारी महाशक्ती इतर जगासाठी गंभीर धोका आहे.
पाकिस्तानातले नेते चौधरी फवाद हुसैन यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय, सौदी अरेबियाबद्दल गेले काही दिवस विधानं करणं आता पाकिस्तानला बेजाबदार म्हणणं हे सगळं पाहाताना बायडेन अमेरिकन जनतेली आपल्या ढासळत्या प्रतिमेवरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतंय. बायडन यांनी आपलं बेजबाबदार विधान तात्काळ मागे घ्यावं. आमचं आताचं नेतृत्व कमजोर असू शकतं पण लोक कमजोर नाहीत.
 
पाकिस्तानातील पत्रकार हामिद मीर यांनी ट्वीटमध्ये प्रश्न विचारला आहे, "अण्वस्त्रांचा वापर करून हिरोशिमा आणि नागासाकी कोणी उद्ध्वस्त केलं? पाकिस्तान की अमेरिकेने? सर्वात धोकादायक देश कोणता? बायडेन उत्तर देतील का?"
व्हाईट हाऊसची सारवासारव
बायडन यांच्या इटलीवरील टिप्पणीनंतर त्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ व्हाईट हाऊसवर आली आहे.
 
व्हाईट हाऊसचे प्रवक्ते केरिन जीन-पियरे म्हणाले, इटलीतील निवडणूक प्रक्रियेनंतर सत्तेवर आलेल्या सरकारबरोबर काम करायला अमेरिका तयार आणि उत्सुक आहे. आम्ही अनेक सामाईक ध्येयं आणि एकमेकांच्या हितासाठी सहकाऱ्याच्या रुपात काम करण्यासाठी तयार आहोत.
 
इटलीच्या लोकांनी निवडलेल्या लोकशाही पर्यायाचा अमेरिका सन्मान करते असं ते म्हणाले.

Published By - Priya Dixit