शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (13:22 IST)

Krishna Janmashtami जन्माष्टमी कधी आणि कशी साजरी केली जाते?

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.
 
या दिवशी काय करतात
अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. 
व्रताचा संकल्प करून देवघर लता पल्लवानी सुशोभित करतात. 
त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. 
मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. 
दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या,वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. 
सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. 
रात्रौ कथा, पुराण, नृत्य,गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात.
अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. 
नवमीच्या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात.
पूजा झाल्यानंतरचे कृत्य अग्नी पुराणात सांगितले आहे. ते असे-
पूजा करून पुरुषसूक्ताने, विष्णूसूक्ताने व इतर स्तोत्रांनी स्तवन करावे. 
वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण-इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत ती रात्र घालवावी. 
गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इ.चे सिंचन करावे. कारण 'गोपाळांनी दही, दूध, तूप, उदक, यांनी परस्परांवर सिंचन व लेपन केले'असे भागवतामध्ये वचन आहे, त्यावरून असा विधी प्राप्त होतो.
कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.