1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2015 (12:43 IST)

व्हिडिओ अपलोड करा, पैसे कमवा !

फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करणारे युझर्स आता पैसे कमवू शकणार आहेत. फेसबुकच्या नव्या सजेस्टेड व्हिडिओ फीचरमुळे ही संधी उपलब्ध होऊ शकेल. या फीचरमुळे तुमचे व्हिडिओ आणि जाहिराती यांचा मिळून एक व्हिडिओ तयार होईल. हा व्हिडिओ पाहणार्‍यांची संख्या जेवढी जास्त तेवढी अधिक कमाई असेल. तुमच्या व्हिडिओला जी जाहिरात येईल, त्यातील कमाईच्या 45 टक्के हिस्सा हा फेसबुकचा आणि उर्वरित तुमचा असेल. कारण फेसबुक या माध्यमाद्वारेच तुम्ही तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवता. त्यामुळे फेसबुकही आपला हिस्सा याद्वारे मिळवणं साहजिक आहे.

फेसबुकवर दररोज सुमारे चार अब्ज वेळा व्हिडिओ पाहिले जातात, असा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, फेसबुकवर व्हिडिओच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे यू टय़ूबसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे फेसबुक व्हिडीओंची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. गेल्या वर्षी यू टय़ूबपेक्षा फेसबुकवरील व्हिडिओ पाहणार्‍यांची संख्या अधिक होती. त्यामुळे 2014 या वर्षी फेसबुकने यू टय़ूबवर मात केली होती. फेसबुकचं सातत्य पाहाता, आगामी काळातही ही घोडदौड कायम राहील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. फेसबुक हे व्हिडिओसाठी पैसे देणार असल्यामुळे यापुढे व्हिडिओंची संख्या वाढेल यात शंका नाही. सध्या जर तुम्ही यू टय़ूबवर व्हिडिओ अपलोड केला, तर व्हिडिओपूर्वी येणार्‍या जाहिरातीमुळे कमाई होते. त्या कमाईपैकी 55 टक्के वाटा हा व्हिडिओ अपलोड करणार्‍याला दिला जातो. फेसबुक हा 55 टक्के वाटा अनेक युझर्समध्ये वाटत आहे. फेसबुकला 2015 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जाहिरातींद्वारे 3.3 अब्ज डॉलर इतकी कमाई झाली होती. यापैकी 75 टक्के कमाई ही मोबाइलवर येणार्‍या जाहिरातींद्वारे झाली होती.