1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (17:09 IST)

काबूलमध्ये महिलांना बागेत जाण्यालाही बंदी

Author,योगिता लिमये
मध्य काबूलच्या एका बागेत लहान मुलं, तिथल्या घसरगुंडीवर, झोपाळ्यांवर खेळत होती. त्यांच्या हसण्या-खिदळण्याने तिथे आनंदी वातावरणाच्या लहरी निर्माण झाल्या होत्या.
 
या लहान मुलांचे वडील त्यांच्याबरोबर होते. ते त्या मुलांचे फोटो काढत होते, जो देश कायम दु:खद बातम्यांनी  झाकोळलेला असतो तिथे हे दुर्मिळ दृश्य दिसत होतं.
 
मात्र या आनंदात सहभागी होण्याचा त्यांया आयांना हक्क नव्हता. तालिबानच्या राजवटीत काबूल शहरातील बागेत बायकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे अनेक लोक तिथे खेळत होते.
 
मात्र तिथे एकही बाई नव्हती. त्या बागेच्या बाहेर एक हॉटेल होतं. तिथे सगळ्या बायका होत्या. काबूलमध्ये स्विमिंग पूल आणि जिममध्ये जाण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे.
 
हा नियम देशभरात लागू होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
अफगाणिस्तानात बायकांवर दिवसेंदिवस निर्बंध लादले जात आहेत. अशा परिस्थितीत आता पुढे काय बंधनं घातली जातील? अशी भीती तिथल्या बायकांना सतत वाटत असते.
 
काही लोकांच्या मते या निर्णयाचा देशात काहीही परिणाम होणार नाही. कारण सद्य परिस्थितीत बहुतांश लोकांसाठी संध्याकाळी अशा प्रकारची मजा करणंच दुरापास्त झालं आहे.
 
अनेक अफगाण मुलींच्या मते हा निर्णय आणि किंवा त्याचा परिणाम महत्त्वाचा नाही. मात्र त्याचं प्रतिबिंब  हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. या निर्णयातून तालिबानचं काय उद्दिष्ट आहे हे स्पष्ट होतं.  2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता.
 
“दरदिवशी आम्हा मुलींवर रोज एक बंधन घालण्यात येतं. आम्ही आता बसून नवीन निर्बंधांची वाट पाहत असतो.” नाव न घेण्याच्या अटीवर एक विद्यार्थिनी सांगत होती.
 
“तालिबान येण्याच्या आधी शालेय शिक्षण पूर्ण केलं हे फार बरं झालं. मला तर आता असं वाटतंय की विद्यापीठातही स्त्रियांना प्रवेश बंद होईल. माझ्या स्वप्नांचा चक्काचूर होईल.” ती पुढे सांगत होती.
 
तिने नुकतीच विद्यापीठासाठी प्रवेश परीक्षा दिली. तिला पत्रकारितेचं शिक्षण घ्यायचं होतं. मात्र तो विषय मुलींसाठी उपलब्ध नाही. हेही तालिबान ने लादलेल्या अनेक बंधनांपैकी एक आहे.
 
“हे सगळं किती कठीण आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही. कधी कधी मला जोरजोरात किंचाळावंसं वाटतं.” ती विद्यार्थिनी म्हणाली. मला अगदी हतबल वाटतं असंही ती म्हणाली. तिच्या बोलण्यात ती हतबलता क्षणोक्षणी जाणवत होती.
 
अफगाणिस्तानमध्ये बायकांसाठीची जागा दिवसेंदिवस कमी होत आहे. काही लोक या निर्बंधाशी झुंजण्याचा प्रयत्न करत आहे.
 
लैला बसिम या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी महिलांसाठी वाचनालय सुरू केलं आहे. तिथे हजारो विषयांवरची पुस्तकं ठेवली आहेत.
 
“असं करून आम्ही दाखवू इच्छितो की अफगाणी महिला शांत बसणार नाहीत. आमचं दुसरं उद्दिष्ट म्हणजे महिलांमध्ये वाचन संस्कृती रुजवायची आहे. विशेषत: शिक्षणापासून वंचित असलेल्यांसाठी.” त्या सांगतात.
 
पुरुष त्यांचा देश चालवतात याविरुद्ध आवाज उठवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. गेल्यावर्षीपासून त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला आहे.
 
“आम्हाला तालिबानच्या धमक्यांची किंवा मृत्यूची भीती वाटत नाही. आम्हाला भीती आहे ती समाजापासून विलग होण्याची.” त्या पुढे म्हणतात.
 
स्त्रियांवर दिवसेंदिवस लादलेल्या बंधनांमुळे त्यांना वाईट वाटतंय .
 
“आम्ही आमचं स्वातंत्र्य गमावलं याचा मला प्रचंड वाईट वाटतं. इतर देशातले लोक चंद्रावर चाललेत आणि आणि आम्ही इथे मूलभूत अधिकारांसाठी लढतोय.” त्या म्हणाल्या.
 
गेल्या काही दिवसांपूर्वी स्त्री हक्क कार्यकर्ती झारीफा याघुबी आणि अन्य तिघांना अटक करण्यात आली. संयुक्त राष्ट्र आणि अन्य लोकांनी विनंत्या करून तालिबान ने त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
 
गेल्या आठवड्यात एका फुटबॉल स्टेडिअममध्ये हजारो लोकांसमोर 12 लोकांना फटके मारण्यात आले. त्यात तीन महिलांचा समावेश होता.
 
सद्यस्थिती पाहता 1990 च्या दशकाचीच पुनरावृती होत असल्याचं दिसत आहे.
 
“सध्याची तालिबानची धोरणं 20 वर्षांपूर्वीचीच आहेत. हे सगळं 21 व्या शतकात स्वीकार केलं जाणार नाह हेच आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय.” असं लैला बासिम म्हणतात.
 
या वाचनालयापासून थोड्याच अंतरावर तालिबानच्या मॉरल पोलिसांचं कार्यालय आहे. तसंच त्यांचं सद्गुण मंत्रालय सुद्धा आहे. तिथेही स्त्रियांना प्रवेश नाही.
 
“आम्ही फाटकावर एक बॉक्स ठेवला आहे. तिथे महिला त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. आमचे संचालक स्त्रियांचा मान राखायच्या उद्देशाने त्यांना भेटायला जातात.” असं या मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद अकीफ मुहाजेर म्हणतात.
 
“प्रत्येक देशात शासनच्या विरोधात आवाज उठवला की त्याला अटक करतात. काही देशात तर त्यांना मारण्यात येतं. आम्ही ते केलेलं नाही. मात्र साहजिकच देशाच्या हिताविरुद्ध जे असेल त्यांचा आवाज दाबला जाईल.”
 
तालिबानचं महिलांबद्दल असलेलं धोरण अधिकाधिक कडक होणार असल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसतं. जेव्हा त्यांनी सत्ता हस्तगत केली होती तेव्हा त्यांनी त्यांची प्रतिमा बऱ्यापैकी मवाळ असल्याचं दाखवलं होतं. मात्रा आता एकदम विरोधाभास दिसत आहे.
 
“एखाद्या दिवशी आम्हाला सांगण्यात येईल की स्त्रिया घराबाहेर पडू शकणार नाही.” असं एका विद्यार्थिनीने सांगितलं. “अफगाणिस्तानात काहीही होऊ शकतं.”
 
अफगाणिस्तानात स्त्रियांबरोबर जे होत आहे त्याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायातही नाराजी आहे.
 
“जगाने आमच्याकडे पाठ फिरवली आहे.” लैला बसीम सांगतात. “जगातील सर्व शक्तिशाली लोक इराणच्या स्त्रियांना पाठिंबा देतात, पण अफगाणिस्तानच्या नाही.”
Published By -Smita Joshi